शंभराची नोट

0
223
  • प्रतिभा कारंजकर

घरात इतकं वाणसामानही नव्हतं. पण तरीही मी साधं डाळ-भाताचं जेवण करून वाढलं. त्यांना ते खूपच चविष्ट वाटलं. कदाचित ते भुकेले असल्याने असेल, पण ‘आम्ही अमृताचा प्रसाद सेवन करतोय असंच वाटलं’ असं त्यांनी कौतुक केलं.

 

त्या दिवशी शहरातल्या प्रसिद्ध पेपरचे वार्ताहर त्या गावात तिची मुलाखत घ्यायला आले होते. याला कारण, गावोगावी पसरत ‘त्या’ हॉटेलच्या प्रसिद्धीचं लोण शहरातसुद्धा पोचलं होतं. लोक आता त्या गावातल्या कोटलिंगनाथाच्या देवळात येण्याबरोबरच त्या हॉटेलला भेट द्यायला खासकरून येऊ लागले होते. हॉटेल ‘अन्नदा’ त्याचं नाव.
हॉटेलची ही ओळख तशी नवीनच, पण पूर्वी तिला लोक ओळखायचे ते ‘खानावळवाली वहिनी’ म्हणूनच. अख्ख्या पंक्रोशीत शिवराक जेवणात ‘खानावळवाली वहिनी’चा हात धरणारं कुणी नव्हतं; अजूनही नाही. अगदी साधाच डाळ-भात, लोणचं, पापड, एक भाजी, सोलकढी इतकंच जेवण. पण तिच्या हाताला जणू अमृताची चव. जेवणारा अगदी तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देत असावा- ‘अन्नदाता सुखी भव!’ म्हणूनच दिवसेंदिवस ती सुखी होत गेली. तिची भरभराट आणि प्रसिद्धी वाढतच गेली. या सुखाचं पारडं मात्र जड झालं ते फक्त तिच्या प्रयत्नांनेच. त्याचीच परिणती म्हणजे गावात आज हे इतके मोठे हॉटेल उभारले गेलेय.

ही वहिनी लग्न होऊन गावात आली तेव्हा या छोट्याशा गावात अगदी मोजकीच घरं एकमेकांच्या सोबतीनं उभी होती, नांदत होती. नाही म्हणायला गावाला ‘गावपण’ दिले होते ते या गावच्या कोटलिंगनाथाच्या मंदिराने. जुन्या बांधकामाचं ते प्राचीन ऐसपैस पसरलेलं देवालय. नक्की कुणी बांधलं, कशासाठी बांधलं याबाबत लोकांचे वादविवाद, मतांतरे होती. काही प्रवाद होते. पण हळूहळू या देवाची ख्याती, महिमा पसरत दूरवर जाऊन पोचला होता. ‘नवसाला पावणारा देव’ ही उक्ती खरी ठरवणारे लोकांना अनुभव येत होते. गावात येणार्‍या- जाणार्‍यांची वर्दळ वाढली.

बरीच वर्षं गाव मात्र होतं तसंच राहिलं. गावात मोजकीच घरे. जास्त धनगरवस्ती, मंदिराच्या पुजार्‍यांची दोन घरे, बाकी थोडे शेतकरी. नदीचं वक्राकार पात्र देवळाच्या कडेने वाहणारं बारा महिने सोबत करत असायचं. या पाण्यावर हळूहळू तिथला शेतकरीवर्ग सधन होत गेला. जास्त जमीन लागवडीखाली येऊ लागली. धनगरलोकांच्या शेळ्या-मेंढ्या खाऊन-पिऊन पुष्ट असल्याने त्यांना बाहेरच्या गावांतून मागणी वाढत गेली. गावात धनगरांचेही पारडे जड होऊ लागले. ही सगळी त्या कोटलिंगनाथाची कृपा म्हणून त्याला नवस बोलायला लोकांची रिघ लागली. गावाचं ठिकाण जरा अडनीडच असल्याने येणार्‍या लोकांना बरेच हाल सोसावे लागायचे. शिवाय गावात जेवणाखाणाची काही सोय नव्हती. त्यामुळे आलेला भक्त आल्या पावली परतीच्या वाटेला लागायचा. पण वहिनीबाईने गावाला एक पर्यटकांचे ठिकाण बनवून टाकले.

हॉटेलमध्ये तिची मुलाखत घ्यायला आलेल्या वार्ताहराला एक प्रश्‍न पडला होता. ती बसलेल्या काऊंटरच्या मागे एक शंभराची नोट असलेली तसबीर लावली होती. त्याने विचारलं, ‘‘लोक देवदेवतांचे, लक्ष्मीचे फोटो लावतात, तुम्ही डायरेक्ट नोटेचाच फोटो लावलाय याचं गौडबंगाल काय?’’ त्यावर ती क्षणभरासाठी भूतकाळात डोकावून आली. तिनं सांगायला सुरुवात केली-
‘‘मी लग्न होऊन या गावात आले तेव्हाची म्हणजे साधारण तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. घर त्यावेळी सासू-सासरे, दीर-नणंदा यांनी भरलेलं आणि कमावता मात्र एकच- माझा नवरा. ते मंदिरातलं पौरोहित्य करायचे. अशा आड बाजूला तेव्हा देवळात येणार तरी कोण? एस्टी काही गावापर्यंत येत नव्हती. तिथून पुढे बैलगाडी करून काही लोक यायचे. गावातले शेतकरी नवीन पीक काढलं की देवाला आणून द्यायचे. कुणी नवीन घर बांधलं, खरेदी केलं तर जे देवाला आणून द्यायचे तेव्हढंच उत्पन्न. पण नवरा देवाचे सारे यथासांग पूजापाठ करत होता. त्यामुळे असेल पण हळूहळू लोकांची देवळातली वर्दळ वाढली. घर चालवण्यापुरतं मिळायचं. मीही माझ्या सासूच्या हाताखाली कामं करून रांधप-वाढप यात तरबेज झाले. घरातले सगळे माझ्या जेवणाची स्तुती करायचे. ‘हिच्या हाताला चव आहे’ म्हणायचे.

एकदा असंच एक मध्यमवयीन जोडपं मुंबईहून देवळात आलं. मोठी श्रीमंत असामी असावी. त्यांच्या पेहरावावरूनच कळत होते. शिवाय स्वतःची गाडी घेऊन आलेले. गावात पहिल्यांदाच गाडी आली होती. त्यावेळी गाडीला सोईस्कर असा रस्ता नव्हता. कशीतरी रडत-खडत वाट काढत येत होती. गावच्या मुलांनी पहिल्यांदाच गाडी जवळून बघितली. ते तिच्या मागे मागे धावत सुटले. पाहुण्यांनी देऊळ कुठे आहे ते विचारलं पण देवळापर्यंत रस्ता नाही म्हटल्यावर ते खाली उतरून चालू लागले. दुपारची वेळ, रणरणता उन्हाचा तडाखा, खाचखळग्यांची वाट… ते कसेबसे देवळात पोचले तर देऊळ बंद. कुणी आलं तरच देऊळ उघडलं जायचं.

त्यांनी पोरांना भटजीला बोलावून आणायला पिटाळलं. पोरं आमच्या घरी आरडाओरडा करतच आली तसं यांनी मंदिराची चावी घेतली आणि निघाले. यांनाही नैवेद्य घेऊन जायचेच होते. मुख्य देवळाच्या आतलं देवाचं मंदिर जरी छोटं असलं तरी देवळाचा आजूबाजूचा परिसर प्रशस्त होता. मोठी झाडे होती. पूर्वी चारी बाजूंनी ओसर्‍या बांधून घेतलेल्या होत्या, पण त्यांची स्थिती काही चांगली नव्हती. ते तिथेच झाडाखाली वाट बघत बसले होते. हे त्यांच्या घराण्याचं कुलदैवत पण बरीच वर्षं त्यांच्याकडून कुणी फिरकलं नव्हतं. पण त्या स्त्रीच्या सासूने मरण्यापूर्वी तिला सांगितलं होतं, ‘एकदा तरी आपल्या कुलदैवताला जाऊन पाया पडून या.’ धंद्याच्या व्यापात त्यांना काही जमलं नाही यायला. नंतर मात्र त्या स्त्रीच्या टाचेला भेगा पडल्या. खूप औषधपाणी, मलम, वैद्य, हकीम केले पण गुण काही येत नव्हता. मग देवदेव आणि देवऋषी यांकडे वळले. कुणी सांगितलं, तुमच्या कुलदैवताला गेला नाही म्हणून तुम्हाला हा त्रास होतोय. मग तेही करून पाहूया म्हणून ते गावी आलेले. थोडेसे चालल्यानेही त्या स्त्रीच्या टाचेतून रक्त येत होते. यांनी तिला नदीच्या पात्रातून थंड पाणी आणून दिले. देवाची पूजा, अभिषेक सारे त्यांनी यथासांग केलं. दुपारची वेळ असल्याने ते भुकेले होते. आजूबाजूला कुठे खानावळ आहे का त्यांनी विचारले. नवर्‍याने सांगितले, तशी गावात काहीच सोय नाही, पण तुम्ही माझ्या घरी भोजन प्रसाद घेऊ शकता. त्यांना खूप हायसं वाटलं. भुकेची वेळ, पोटात कावळे ओरडत होते. माझा नवरा त्यांना घेऊन घरी आला आणि मला त्यांना जेवायला वाढ म्हणाला. माझी काहीच तयारी नव्हती. घरात इतकं वाणसामानही नव्हतं. पण तरीही मी साधं डाळ-भाताचं जेवण करून वाढलं. त्यांना ते खूपच चविष्ट वाटलं. कदाचित ते भुकेले असल्याने असेल, पण ‘आम्ही अमृताचा प्रसाद सेवन करतोय असंच वाटलं’ असं त्यांनी कौतुक केलं.

पाहुणे खूपच खूश झाले. त्यांनी विचारलं कुणी केलं जेवण? यावर सासुबाईंनी माझी ओळख करून दिली. त्या बाईंनी माझ्या हातात एक शंभराची नोट ठेवली आणि ‘तू असं भक्तांसाठी प्रसादाचं जेवण बनवून त्यांना तृप्त करत रहा, तुझ्या हाताला चव आहे. तू खरी अन्नदा आहेस,’ असं सांगितलं. माझं मन त्या आशीर्वादाने भरून पावलं. त्याकाळात त्या शंभरच्या नोटेचं आम्हाला फारच अप्रूप वाटलं. मी ती नोट तशीच जपून ठेवली आणि तेव्हापासून माझं अन्नदानाचं काम सुरू ठेवलं. त्या दिवसापासून मंदिरात येणारा भक्त, पै-पाहुणा आमच्याकडे जेवूनच पुढे जाऊ लागला आणि त्याची अशी प्रसिद्धी लोकांकडूनच वाढत गेली. आता लोक या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हणून येतात, नवस फेडायला येतात, मुख्य म्हणजे मला ती नोट मोडून सामान आणायची कधीच वेळ आली नाही. माझ्यासाठी ती नोट भाग्यशाली ठरली म्हणून मी ती अशी फ्रेम करून इथे लावलीय. तेव्हा मी सुरू केलेली छोटीशी खानावळ आज अशा हॉटेलमध्ये बदलली त्याला कारण या नोटेचा पायगुण असं मी मानते. पुढे मध्यंतरी कुणा भक्ताने आम्हाला गाय दान केली. मग तिचं चारापाणी, दाणागोटा करता करता दूध-दुभत्याचा पसारा वाढला. उत्पन्नात वाढ होत गेली. मग स्वतःची थोडी जमीन घेऊन तिथं आधी साधीशीच खानावळ सुरू केली, त्याच जागेत आज हे हॉटेल उभे राहिलेय.’’ तिची कहाणी सांगून संपली.
लोक आता तिचं नाव एक उद्योजिका म्हणून घेतात. त्या शंभराच्या नोटेचा पायगुण की तिची कष्टाळू, जिद्दी वृत्ती? की या दोन्हीचा मिलाफ? तिचं ध्येय साध्य झालं यात शंका नाही. ती नोट एक निमित्तमात्र, पण जिद्दीने करणार्‍याला दाही दिशा मोकळ्या असतात हे खरंय. तिच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट होता, ज्याने तिला एक जगण्याची दिशा मिळवून दिली.