शरीफ यांचे पुनरागमन

0
166

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना मायदेशी परतताच अटक झाली. अर्थात, त्यांना न्यायालयाने लंडनमधील बेहिशेबी संपत्तीबाबत दोषी धरलेले असल्याने ही अटक अपेक्षितच होती. शरीफ यांना आपल्यासमोर पाकिस्तानात काय वाढून ठेवले आहे याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी मायदेशी परतण्याचा जो निर्णय घेतला तो काही निरुपाय होऊन नव्हे. पाकिस्तानमध्ये येत्या २५ तारखेला होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अगदी योग्य वेळी आणि संपूर्ण स्वेच्छेने पाकिस्तानात परतण्याचा हा निर्णय घेतला आहे. पत्नी कुलसूम इस्पितळात जवळजवळ मृत्युशय्येवर असताना तिला तेथेच सोडून कन्या मरयमला घेऊन मायदेशी परतणार्‍या शरीफ यांनी एकापरीने स्वतःला पाकिस्तानी जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी येणार्‍या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा जुगार खेळलेला आहे आणि दुसरीकडे आपल्याविरुद्ध न्यायालयाने दिलेल्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचाही त्यांचा बेत असू शकतो. निवाड्याला आव्हान द्यायचे असेल तर त्यासाठी आरोपीने आधी तपासयंत्रणेला शरण येणे आवश्यक असते. शरीफ यांनी हिशेबीपणाने ही सगळी पावले उचललेली आहेत. आपल्याविरुद्धचा न्यायालयीन निवाडा हा डळमळीत पुराव्यांवर आधारित आहे हे शरीफ जाणून आहेत. इंग्लंडमधील ऍव्हनफिल्डमधील आलिशान सदनिका ह्या त्यांनी कतारच्या राजघराण्याशी असलेल्या व्यावसायिक संबंधांतून मिळविलेल्या असल्याचे जरी स्पष्ट झालेले असले तरी शरीफ यांनी अवैध कमाईद्वारे किंवा आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात त्या पदाचा दुरुपयोग करून त्या मिळवल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे तसा बचाव पुढील न्यायालयांत शरीफ यांच्यावतीने केला जाऊ शकतो आणि तो ग्राह्य धरला गेला तर त्यांना झालेल्या दहा वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेतून त्यांची मुक्तताही होऊ शकते. शरीफ यांना न्यायालयाने निवडणुका लढवण्यास आजीवन बंदी घातली आहे, त्यामुळे त्यांचे राजकीय नेतृत्व तूर्त संपल्यात जमा आहे, परंतु आपली कन्या मरिअमला राजकारणात पुढे आणण्यासाठी ते ही वेळ साधू शकतात. मरिअमलाही सात वर्षांचा तुरुंगवास जरी झालेला असला तरी ती तुरुंगातून निवडणूक लढवू शकते. जरी निवडणूक लढवली नाही, तरीही पक्षावर प्रभाव ठेवू शकते. शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) आज अस्तित्वाची लढाई लढतो आहे. इम्रान खानच्या तेहरिक ई इन्साफमागे तेथील लष्कर उभे आहे आणि येणार्‍या निवडणुकीत इम्रानच्या हातात पाकिस्तानची सत्तासूत्रे जाण्याची दाट शक्यता दिसते आहे. अशा वेळी नवाज शरीफ स्वतःबद्दलच्या सहानुभूतीच्या लाटेवर आपल्या पक्षाला नवसंजीवनी देऊ इच्छितात. परंतु शरीफ यांच्यामागे आज पूर्वीइतके जनमत नाही. शिवाय त्यांच्या पक्षामध्येही दुही आहे. बंधू शाहबाज यांनी आपला सवतासुभा उभा केलेला आहे. पाकिस्तानात परतण्याआधी शरीफ हे मृत्युशय्येवरील पत्नीचा मुलीसोबत निरोप घेत असतानाचे ह्रद्य छायाचित्र प्रसृत करण्यात आले. परतत असताना विमानातून त्यांनी आपण मायदेशी परतत आहोत ते जनतेसाठी करीत आहोत, येणार्‍या पिढ्यांसाठी हा त्याग करीत आहोत असे भावपूर्ण वक्तव्य केले. या सगळ्यातून पाकिस्तानी जनतेची सहानुभूती मिळविण्याची त्यांची धडपड स्पष्ट दिसून आली, परंतु पाकिस्तानमधील विद्यमान हंगामी राजवटीने इंटरनेट, सोशल मीडियावर बंधने लादून, प्रसारमाध्यमांची गळचेपी करून शरीफ यांच्या पुनरागमनाला अंधारात गुडूप करण्याचा प्रयत्न केला. शरीफ यांच्या आगमनाच्या दिवशीच बलुचिस्तानमध्ये मोठ्या स्फोटात १२० जणांचा बळी जाणे हाही योगायोग लक्षणीय आहे. एकूण शरीफ यांच्या पुनरागमनाची फार चर्चा होऊ नये याची तजवीज पाकिस्तानी लष्कराने केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे जी सहानुभूतीची लाट शरीफ निर्माण करू पाहात होते, ती येणार्‍या निवडणुकीत कितपत निर्माण होईल हे सांगणे कठीण आहे. पाकिस्तानमधील कोणतीही राजवट ही निव्वळ लोकशाही तत्त्वांवर निवडून येत नाही वा टिकून राहात नाही. लष्करशहांचा तिला पाठिंबा असेल तरच ती कार्यभार चालवू शकते. स्वतः शरीफ यांनीही लष्करात असंतोष असेल तर काय घडू शकते याचा अनुभव आपल्या पंतप्रधानपदाच्या पूर्वीच्या कार्यकाळात मुशर्रफ यांनी केलेल्या बंडाच्या वेळी घेतलाच आहे. पाकिस्तानमधील लोकशाही नेहमी डळमळीत पायावर उभी असते. मोहरे येतात नि जातात, परंतु लोकशाही काही स्थिर करू शकत नाहीत. येत्या निवडणुकीतूनही पाकिस्तानच्या लोकशाहीच्या दृष्टीने आश्वासक काही घडेल अशी आशा करण्यात अर्थ नाही. पाकिस्तान शरीफ यांच्या पक्षाच्या हाती गेले काय किंवा इम्रान खानच्या. त्या देशाच्या भारतविरोधी नीतीमध्ये तर काही फरक पडणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये याच शरीफांनी काय बदमाशी केली होती हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांच्या पापांचा घडा भरला असेल तर आपल्याला त्याचे काही सोयरसुतक असण्याचे कारण नाही.