शांताराम शिरोडकर यांच्या पुतण्याने दिली खुनाची कबुली

0
93

कुयणामळ-सांगे येथील शांताराम शाणू शिरोडकर (७३ वर्षे) याचा खून आपणच केल्याची कबुली संशयित म्हणून पोलीस कोठडीत असलेला शांताराम यांचा पुतण्या जय शिरोडकर याने काल दिली.

जय याच्या कबुली जबाबानुसार २३ डिसेंबर रोजी शांताराम शिरोडकर हे आपल्या काजू बागायतीत गेले होते. त्यावेळी जय शिरोडकर याने घराशेजारी कचर्‍याला भरदुपारी आग लावली होती. ती आग दुपारच्या वेळी असल्याने आटोक्यात न येता ती शांताराम यांच्या काजू बागायतीत शिरली असता शांताराम यांनी जय यास जाब विचारताच दोघात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली असता जयचा राग अनावर झाल्याने त्याने घरात जाऊन लाकडी दांडा घेऊन सपासप शांताराम यांच्यावर वार केले. तो पर्यंत आग सर्वत्र पसरली होती. या आगीतून मार चुकविण्यासाठी शांताराम जीवाच्या आकांताने धावत असताना अडगळीच्या ठिकाणी बेशुद्ध होवून पडले.
घरातील डिझेलचा कॅन आणून बेशुद्धावस्थेत पडलेल्या शांताराम यांच्यावर डिझेल ओतून आग लावली व त्यातच शांतारामचे शरीर जळून खाक झाले.

नंतर जय पोलिसांच्या रडारावर
शांताराम यांचे कुटुंबीय संशयित खुनी म्हणून जय शिरोडकर यांच्याकडेच अंगुली निर्देश करीत होते. तेव्हापासून सांगे पोलिसांच्या रडारावर जय सापडला होता. तोपर्यंत शांताराम यांच्या कुटुंबियांनी लेखी तक्रार दिली नसल्याने जयला अटक करणे सांगे पोलिसांना जमले नव्हते. अखेर शांतारामची विवाहित कन्या साची उसपकर हिने आपल्या वडिलांच्या मृत्यूस जय शिरोडकर व त्यांचे वडील रविदास शिरोडकर जबाबदार असल्याची तक्रार देताच सांगे पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केली.

सुरवातीला आपण खून केलाच नसल्याचा खूप कांगावा जय याने केला. जय याला अटक केली तरी कबुली मिळणे आवश्यक होते. पोलिसांनी एनजीओला पाचारण केले आणि खुनाचे धागेदोरे सापडू लागले. एनजीओच्या प्रतिनिधीनी जय शिरोडकर याच्या सहा (६) वर्षीय लहान मुलाला व्यवस्थित एक-एक प्रश्‍न विचारीत शांताराम यांच्या खुनाचे रहस्च उलगडले. आपला वडील शांतारामला दंडुक्याने मारहाण करीत असल्याचे पाहिल्याचे छोट्या मुलाने एनजीओला सांगितले व खुनाचे रहस्य उलगडले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता जय शिरोडकरने खुनासाठी वापरलेला दांडा व डिझेल कॅन दाखविला असता सांगे पोलिसांनी ती पंचनामा करून ताब्यात घेतली.