शत्रूचे प्रत्येक हेलिकॉप्टर उद्ध्वस्त करावे का?

0
113

रविवार, ३० सप्टेंबर,२०१८ च्या रात्री काश्मिरमधील गुलपूर क्षेत्रातील लाइन ऑफ कंट्रोलवर (एलओसी) पाकिस्तानी हेलिकॉप्टरनी केलेले भारतीय सीमेचे उल्लंघन आणि त्यावर सेनेच्या जवानांनी केलेल्या ‘स्मॉल आर्म फायर’ची दृष्ये वाचकांनी चलचित्र वाहिन्यांवर पाहिली असतील. या विषयावरील चलचित्र वाहिन्यांमधील अपरिपक्व चर्चा आणि वृत्तपत्रांमध्ये केलेल्या टिप्पण्यांमुळे एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आम लोकांना एलओसीवरील ‘रुल्स ऑफ एंगेजमेंटस्’ आणि उड्डाणांवरील निर्बंधांबद्दल फार कमी माहिती आहे. एलओसीवर कधीही, केव्हाही एकाच प्रकारची परिस्थिती नसते किंवा प्रत्येक परिस्थितीला प्रत्येक वेळी तोंड कसे द्यायचे यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स (एसओपी) नसतात. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते; पण प्रत्येक वेळी जीवन आणि मृत्यूमधील सीमारेषा तेवढीच अस्पष्ट असते. आंतरराष्ट्रीय व भारत पाक उड्डाण करार आणि प्रचलित एसओपीनुसार सीमेजवळ विमान अथवा हेलिकॉप्टर उड्डाण करत असेल तर शेजार्‍याला सूचित करणे आवश्यक असते.
कुठल्याही प्रकारचे विमान आपल्या सीमेपासून किमान १० किलोमीटर आत आणि हेलिकॉप्टर किमान एक किलोमीटर आत असायला पाहिजे; अन्यथा त्यावर शत्रू फायर करू शकतो. जर यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो लगेच प्रतिस्पर्धी देशाच्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्सला (डीजीएमओ) कळवावा लागतो. इतर ‘लाइन ऑफ कम्युनिकेशन्स’ देखील असल्या तरी त्या तितक्या आश्‍वासक नसतात.
एलओसीवर सेनेची सर्व हेलिपॅडस सीमेपासून किमान एक किलोमीटर आतल्या बाजूला असतात. फक्त ‘कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन’साठी वापरल्या जाणारे हेलिपॅडस् प्रत्यक्ष एलओसीवर असतात. ३० सप्टेंबर रोजी पाकिस्तान व्याप्त काश्मिरचे (पीओके) पंतप्रधान मियाराजा फारुख हैदर, आपला स्वीय सहायक आणि दोन मंत्र्यांसह काश्मिरमधील पूँछच्या समोर असलेल्या अब्बासपूर या पीओकेमधील गावावरुन हेलिकॉप्टरनेे उड्डाण करत असताना लाईन ऑफ कंट्रोल पार करून भारतीय बाजूला आले असे आढळल्यामुळे, त्यांच्या सिव्हिल हेलिकॉप्टरवर भारतीय सैनिकांनी भर दुपारी गोळीबार केला. यानंतर पीओकेच्या पंतप्रधानांनी कांगावा केला. चलचित्र वाहिन्यांवर पाकिस्तानच्या नुमाईंद्यांनी याच मुद्यावर त्यांना पाठिंबा दिला आणि आपल्या येथील काही बुद्धिवंतांनी तो उचलून देखील धरला. त्यांना एक तर ‘रुल्स ऑफ एंगेजमेंट’बद्दल काडीचीही कल्पना नव्हती किंवा ते स्वत:नुरूप वाकवलेले हवे होते.
दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेच्या शिकागो शहरात झालेल्या ‘इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन’च्या परिषदेमध्ये कुठल्याही राष्ट्राच्या संरक्षण दलांनी त्यांच्या सीमेजवळ आलेल्या किंवा अनधिकृतपणे सीमापार केलेल्या दुसर्‍या राष्ट्राच्या नागरी विमानांवर केव्हा, कसा हल्ला करावा किंवा अजिबात करु नये यावर अजिबात चर्चा झाली नाही किंवा अशा अर्थाचा कोणताही ठराव मंजूर झाला नाही. मात्र, शिकागो परिषदेच्या कलम तीननुसार अशा स्थितीत असलेल्या सैनिकी विमानांवर धोक्याची स्पष्ट सूचना दिल्या शिवाय फायर करू नये हे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जी सूट सैनिकी विमांनांना देण्यात येते ती नागरी विमानांना देखील मिळावी, हा निष्कर्ष कोणी काढल्यास ते वावगे होणार नाही. सुसंकृत वागणुकींच्या निकषांनुसार हत्यार नसलेल्या नागरी विमानावर शांती काळात वॉर्निंग म्हणूनही फायर करायचे नाही ही रुढी पहिल्या महायुद्धापासून चालत आली आहे.
सीमेवर तैनात सैनिक किंवा लढाऊ विमान खाली परिस्थितीमध्ये शत्रूच्या घुसखोरी करणार्‍या शत्रू विमानांवर फायर करु शकतो.
एक) सीमेजवळील नागरी विमानामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होणार असेल तर
दोन) राष्ट्रीय सुरक्षेला सीमेवर आलेल्या नागरी अथवा सैनिकी विमानांमुळे निर्माण होणार्‍या धोक्याच्या तीव्रतेनुरूप विमानावर फायर करावे की नाही हे ठरल्यानंतर
तीन) सीमेवर तैनात सैनिकांनी वारंवार दिलेल्या सुचनांना किंवा अशा सुचना देण्यासाठी पाठवलेल्या लढाऊ विमानांना सीमेजवळ आलेले नागरी अथवा सैनिकी विमान भीक घालत नसेल तर त्यांना या निर्णयाची मुभा आपोआप मिळते.
चार) घुसखोरी करणारे नागरी/सैनिकी विमान त्याला सुचना देण्यासाठी पाठवलेल्या लढाऊ विमानांनी ‘मॅन्युअल कन्सर्निंग इंटरसेपश्‍न ऑफ सिव्हिल एयरक्राफ्टस्’मध्ये दिलेले सिग्नल्स समजूनही उमजले नाहीत असे दाखवले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तरीही ती लढाऊ विमाने वरील निर्णय घेण्यास पात्र असतात.
पाच) घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले शत्रू विमान प्रचंड वस्ती किंवा महत्वाच्या सामरिक लक्ष्यांकडे जाणार आहे अशी शंका सीमेवर तैनात सैनिक किंवा इंटरसेप्टर विमानांना आल्यास त्याच्यावर फायर केला जाऊ शकतो.
जर कोणतेही नागरी/सैनिकी विमान आक्रमक सैनिकी कारवाई किंवा हेरगिरीसाठी आले आहे अथवा येत आहे, अशी खात्री पटल्यास त्याच्यावर फायर करून त्याचा विध्वंस करतात हे १९५०च्या दशकात तत्कालीन सोव्हिएत युनियनने पाडलेल्या अमेरिकन यू २ विमानावरील फायरिंगच्या घटनेतून उजागर होते. २०१६ मध्ये युक्रेनमध्ये तैनात रशियन मिसाइलने वेध घेतलेली मलेशियन एयरलाइन फ्लाइट १७ यांसारख्या उदाहरणातून शत्रूच्या नागरी विमानावर केव्हा फायर करायचे या बद्दल स्पष्ट जागतिक निर्देश नसले तरी असे नागरी विमान राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे असे नक्की झाल्यास त्यावर ङ्गायर होऊ शकते हे स्पष्टपणे उजागर झाले आहे. या कारवायांना जरी जागतिक कायद्याचे रुप मिळाले नसले तरी अशी नागरी विमाने मिलिटरी थ्रेट/थे्रट टू लाइव्हज् फ्रॉम टेरोरिस्ट प्लॉटस्’ असली तर ती पाडायची मुभा युनायटेड नेशन्स चार्टरच्या आर्टिकल ५१ अंतर्गत मिळाली आहे.
१० ऑगस्ट १९९९ रोजी गुजराथमधील सीमेवर तैनात भारतीय रडार्सनी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बादीन गावाकडून भारताकडे येणार्‍या विमानाला आपल्या आवाक्यात घेतले. ३५०० फूटांवरुन उडणारे हे विमान ३७० किलोमिटर्स वेगाने भारताकडे येत होते. सकाळी १०.५४ ते ११.१५ त्या विमानाने सीमेवर ‘एरोबॅटिक्स मॅन्युव्हर्स’ केलीत. ती करताना ते १० किलोमीटर्स भारतीय हद्दीत आले. भारत-पाकिस्तानमधील १९९१च्या हवाई करारानुसार हेलिकॉप्टर्स सोडल्यास इतर विमाने सीमेपासून दहा किलोमिटर्स स्वत:च्या हद्दीत राहायला हवीत. पाकिस्तानी नौैसेनेचे ते पीएन ऍटलांटिक विमान भारतीय हद्दीत येताच कच्छमधील नालिया एयर बेसवरुन ४५व्या एयर स्क्वाड्रनची दोन मिग-२१ विमान आकाशात भरारी घेती झाली. ऍटलांटिक विमानाकडे आता एक तर मिग विमानांनी दिलेल्या सुचनेनुसार वायुसेनेच्या बेसवर उतरणे किंवा मिग विमानांच्या मार्‍यात ध्वस्त होणे हे दोनच पर्याय होते. ते पाकिस्तानमध्ये परत जाऊ शकणार नव्हते. त्यानी तसा प्रयत्न करताच स्क्वाड्रन लीडर बुंदेलांनी त्यावर आपले मिसाईल फिक्स केले. बुंदेलानी आपले विमान ऍटलांटिकच्या समोर नेले आणि त्याला फॉलो अपचा संदेश दिला. पण ऍटलांटिकनी तो न मानता पळण्याचा प्रयत्न केला आणि बुंदेलांनी आपल्या मिसाईलद्वारे त्याचा वेध घेतला.
ताज्या घटनेमध्ये पाकिस्तान पीओकेच्या पंतप्रधानांनी प्रवासी असलेल्या नागरी हेलिकॉप्टरने भारतीय वायुहद्दीचे उल्लंघन केले होते. पुंछमधील सेना तैनात असलेल्या पर्वतराजीला पार करुन ते भारतीय हद्दीत आले. पर्वतराजीच्या शिखरांवर असलेल्या सेनेच्या प्रत्येक पोस्टवर अशा विमानांना हुसकावून लावण्यासाठी आणि वेळ पडल्यास फायर करण्यासाठी एका लांब लोखंडी दांड्यावरील चपट्या माउंटवर बसवलेल्या मशिनगन्स तैनात असतात. काही महत्वाच्या पोस्टस्‌वर मिसाईल्सही असतात. अशा एका मशिनगनच्या फायरने हेलिकॉप्टर पाडली जाण्याची शक्यता कमीच असते. पण जेंव्हा इतर मशिनगन्स आणि रायफल्स देखील फायर करतात त्या वेळी ताकद वाढते. विमानांच्या सर्व कंपनी एकसाथ फायर करत असेल तर डोळ्यांनी पाहात फायर करणार्‍या इंफंट्री सैनिकांपुढे त्यांच्या मॅन्युव्हरेबिलिटीला काहीच अर्थ नसतो. हेलिकॉप्टरच्या रोटर्स किंवा फ्युएल टँकला लागलेली गोळी त्याला ध्वस्त करू शकते अन्यथा इतर ठिकाणी गोळी लागूनही त्याला क्षती पोहोचतेच पोहोचते.
इंफंट्रीकडे ‘क्लोज रेंज एयर क्राफ्ट अटॅक’साठी आपले डावपेच असतात. म्हणूनच त्यांच्या इफेक्टिव्ह फायरमुळे इन्ङ्गंट्री पोस्टस्‌वर फार कमी थेट हल्ले होतात. पोस्टवर एयरक्राफ्ट येतांना दिसताच ‘टेक अँड नी अँड फायर’चे प्रशिक्षण इंफंट्रीच्या सैनिकांना दिले जाते. एकसाथ फायर करणार्‍या १२० बंदुका / मशिनगन्सपैकी एकच गोळी जरी हेलिकॉप्टर किंवा विमानाला लागली तरी काम फत्ते होते.
ऑगस्ट १९९५ मध्ये उत्तरी सियाचेन हिमखंडावर भारतीय सेनेने एक पाकिस्तानी आर्मी ऍव्हिएशनच हेलिकॉप्टर ध्वस्त केले होते. १९९६ मध्ये ब्रिगेडियर हुद्यावरील पाकिस्तानी फोर्स कमांडर नॉर्दर्न एरिया देखील याच प्रकारे सेनेच्या हल्ल्यात ठार झाला होता. या पार्श्‍वभूमीवर फारूख हैदर या पीओकेच्या पंतप्रधानांना घेऊन उडणारे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत जवळपास ८-८५० मीटर आत येते त्यावेळी सेनेने त्या हेलिकॉप्टरवर फायर करावे की नाही हा प्रश्‍न उभा राहतो. वर उल्लेख केल्यानुसार, अत्यल्प समय सीमेमुळे अशा वेळी योग्य निर्णय घेणे अतिशय कठीण असते. ज्यावेळी ३-३५०० फूट उंचीवर उड्डाण करणारे शत्रूचे हेलिकॉप्टर केवळ ७-८०० मीटर आपल्या हद्दीत येते त्यावेळी ‘फायर फॉर इफेक्ट’ न झाल्यास गोळी लागलेले ते हेलिकॉप्टर हवेत एक मोठा हेलकावा घेऊन त्यांच्या हद्दीत पोचू शकते. त्यानंतर जो काही आंतरराष्ट्रीय गदारोळ होईल तो मोठा असेल. गोळी लागलेले हेलिकॉप्टर नक्की आपल्या हद्दीतच पडेल याबाबत सैनिक ज्यावेळी पूर्णपणे आश्‍वस्त असतो त्याच वेळी तो हेलिकॉप्टरवर फायर करतो. सीमेनजीक उड्डाण करणारे हेलिकॉप्टर ज्यावेळी चुकून भारतीय हद्दीत येते आणि लगेच परत हेलकावा घेऊन आपल्या हद्दीत परत जाते. अशा बहुतांश वेळी त्यावर फायर केले जात नाही. पण हीच चूक वारंवार झाली तर ते शिक्षेस पात्र ठरते. त्या पोस्टवर तैनात सैनिकांनी फायर खोलल्यामुळे राजा हैदरच्या हेलिकॉप्टरने सीमेवर वरील पद्धतीने जरा जास्तच धुमाकूळ माजवला असणार हे स्पष्ट होते.
सीमेवरील तैनातीत मी एक गोष्ट प्रामुख्याने शिकलो ती म्हणजे ‘रुल्स ऑफ एंगेजमेंटस्’ या केवळ गाईड लाईंन्स असतात. कुठल्याही जवानाने अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी लिखीत सूचना देऊ नयेत तर आपल्या खालील अधिकारी व सैनिकांना अशा वेळी कुठला साधकबाधक विचार करुन काय निर्णय घ्यायचा याचे ऑन ग्राउंड प्रशिक्षण देऊन योग्य तो निर्णय घेण्याची मुभा दिली पाहिजे. तरच अशा प्रसंगी योग्य निर्णयाची अमलबजावणी होऊ शकते.