शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ नाट्यकर्मी भिकू पै आंगले यांचे निधन

0
118

शिक्षणतज्ज्ञ, मराठी रंगभूमीवरचे एक श्रेष्ठ नाट्यकर्मी, उत्कृष्ट दिग्दर्शक, कुशल प्रशासक भिकू हरी पै आंगले यांचे काल पहाटे झोपेत निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. आज बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मडगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

त्यांच्या मागे हरि व हेमंत हे दोन पुत्र व विवाहित कन्या स्मिता गजानन सौदागर, भाऊ दामोदर तसेच नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. १२ नोव्हेंबर १९२४ साली बोरी येथे त्यांचा जन्म झाला होता. बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ओझर, नासिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए. ए. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे ते प्राचार्य होते. ३५ वर्षांच्या शिक्षण क्षेत्रांतील कार्यानंतर ते निवृत्त झाले. १९८३ पासून आजपर्यंत मठग्रामस्थ हिंदु सभा संचालित शिक्षण संस्थेचे ते शैक्षणिक सल्लागार होते.

सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. गोवा हिंदू असोसिएशनशी ते दीर्घकाळ निगडीत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘दंश’ या नाटकाला ७४ साली कला अकादमीच्या नाट्यस्पर्धेत पुरस्कार प्राप्त झाला होता. शिक्षण क्षेत्रातही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. ‘दंश’ नाटक, स्पर्श होता परिसाचा (शैक्षणिक आत्मनिवेदन), शैक्षणिक सप्तस्वर, दयानंद (चरित्र), वळून बघताना मागे, रंगधन (गोमंतकीय रंगकर्मींची शब्दचित्रे), अमृतधारा (लेखसंग्रह), मराठीचे ऋण, ए टीचर (आत्मचरित्र), इंग्रजीमधून, मराठी रंगभूमी आणि गोमंतकीय देण आदी १० पुस्तके त्यांनी लिहिली.

स्वतः नट व दिग्दर्शक या नात्याने धी गोवा हिंदू असोसिएशनच्या कला विभागात ते सक्रिय कार्यरत राहिले. तेथे व्यावसायिक रंगभूमीवरील अनेक नाटकांत अभिनय व दिग्दर्शन केले. गोव्यातील कला अकादमी स्पर्धेतील नाटकांचेही त्यांनी दिग्दर्शन केले होते. काल निधनाचे वृत्त ऐकताच हितचिंतक, नाट्य व कला क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी आबद द फारीय रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले.