शालेय कला गुण योजना यंदापासून सुरू

0
155

>> मंत्री गोविंद गावडेंची घोषणा ः ‘संजीवनी’ बंद करणार नाही ः घुमट वारसा वाद्य होणार

कला व संस्कृती खात्याची शालेय कलागुण योजना चालू शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित केली जाणार आहे, अशी घोषणा कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत काल केली. कला व संस्कृती, नागरी पुरवठा, आदिवासी खात्याच्या अनुदानित पुरवणी खात्यांच्या मागण्यावरील चर्चेला ते उत्तर देत होते.
कला गुण योजनेसाठी कला धोरणात आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला धोरणाला मान्यता दिली असून आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर कला गुण योजना कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात जाणार आहे. विद्यार्थ्यांना कला व क्रीडा या दोन्ही गुणांचा लाभ एकाच वेळी घेता येणार नाही. ए़खाद्या विद्यार्थ्यांने कला व क्रीडा या दोन्ही क्षेत्रात भाग घेऊन गुण मिळविले तर, जास्त गुण गृहीत धरले जाणार आहेत, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

कला अकादमीबाबत
तज्ज्ञांकडून अहवाल
कला अकादमीच्या इमारतीबाबत गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून अहवाल घेण्यात आला असून इमारतीचा स्ट्रक्चर मजबूत करण्याची सूचना करण्यात आली आहे. गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाकडून परत एकदा कला अकादमीच्या इमारतीची तपासणी करून घेतली जाणार आहे. इमारतीच्या तपासणीचा दुसरा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वांना विश्वास घेऊन निर्णय घेतला जाणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.

आपण कला अकादमीची इमारत जमीनदोस्त करण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कला अकादमीच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या विषयाबाबत चार्ल्स कुरैया ङ्गाउंडेशनशी चर्चा केली आहे. पावसाळ्यात कला अकादमीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती होत आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

मातृत्व योजनेचा
१७ जणांस लाभ देणार
आदिवासी कल्याण खात्याच्या नवीन मातृत्व योजनेखाली १७ लाभार्थीना आर्थिक सहाय्याचे वितरण केले जाणार आहे. या लाभार्थिना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे सहाय्य केले जाणार आहे. आदिवासी कल्याण खात्याकडून शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मागील ५ वर्षापासून सातत्याने वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी समाजातील मुलांसाठी गगन भरारी योजना राबविली जात आहे. एसटी वित्तीय महामंडळातर्फे १ लाखांपर्यत व्याजमुक्त कर्ज दिले जात आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

वाचनालय धोरण तयार करणार
राज्यात आयएएस व तत्सम दर्जाचे अधिकारी तयार करण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. येत्या आठ ते नऊ महिन्यात राज्याचे नवीन वाचनालय धोरण तयार केले जाणार आहे. वाचनालय धोरण तयार करण्यासाठी नंदकुमार कामत यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. काणकोण येथे रवींद्र भवनाच काम सुरू आहे. पेडणे, बार्देश, सांगे या तीन ठिकाणी रवींद्र भवनाच्या बांधकामासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. ङ्गोंडा येथील तालुका वाचनालयासाठी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.

गोवा डेअरीतील
गैरव्यवहारांची चौकशी
गोवा डेअरीतील गैरव्यवहार प्रकरणी कसून चौकशी केली जाणार आहे. गैरव्यवहार प्रकरणात गुंतलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे. शेतकर्‍यांच्या हिताच्या विरोधात काम करणार्‍याची गय केली जाणार नाही. म्हापसा अर्बन व मडगाव अर्बन या दोन्ही सहकारी बँकाची परिस्थिती गंभीर आहे. या दोन्ही बँकातील गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी प्रयत्न केला जात आहे. राज्य सहकारी बँकेची निवडणूक घेतली जाणार आहे असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

नागरी पुरवठा खात्याने स्वस्त धान्य दुकानातील कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी उपाय योजना हाती घेतली आहे. राज्यातील ४५३ स्वस्त धान्य दुकानात पीओएस मशीन बसविण्यात आली आहेत. परंतु, नेटवर्कच्या समस्येमुळे ही यंत्रणा चालविण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून मशीनचा वापर न करता रेशन वितरित करण्याची सूट देण्यात आली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

संजीवनी कारखाना
बंद करणार नाही
संजीवनी साखर कारखाना बंद करण्यात येणार नाही. कारखाना सुरू ठेवण्यासाठी विविध पर्यायांवर विचार केला जात आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नवसंजीवनी दिली जाणार आहे. कारखाना नुकसानीत जाण्यासाठी अनेक कारणे आहेत. राज्यात चांगला ऊस मिळत नाही. चांगला ऊस बाहेरून आणावा लागत आहे. या कारखान्यातील यंत्रसामुग्री व इतर बाबतीत तज्ज्ञांकडून सल्ले घेतले जात आहेत. ऊस उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान केले जाणार नाही. सा़खरेबरोबर अन्य पर्यायावर विचार केला जाणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

घुमट वारसा वाद्य
जाहीर करणार
गोव्यातील घुमट या पारंपारिक वाद्याला वारसा वाद्य म्हणून जाहीर केले जाणार आहे. युवकाच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी कला वृद्धी हा नवीन पुरस्कार दिला जाणार आहे. गोव्याचा सांस्कृतिक वारसा ऑडिओ आणि व्हिडिओच्या स्वरूपात लोकांसमोर आणला जाणार आहे. सेवाभावी संस्था, मंदिरे, चर्च यांना संगीत वाद्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कलेच्या वृध्दीसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहे. कला क्षेत्रातील संस्थाना ३० ते २० हजारांपर्यत मानधन दिले जाणार आहे. कलेच्या वृद्धीसाठी मानधनात आणखी वाढ करण्याची तयारी आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.