शशिकला तुरुंगात दाखल

0
68

मंगळवारपर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या अभाअद्रमुकच्या ६१ वर्षीय नेत्या शशिकला अखेर काल संध्याकाळी पुन्हा एकदा बंगळूरुमधील ‘त्याच’ तुरुंगात चार वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी चेन्नईहून दाखल झाल्या. त्याआधी त्या बंगळूरुमधील एका न्यायालयात शरण आल्या. कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी २०१४ साली शिक्षा सुनावल्यानंतर जयललिता यांच्यासह याच तुरुंगात शशिकला सहा महिने राहिल्या होत्या. आता त्या कैदी नं. ९४३५ म्हणून तेथे राहतील.

आता पुन्हा त्याच तुरुंगातील खोलीत आपल्याला एक टेबल, पंखा, ध्यानासाठी जागा, वैद्यकीय सेवा व शाकाहारी भोजन देण्यात यावे अशी मागणी शशिकला यांनी केली आहे. शशिकला यांनी तुरुंगात शरणागतीसाठी मागितलेला आणखी अवधी न्यायालयाने नाकारला. आता तुरुंगात त्यांना मेणबत्त्या, अगरबत्त्या करण्याचे काम देण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यासाठी राज्यपाल विद्यासागर राव कोणती भूमिका घेतात याकडे अभाअद्रमुक पक्षाच्या दोन्ही गटांच्या नजरा लागल्या आहेत. शशिकला यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा मंगळवारी जाहीर झाल्या दिवशीच विधीमंडळ नेता म्हणून पलानीस्वामी यांची निवड जाहीर केली होती. तर काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम हेही एक दावेदार आहेत.
दरम्यान, रात्री ८.३० वा. पलानीस्वामी यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली.