शंभर कोटींचा काळा पैसा कॅसिनोतून जप्त : पर्रीकर

0
97

संचालनालय (ईडी) आणि आयकर खात्याच्या संयुक्त पथकाने केलेल्या एका कारवाईत राज्यातील कॅसिनोशी संबधीत शंभर कोटी रूपयांचा काळा पैसा ताब्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल दिली. यावेळी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जोरदार समर्थन केले. नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही. उलट पर्यटन व्यवसायात १८ ते २० टक्के एवढी वाढ झाली आहे. राज्याच्या महसूलात सुध्दा २२ टक्के वाढ झाली आहे, असा दावा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केला.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे बनावट नोटा गायब झाल्या आहेत. नक्षलवादी, दहतशतवाद्यांना होणारे आर्थिक साहाय्य कमी झाल्याने काश्मीरमध्ये दगडफेकीच्या प्रकारांत घट झाली आहे. तसेच डिजिटल व्यवहारात ६० टक्के वृद्धी झाली आहे. राज्य सरकारने मार्चअखेर डिजिटल व्यवहार ९० ते ९५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले.

जीएसटीच्या कर वसुलीमुळे काही कारणांमुळे घट झाली आहे. बर्‍याच जणांनी बिले सादर केली नाहीत. सरकारी कंत्राटदारांची बिले काही कारणास्तव प्रलंबित होती. कंत्राटदारांच्या बिलांच्या विषयावर तोडगा काढण्यात आला आहे. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेच्या सुधारणामध्ये दूरगामी चांगला परिणाम होणार आहे. कुठलाही नवीन निर्णय घेतल्यानंतर काही दिवस त्रास सहन करावा लागतो, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर १८ लाख कोटी जुन्या नोटा बँकांत जमा करण्यात आल्या. त्यानंतर १२ लाख कोटी नोटा बाजारात आणण्यात आल्या. नोटाबंदीमुळे काळा पैश्यांचा व्यवहाराला लगाम बसली आहे. व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे. ई चलनमध्ये २८ टक्के वाढ झाली आहे. बँकात जमा करण्यात आलेल्या ३.६८ लाख कोटी रूपयांचा हिशोब मिळालेला नाही. त्यामुळे लाखो लोकांना पैश्याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. या लोकांना कारणे द्यावी लागणार आहेत. त्यांच्याकडून कर, दंडाची वसुली केली जाणार आहे. तसेच कायदेशीर कारवाईला सामोरे सुध्दा जावे लागणार आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार तथा गोवा प्रदेश भाजप समितीचे अध्यक्ष विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती.