शाळकरी मुले, नोकरदार आई!

0
133

– डॉ. स्वाती अणवेकर

मुलाला शाळेत घातले आणि आपण एका जबाबदारीतूव मुक्त झालो असे कोणत्याही सूज्ञ मातेला वाटणे शक्यच नाही. तर शाळेत घातल्यावर आपली आपल्या मुलाप्रती असलेली जबाबदारी अजूनच वाढली आहे आणि आपण ती अधिक दक्षतेने… एक आई म्हणून पूर्ण करणे गरजेचे आहे हाच विचार सर्वप्रथम त्या स्त्रीच्या मनात येणार हे काही वेगळे सांगायला नको!!

सेजलच्या मनात घालमेल सुरू होती. त्याचबरोबर एक समाधानदेखील ती अनुभवत होती. तिची लाडकी लेक कींजल आता तीन वर्षांची झाली होती. म्हणजे येत्या शालेय वर्षांच्या सुरुवातीला ती शाळेत जायला लागणार होती. तिला पूर्वप्राथमिक विभागात प्रवेश मिळाला होता. सेजल आपल्या नवर्‍याला प्रितेशला सांगत होती, ‘‘बघ ना प्रितेश, बघता बघता कींजल मोठी झाली आणि आता थोड्याच दिवसात शाळेतदेखील जाऊ लागेल. माझा तर विश्‍वासच बसत नाही’’.
प्रितेश म्हणाला, ‘‘होऽ गंऽऽ, मुलं कधी मोठी होतात ते कळतच नाही! प्रथम प्रि-प्रायमरी, मग प्रायमरी, करता करता आपली कींजल कधी ‘कॉलेज कुमारी’ होईल ते आपल्याला समजणारही नाही पहा!’’ ‘‘हे सर्व मान्य आहे रे, पण मला काळजी एकाच गोष्टीची वाटते आहे रे… आपण दोघेही नोकरी करणारे. आधी आपल्याला तिला पाळणाघरात सोडून थेट ऑफीसला जाता यायचे. आता तिला शाळेत सोडून पुन्हा तिला तेथून पाळणाघरात नेऊन सोडणे. हे सगळं कसं जमेल आपल्याला.. याचाच विचार करतेय!’’ सेजल काळजीच्या सुरात म्हणाली.
प्रितेश, ‘‘काही दिवस तरी ती शाळेत रमेपर्यंत आपल्यालाच तिला आळीपाळीने पाळणाघरात सोडायला जावे लागणार’’.
सेजल म्हणाली, ‘‘हो! एकदा का ती शाळेत रमली की मग पुढचा विचार करता येईल.’’
आपलं मूल शाळेत जायला लागलं… विशेषतः जेव्हा मूल प्रथमच शाळेत जात असतं तेव्हा आईची घालमेल अधिक वाढलेली असते. त्यातच जर ती स्त्री नोकरी करणारी असेल तर तिच्यावरची जबाबदारी आणखी वाढते. आणि हल्लीच्या काळात वाढत चाललेल्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या गैरसोयी वाढत आहेत. आपल्या अपत्यासाठी शाळेची निवड करताना आजचे पालक अगदी चोखंदळ असतात. तरीदेखील आपल्या अपत्याला प्रथमच शाळेत पाठवताना प्रत्येक आई थोडी भावूक होतेच. तिच्या मनात बर्‍याच प्रश्‍नांचे काहूर माजलेले असते. ती किंवा तो शाळेत कसे जुळवून घेईल… शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वागणे कसे असेल, मूल त्यांच्याशी शाळेत कसं जुळवून घेईल?… असे बरेच प्रश्‍न आईच्या मनात पिंगा घालत असतात. पण अपत्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक पालकाला त्याला शाळेत पाठवणे भाग असते.
जर एखादी स्त्री गृहिणी असेल तर मात्र तिला आपल्या अपत्याच्या अवती-भवती असण्याची एवढी सवय झालेली असते की काही काळ तरी आपलं मूल शाळेत जाऊ लागल्यावर तिला करमत नाही. कारण गृहिणी ही आपल्या मुलांमध्ये जरा जास्तच मन गुंतवून बसते. पण नोकरी करणारीला आपले मूल शाळेत जाणे हे जरा सोयीचे वाटते. कारण तेवढ्या वेळापुरता का असेना घरच्यांना मूलाला सांभाळावे लागत नाही किंवा त्यांना थोडी उसंत मिळते व मूल शाळेच्या वेगळ्या वातावरणात जास्त रमले तर मग आईला थोडे निश्‍चिंत होता येते.
आपलं मूल शाळेत जाणार म्हणजे त्याला शाळेत पोहोचवण्याचीच नव्हे तर त्याला तयार करण्याची जबाबदारीसुद्धा आईवरच असते. त्यामध्ये त्याचा युनिफॉर्म तयार करणे, बॅग भरणे, त्याचे बूट-सॉक्स-आयकार्ड-टाय तयार ठेवणे. त्याआधी मुलाला उठवणे, ब्रश करवणे, आंघोळ घालणे, नाश्ता बनवणे, टिफिनसाठी काहीतरी बनवणे, मग त्याला भरविणे, तसेच त्याला पूर्ण तयार करून स्कूलबसमध्ये बसविणे! जर तिलाच त्याला बाईकवरून शाळेत सोडायचे असेल तर एवढे सगळे झाल्यानंतर मग स्वतःची आवराआवर करून त्याला शाळेत सोडून कामाला जाणे..!
जर स्त्री विभक्त कुटुंबात राहात असेल तर एवढा सगळा व्याप तिला एकटीलाच सांभाळावा लागतो. एकत्र कुटुंब असेल तर मात्र मुलाला शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी इतर सदस्यावर टाकू शकते.
तसे पाहता मूल शाळेत जायला लागल्यावर, एक आई म्हणून… मग ती गृहिणी असो, नोकरदार अथवा व्यावसायिक स्त्री… त्या मुलाची सर्व तयारी तिनेच पहावी ही अपेक्षा असते. पण या कामात तिला मुलाच्या वडलांचे अथवा घरातल्या अन्य मंडळीचे सहकार्य मिळाले तर उत्तमच!
बरेचदा असे पहायला मिळते की नोकरी करणारी अथवा व्यवसाय करणारी स्त्री असेल तर मुलाच्या शाळेच्या वेळा जसे शाळा सुटणे अथवा भरणे या त्या स्त्रीच्या कामाच्या वेळेत येऊ शकतात आणि असे झाल्यास हा तिच्यावर अतिरिक्त ताण पडू शकतो. एकत्र कुटुंबात राहणारी स्त्री असल्यास तिने घरच्या एखाद्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवायला हरकत नाही पण जर ती विभक्त राहात असेल तर मात्र सध्या उपलब्ध असणार्‍या सोयींपैकी जसे शेअर रीक्षा, कार अशा पर्यायांचा चोखंदळपणे विचार करावा. तसेच जर आपले मूल शाळेतून थेट पाळणाघरात जाणार असेल तर बर्‍याच पाळणाघरांमध्ये थोडेसे जास्त पैसे घेऊन मुलांना शाळेतून आणण्याची सोय केलेली असते. तर या पर्यायाचासुद्धा आपण विचार करू शकता. कारण शाळा, आपले कामाचे ठिकाण, घर आणि पाळणाघर यातील अंतर जर जास्त असेल किंवा ते दोन विरुद्ध दिशांना असेल तर मग आपली इच्छा असली तरी आपण मुलाला पोहचवणे व शाळेतून आणणे ही कामे करू शकत नाही. त्यामुळे अशा पर्यायांचा विचार करणे भाग पडते.
पण.. स्त्री जर गृहिणी असेल तर घर आणि घरच्या कामातून वेळ काढून ती आपल्या मुलाला शाळेत पोहोचवणे आणि आणणे या गोष्टी ती सहज करू शकते. अशा गृहिणींना जर एखादे वाहन म्हणजे स्कुटर अथवा बाईक चालवता येत असेल किंवा तिने ते शिकून घेतले तर ते काम तिला फार त्रासदायक वाटणार नाही. त्यामुळे स्त्री ही गृहिणी असो अथवा नोकरी करणारी… तिला वाहन चालवता येणे ही आता काळाची गरज बनलेली आहे, एवढे मात्र खरे!
बरं, आपलं मूल शाळेत जायला लागलं, तिथल्या वातावरणात रमलं म्हणजे आईची जबाबदारी संपते का? निश्‍चितच नाही. तर आपल्या मुलाचे शाळेतील वर्तन कसे आहे; ते सर्वांशी कसे जुळवून घेते, त्याचे वागणे सर्वांशी मैत्रीपूर्ण आहे का? शाळेत काही अनुचित वातावरण निर्माण होऊन त्याच्या मनावर त्याचा अवास्तव ताण तर पडत नाहीये ना, त्याचे खाणे-पिणे आणि त्याच्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात योग्य दिशेने सुरू झालीये ना… अशा एक ना अनेक गोष्टींवर एक आई म्हणून आपले लक्ष असणे गरजेचे आहे. तसेच बरेचदा असे पाहण्यात येते की शाळेत जायला लागल्यापासून काही मुलांमध्ये काही नको असलेल्या सवयी अथवा बदल घडत असतात जे कधी कधी त्याचा अन्य मुलांशी असलेल्या संगतीचादेखील परिणाम असतो. अशा वेळी एक आई म्हणून ते लक्षात घेऊन आपल्या जोडीदाराशी तसेच घरातील अन्य मंडळी व शाळेतील शिक्षक यांच्याशी सल्ला-मसलत करून तो दूर करणे हीदेखील आपलीच जबाबदारी असते.
त्यामुळे मुलाला शाळेत घातले आणि आपण एका जबाबदारीतूव मुक्त झालो असे कोणत्याही सूज्ञ मातेला वाटणे शक्यच नाही. तर शाळेत घातल्यावर आपली आपल्या मुलाप्रती असलेली जबाबदारी अजूनच वाढली आहे आणि आपण ती अधिक दक्षतेने… एक आई म्हणून पूर्ण करणे गरजेचे आहे हाच विचार सर्वप्रथम त्या स्त्रीच्या मनात येणार हे काही वेगळे सांगायला नको!!