शिखर धवनचे बोट फ्रॅक्चर

0
112

>> ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार शतक ठोकून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचललेला सलामीवीर शिखर धवनच्या डाव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्याला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. यामुळे सध्या प्रगतीपथावर असलेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील त्याचा प्रवास दोन सामन्यांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

शुक्रवार १३ जून व रविवार १५ जून रोजी अनुक्रमे न्यूझीलंड व पाकिस्तानविरुद्धचे महत्त्वाचे साखळी सामने असताना धवनच्या रुपात टीम इंडियाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. कांगारूंचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलचा एक उसळलेला चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला होता. फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांच्याकडून उपचार घेऊन त्याने या सामन्यात केवळ १०९ चेंडूंत ११७ धावांची खेळी केली होती. दुखापतीमुळे शिखर या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठीदेखील उतरला नव्हता. त्याच्या जागी रवींद्र जडेजाने संपूर्ण पन्नास षटके क्षेत्ररक्षण केले होते. धवनच्या जागी बदली खेळाडू म्हणून ऋषभ पंतच्या नावाची चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू आहे. ऋषभ पंतने केवळ ५ एकदिवसीय सामने खेळताना ९३ धावा जमवल्या आहेत. ३६ ही त्याची वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या आहे.

येत्या ४८ तासांत बीसीसीआय बदली खेळाडूबद्दलचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. शिखर धवन ‘बाद फेरी’ पर्यंत तंदुरुस्त होणार असे संघ व्यवस्थापनाला वाटल्यास त्याच्या जागी बदली खेळाडू निवडता येणार नाही. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद, सदस्य शरणदीप सिंग व देवांग गांधी इंग्लंडमध्ये असून सर्व वैद्यकीय अहवालांचे निरीक्षण करूनच बीसीसीआयकडून अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
बदली खेळाडू न घेण्याचा निर्णय घेतल्यास लोकेश राहुल व रोहित शर्मा ही जोडी भारतीय डावाची सुरुवात करेल. यामुळे विजय शंकर, दिनेश कार्तिक किंवा रवींद्र जडेजाला ‘अंतिम ११’मध्ये संधी मिळू शकते.
भारतीय क्रिकेट मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काल संध्याकाळी ट्विट करताना धवन इंग्लंडमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मंडळाचे वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर देखरेख ठेवणार असल्याचे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये धवनच्या जागी बदली खेळाडू घेण्याचा उल्लेख करण्यात आलेला नसल्यामुळे धवनच्या दुखापतीचे, समावेशाचे गुढ कायम राहिले आहे.

स्टोईनिस जायबंदी, मार्शला बोलावणे
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कुस स्टोईनिस दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू मिचेल मार्श याला बोलावणे पाठवले आहे. स्टोईनिसच्या दुखापतीची तीव्रता स्पष्ट झालेली नसून ‘अंतिम १५’मध्ये मार्शच्या समावेशाबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून निर्णय घेतलेला नाही.