शरद ऋतु आणि आरोग्य

0
1302

– डॉ. स्वाती अणवेकर

आता पावसाळा संपला आणि वातावरणात सूर्याची किरणे दिसू लागली. आकाशातील मळभ दूर होऊन आकाश निरभ्र दिसू लागले. आता दिवसा वातावरणामध्ये उष्णता जाणवू लागली आहे. तसेच रात्री मात्र छान थंड शरदाचे चांदणे सर्व आकाश पांघरून घेत आहे. मध्ये मध्ये थोड्या पावसाच्या सरीदेखील पडत राहतात यात काही वाद नाही. पण एकंदरीत वातावरण मात्र प्रसन्न असते. सर्वत्र जमीनीवर रस्त्यावर सुकलेला चिखल दृष्टीस पडतो. असा हा शरद ऋतू आश्‍विन व कार्तिक महिन्यांत येतो.
आता पावसाळा संपला आणि या ऋतुमध्ये अचानक वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे शरीरात पित्तदोष वाढतो. त्यामुळे आता पुन्हा आपल्याला आपल्या आहार-विहारात थोडा बदल करणे गरजेचे आहे. याच ऋतुमध्ये कोजागिरी पौर्णिमा येते आणि आपल्याला माहीतच असेल की त्या रात्री कोजागिरीच्या चांदण्यात दूध, मसाले, अथवा दुधापासून बनवलेली खीर आपण चांदण्यामध्ये काही काळ ठेवून मग प्राशन करतो. तेही शरीरातील वाढलेले पित्त कमी करायचाच एक चांगला उपाय आहे बरं का.
आता आपण शरद ऋतुमध्ये करावयाचा आहार पाहू या.
या ऋतुमध्ये पित्त वाढलेले असते त्यामुळे गोड, तुरट, कडू, हलका व शरीराला थंडावा देणारा आहार घ्यावा.
धान्य – उकडे तांदूळ, राजगिरा, वरी, गहू, नाचणी, जोंधळा.
कडधान्य – मूग, मसूर, मटकी, चवळी.
डाळ – मूग, मसूर
भाज्या – मेथी, चाकवत, माठ, कोबी, फ्लॉवर, वाली, तोंडली, कोकणदुधी, भोपळा, भेंडी, फरसबी, तांदुळजा, भारंगी, कोथिंबीर, अलू, हादगा, पालक, शिंगाडा, वांगी, कारले, काकडी, दोडके, घोसाळे, पडवळ, घेवडा इ.
कंदमुळे – बटाटा, बीट, कांदा इ.
फळे – आवळा, सफरचंद, पपई, मोसंबी, केळे, कवठ, डाळींब, द्राक्ष, कलिंगड, सीताफळ, रामफळ, अंजीर इ.
सुकामेवा – मनुका, खजूर, अंजीर.
दुग्धजन्य पदार्थ – पनीर, दूध, तूप, ताक, श्रीखंड, मसाला दूध इ.
मसाल्याचे पदार्थ – बडीशेप, धणे, सुंठ, वेलची, हळद, कढीपत्ता, केशर, लवंग इ.
पेय, सरबतं – सर्व गोड फळांची सरबते प्यावीत.
या ऋतुमध्ये दिवसा दुपारी उन्हात फिरणे टाळावे. पूर्वेचा वारा घेऊ नये. तसेच बेताने खावे. अगदी पोट भरून जेवणे टाळावे. दिवसा झोपू नये. तसेच रात्रीच्या चांदण्याचा आस्वाद घ्यावा. रात्री चांदण्यात झोपावे, तसेच रात्री चांदण्यात थोडा वेळ फिरावे.
तसे पाहता या ऋतुमध्ये जड, तिखट, खारट, आंबट, उष्ण पदार्थ खाणे टाळावे. तसेच तळलेले तेलकट पदार्थ खाऊ नये. कोल्डड्रिन्क्स, फास्ट फूड, वारंवार हॉटेलिंग टाळावे.
मैदा, बेकरीचे पदार्थ, शिळे पदार्थ खाऊ नयेत. ही दक्षता घ्यावी.
आयुर्वेदानुसार या ऋतुमध्ये तीळतेलाने शरीरास मालीश करावी व वाफ घ्यावी. तसेच विरेचन व रक्तमोक्षण ही पंचकर्म चिकित्सा करावी. च्यवनप्राश या ऋतुमध्ये घेणे उत्तम. तसेच मध बेताने सेवन करावे. अन्य औषधांमध्ये गुळवेल, सब्जा, आवळा, अश्‍वगंधा, शतावरी, सारीवा, चंदन, वाळा, इ. औषधे गरज पडेल तेव्हा वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत.
नियमित व्यायाम करावा. योगासने, प्राणायाम किंवा आपल्याला सुलभ असा व्यायाम शरीराच्या यथाशक्ती करावा.
अशा प्रकारे आपण शरद ऋतुमध्ये आहार-विहाराचे पालन करून या ऋतूचा आणि कोजागिरीचा पुरेपूर आनंद लुटावा.