व्हेटरन्स बॅडमिंटनमध्ये डॉ. कुडचडकर यांना रौप्य

0
114

गोव्याच्या डॉ. सतीश कुडचडकर यांनी आपले सहकारी मुरली एम.डी. यांच्यासह खेळताना योनेक्स सनराईज अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत ७० वर्षांवरील गटात रौप्यपदकाची कमाई केली. रविवारी बंगलोर येथे समारोप झालेल्या या स्पर्धेत सतीश-मुरली जोडीला स्पर्धेसाठी तिसरे मानांकन लाभले होते. उपांत्य फेरीत डी. हेगडे व बसंत कुमार शिकारी यांचा २१-१०, २२-२० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर फायनलमध्ये त्यांना जयराज जी. व दारायस सूर्ती या अव्वल मानांकित जोडीने २१-७, २१-१८ असे पराजित केले. डॉ. कुडचडकर यांनी ७० वर्षांवरील पुरुष एकेरीत कांस्यपदकाची कमाई केली. उपांत्य फेरीत त्यांना बसंत कुमार शिकारी यांनी २१-१२, २१-११ असे हरविले.

गोव्याचे बॅडमिंटनपटू संध्या मेलाशिमी, संदीप कांजी व कमलेश कांजी यांनी देखील पदकांची कमाई केली. माजी राज्य विजेत्या संध्या व संदीप यांनी एकेरीत तर कमलेश यांनी मिश्र दुहेरीत पदक मिळविले. महिलांच्या ३५ वर्षांवरील गटात संध्या यांना अंतिम फेरीत अदिती रोडेकडून १९-२१, १९-२१ असा पराभव मान्य करावा लागला. पुरुषांच्या ४५ वर्षांवरील गटाक संदीप कांजी यांनी अव्वल मानांकित अजय साळवी यांना २१-१९, १५-२१, २१-१९ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. परंतु, आदित्य रामराव यांच्याकडून त्यांना २२-२०, ८-२१, २१-१५ असा पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ४० वर्षांवरील मिश्र दुहेरीत कमलेश कांजी व यानिया टाव यांना अव्वल मानांकित रविंदर सिंग व सुझान वेंगलेट यांच्याकडून २१-११, २५-२३ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना कांस्यपदकावर संतुष्ट व्हावे लागले.