शिक्षण संचालक पदावरून वंदना राव यांची हकालपट्टी

0
149

सरकारने वादग्रस्त बनलेल्या शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव (आयएएस) यांची एका आदेशाद्वारे तडकाफडकी बदली काल केली असून वंदना राव यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी (१) नियुक्ती केली आहे. शिक्षण खात्याच्या संचालकपदाचा ताबा उपशिक्षण संचालक संतोष आमोणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

शिक्षण खात्याच्या संचालकपदी कार्यरत असलेल्या वंदना राव ह्या विविध निर्णयामुळे वादग्रस्त बनल्या होत्या. राज्यातील अनुदानीत विद्यालयातील कर्मचार्‍यांचा पगार शिक्षण संस्थांनी आपल्या निधीतून देण्याचा आदेश जारी केल्यानंतर राव यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या आदेशाबाबत शिक्षण संस्था चालक, शिक्षण क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यांची शिक्षण संचालक पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात होती. मंत्री मायकल लोबो यांनीही शिक्षण संचालिका राव यांच्यावर टीका केली होती. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी शिक्षण संचालिका राव यांची बदली करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार असल्याने विरोधकांकडून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना टार्गेट केले जात होते. वाढत्या विरोधामुळे अखेर शिक्षण संचालिका राव यांना अनुदानीत विद्यालयातील पगारासंबंधीचे परिपत्रक मागे घ्यावे लागले होते.

वित्त विभागाच्या सचिवपदी पुनीत गोयल
सरकारच्या महत्त्वपूर्ण वित्त विभागाच्या सचिवपदी पुनीत कुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शशांक मणी त्रिपाठी यांची अबकारी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांना पर्सनल खात्यात हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली आहे.