शत्रुराष्ट्रांच्या घुसखोरीविरोधात कडक पावले उचलणार

0
134

>> गोव्यात आगमनानंतर संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती

पाकिस्तान, चीनसारख्या राष्ट्रांकडून भारतात घुसखोरी करण्याचे जे प्रकार घडत असतात त्याविरुद्ध आता कडक पावले उचलण्यात येणार आहेत, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यानी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या श्रीपाद नाईक यांचे काल गोव्यात आगमन झाले.
विशेषतः पाकिस्तानकडून घुसखोरीबरोबरच भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागलेले असून या घुसखोरी व दहशतवादी हल्ल्यांना जशास तसे असे उत्तर देण्यात येणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

मागच्या वर्षी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाचा देशाला सामना करावा लागला. लष्करी तळ तसेच लष्कराच्या ताफ्यावर हल्ले केले गेले. मात्र, मोदी सरकारने जराही वेळ न दडवता या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ‘सर्जिकल स्ट्राइक’ व पाकिस्तानमधील अतिरेकी तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे नाईक म्हणाले.
देशाच्या सुरक्षेशी सरकार तडजोड करणार नाही
नव्याने सत्तेवर आलेले मोदी सरकार यापुढेही देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचा नाईक यानी पुनरुच्चार केला.

श्रीपाद नाईक यांचे
मिरवणुकीने पणजीत आगमन
नाईक यांचे काल दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले असता मंत्री मिलिंद नाईक व अन्य पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर नाईक यांचे बांबोळी येथील लष्करी तळाजवळ आगमन झाले असता तेथे जमलेल्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या वाहनांच्या मिरवणुकीसह नाईक यांचे पणजीत आगमन झाले.

मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
भाजप मुख्यालयाजवळ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी बोलताना प्रमोद सावंत म्हणाले की, मागच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मनोहर पर्रीकर हे संरक्षणमंत्री होते. आता श्रीपाद नाईक हे संरक्षण राज्यमंत्री झालेले असून पर्रीकर यानी संरक्षण मंत्रालयातर्फे राज्यात सुरू केलेली व अर्ध्यावर राहिलेली कामे पूर्ण करण्यास आता मदत होणार आहे.

लोकांच्या अपेक्षा वाढल्या
यावेळी झालेल्या निवडणुकीत जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच श्रीपाद नाईक यांच्यावर विश्‍वास व्यक्त केल्याचे यावेळी पुढे बोलताना सावंत म्हणाले. गोमंतकीयांच्या आता श्रीपाद नाईक यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. गोव्याच्या विकासासाठी केंद्रातून निधी आणण्याची जबाबदारी नाईक यांना पार पाडावी लागणार असून त्यात ते यशस्वी होतील, असा विश्‍वासही सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

खाण व म्हादई प्रश्‍न
सोडवावा लागेल
राज्यातील बंद पडलेला खाणीचा प्रश्‍न धसास लावण्यासाठी तसेच म्हादई प्रश्‍नीही नाईक यांना केंद्रात गोव्याची बाजू मांडावी लागणार असल्याचे सावंत यानी स्पष्ट केले.