व्युत्पन्न, रसज्ञ आणि मर्मज्ञ प्रा. शंकर वि. वैद्य

0
226

‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या गाजलेल्या गीताचे रचनाकार, मराठी साहित्य क्षेत्रात ‘सर’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. शंकर वैद्य यांचे काल मुंबईत वृद्धापकाळाने ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या साक्षेपी, कृतिशील व समर्पित जीवन-साहित्य-कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी घेतलेला आढावा.
मराठी साहित्यविश्‍वात कविता, कथा आणि काव्यसमीक्षा या क्षेत्रांत तेजस्वी नाममुद्रा निर्माण करणारे प्रा. शंकर वि. वैद्य यांचे वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व अतिशय समृद्ध आणि अभिरुचिसंपन्न होते. मराठी साहित्याचे ते निस्सीम उपासक. त्यात जुने-नवे असा भेद ते कधीही करीत नसत. गीर्वाणभारतीचे त्यांच्यावर सखोल संस्कार झालेले. छंदशास्त्रावर त्यांची विलक्षण हुकमत. रामायण- महाभारत हा त्यांच्या अभ्यासाचा, निदिध्यासाचा आणि चिंतनाचा विषय.
मराठीचेनामवंत प्राध्यापक वैद्य यांचे ज्ञानदेव आणि तुकाराम हे जिव्हाळ्याचे. विशेष म्हणजे केशवसुत, भा. रा. तांबे, स्वातंत्र्यवीर सावरकर, बालकवी, गोविंदाग्रज, मनमोहन, कुसुमाग्रज, इंदिरा संत आणि बा. सी. मर्ढेकर या आधुनिक कवींवर त्यांनी लिहिलेली समीक्षा वाचणे हा एक आनंदानुभव आहे. मर्मदृष्टीने काव्यानुभूतीच्या तळाशी कसे जावे हे प्रा. वैद्यसरांकडून शिकावे. कवितेपुरते त्यांचे अभ्यासक्षेत्र मर्यादित नाही. आपल्या पिढीनंतरच्या कवींच्या काव्याचा त्यांनी आस्थेने आणि स्वागतशील वृत्तीने अभ्यास केलेला आहे. अमोघ शब्दशक्तीच्या आधारे ते आपल्या विचारांची मांडणी करीत. तिला चिंतनशीलतेची जोड प्राप्त झालेली असे.
ते अनाग्रही व्यक्तिमत्त्व होत. पूर्वग्रहविरहित आणि चोख जीवनदृष्टी हे त्यांचे गुणवैशिष्ट्य.कोणत्याही अभिनिवेशापासून ते अलिप्त होते. शांत, संयत तरीही निरंतर कृतिशील जीवन ते जगले. नव्या पिढीशी ते सतत संवाद साधीत असत.
बी.ए.च्या वर्गात असताना आम्हाला कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ कवितासंग्रह अभ्यासासाठी लावला होता. त्याच सुमारास ‘रसयात्रा’ हा कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला होता. प्रा. वैद्यसरांची त्याला लाभलेली एकोणचाळीस पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना ही कुसुमाग्रजांच्या जीवनधारणेच्या आकलनासाठी उपयुक्त तर ठरलीच; शिवाय आयुष्यभराच्या अक्षय आनंदाची ठेव ठरली. ‘सत्यकथा’मधून केशवसुत, सावरकर, इंदिरा संत यांच्या कवितेचे अंतरंग उकलून दाखविणारे प्रदीर्घ लेख वाचताना याच प्रतीचा उच्चतम आनंद प्राप्त झाला. ‘आदित्य’मधील लोककवी मनमोहनांच्या कवितेची त्यांनी केलेली मीमांसा वाचनात आली. त्यांच्या अनुभवसिद्ध गहिरेपणाचा प्रत्यय येत गेला. १९८० मध्ये डिचोली येथे पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ‘गोमंतक मराठी साहित्यसंमेलन’ प्रसंगी प्रा. शंकर वि. वैद्यसर भेटले होते. परिचय झाला. त्यांचे प्रसन्न, व्युत्पन्न आणि गोष्टीवेल्हाळ रूप अनुभवले. ‘कालस्वर’मधील काव्यानुभूतीचे दर्शन त्यापूर्वीच घडले होते. ‘आला क्षण… गेला क्षण’ या कथासंग्रहाचे वाचन झाले होते. त्यांच्या वाङ्‌मयीन रूपाप्रमाणेच त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न आणि विलोभनीय वाटले. येथून गोवा, पुणे आणि मुंबई येथे पुनःपुन्हा गाठीभेटी होत राहिल्या आणि अनुबंधाचे धागे उत्तरोत्तर दृढ होत गेले. मराठीच्या क्षेत्रात कृतिशील राहिलेले प्राचार्य गोपाळराव मयेकर आणि प्रा. एस. एस. नाडकर्णी हे त्यांचे एलफिन्स्टन महाविद्यालयातील आवडते विद्यार्थी हे मागाहून कळले आणि त्यांच्याशी असलेले आदराचे व ममत्वाचे नाते दुणावले. १९८५ च्या दरम्यान पुण्यात नू.म.वि.च्या प्रांगणात डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांची त्यांच्या आयुष्याच्या संध्याकालीन समयी भेट झाली असता ‘स. प. कॉलेजमधील तुमचे कोणते विद्यार्थी तुम्हाला सतत आठवतात?’ असे विचारले असता क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी प्रा. शंकर वि. वैद्य, डॉ. सरोजिनी वैद्य, वि. स. वाळिंबे, डॉ. विद्याधर पुंडलिक आणि श्री. ग. माजगावकर यांची नावे अभिमानाने घेतली होती. कारण ज्ञानक्षेत्र हाच त्यांचा श्‍वास होता; तोच त्यांचा ध्यास होता.
प्रा. शंकर वि. वैद्य यांच्या लौकिक जीवनाचा प्रवास न्याहाळून पाहण्यासारखा आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात ओतूर येथे १५ जून १९२८ रोजी झाला. येथील निसर्गसान्निध्यात त्यांचे बालपण गेले. तेराव्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी ते जुन्नरला गेले. शिवाजीमहाराज आणि तानाजी यांच्या कर्तृत्वशक्तीच्या खाणाखुणा या परिसरात उमटलेल्या आहेत. संवेदनक्षम वयात प्रा. वैद्यसरांवर येथील समृद्ध ऐतिहासिक परंपरेचे आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. कवी वासुदेव ज्योतिराम देशपांडे हे त्यांचे शिक्षक. काव्यलेखनासाठी त्यांचे त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. त्यामुळे छंदःशास्त्राची त्यांची बैठक पक्की झाली. स्नेहमंदिरात डॉ. अजय वैद्य यांनी छंदःशास्त्रविषयक त्यांची मुलाखत घेतली असता त्यांनी ही आठवण अवर्जून सांगितली होती. शालेय वयात भर्तृहरी, वामनपंडित आणि रघुनाथपंडित यांच्या रचनांचा अभ्यास त्यांनी केला. विविध वृत्तांमध्ये रचना करण्याचा छंद त्यांना होता.
१९४६ मध्ये सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश मिळविला. पूर्णवेळ नोकरी करून आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात आधुनिक कवितेचा अभ्यास तर त्यांनी केलाच; पण त्याचबरोबर या महनीय व्यक्तींना भेटण्याची अपूर्व संधी त्यांना लाभली. काव्यस्पर्धांमध्ये त्यांच्या कवितांना पारितोषिके मिळाली. बी.ए. आणि एम.ए.च्या परीक्षांमध्ये मराठी विभागात सर्वप्रथम आल्याबद्दल पुणे विद्यापीठातील अनेक पारितोषिकांचे ते मानकरी ठरले.
प्रा. वैद्यसरांनी एलफिन्स्टन महाविद्यालय (मुंबई), विदर्भ महाविद्यालय (अमरावती) आणि इस्माईल युसुफ महाविद्यालय (मुंबई) येथे मराठीचे अध्यापन केले. इस्माईल युसुफ महाविद्यालयात तेवीस वर्षांचा दीर्घकाळ त्यांनी अध्यापनप्रक्रियेत घालविला. येथील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी त्यांनी ‘इस्माईल युसुफ कॉलेजचे दिवस’ या ‘ललित’मधील अप्रतिम लेखात लिहिल्या होत्या. हा काळ म्हणजे त्यांच्या वाङ्‌मयीन कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू होता. महानगरातील आणि भोवतालच्या परिसरातील वाङ्‌मयीन चळवळींशी प्रा. वैद्यसरांचा निकटचा संबंध होता. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात वाङ्‌मयीन विषयांवर त्यांची विद्वत्ताप्रचुर आणि रसमुग्ध करणारी व्याख्याने होत असत. बडोद्याच्या मराठी वाङ्‌मय परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. सामाजिक आशयाच्या कवितेच्या संदर्भात त्यांनी त्यावेळी मूलगामी विचार मांडले होते. अ. भा. मराठी साहित्यसंमेलनात काव्यवाचन आणि कविसंमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी वेळोवेळी वाहिलेली आहे. मराठी कवितेचे अक्षांश-रेखांश जाणणारा विचक्षण अभ्यासक आणि समीक्षक अशी त्यांची ओळख मराठी साहित्यजगताला आहे. रामायण हा त्यांचा चिंतनाचा विषय. मूळ रामायणाची संहिता त्यांनी अभ्यासली आहे; शिवाय वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी केलेल्या रामायणाच्या अनुवादाचे परिशीलन दीर्घकाळपासून केलेले आहे. मडगावच्या ‘गोमंतविद्या निकेतन’मध्ये हनुमान हा केवळ रामाचा सेवक नसून राजनीतिनिपुण कसा आहे या विषयाची मांडणी त्यांनी उत्तम प्रकारे केली होती. पुण्याच्या ‘वसंत व्याख्यानमाले’त त्यांनी ‘रामायणातील सौंदर्य’ या विषयावर मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान दिले होते. त्यात त्यांच्या विचारांचे वेगळेपण सिद्ध झाले होते. ते म्हणाले होते ः
‘‘राम हे आपल्या जीवनात प्रतीक होऊन बसलेेले आहे. शक्तीची देवता या नात्याने तिने आपल्यावर संस्कार केलेला आहे. रामायणातील एक एक दालन महत्त्वाचे. हे रामायण घडलेले असले पाहिजे. इतिहासातील व्यक्तीला काव्यरूप येताना ती व्यक्ती वेगळी होते. शोकाला श्‍लोकरूप प्राप्त होते. आपण रसाच्या पातळीवर आस्वाद घेत असतो. राम पोरका आहे. फसविला गेला आहे. पराभूत झालेला आहे. म्हणून त्याचे-आमचे गोत्र जुळते. मनुष्यजातीशी त्याचे नाते आहे. रामाचे अनेक पैलू रामायणात पाहावयास मिळतात. रावणापेक्षा राम मोठा कसा हे वाल्मिकीने दाखविले आहे. कलावंत हा व्यक्तिचित्राचा पिता आहे. ज्यावर लिहावे त्यापेक्षा कलावंत मोठा असावा लागतो.’’
१९६० नंतरच्या कवी-कवयित्रींचे संग्रह ‘पॉप्युलर प्रकाशन’ने ‘नवे कवी… नवी कविता’ या मालिकेत प्रसिद्ध केले. त्यांतील चौथा कवितासंग्रह म्हणजे प्रा. शंकर वि. वैद्य यांचा १९७१ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘कालस्वर.’ त्यांचा दुसरा कवितासंग्रह ‘दर्शन’ हा १९९८ मध्ये प्रकाशित झाला. महत्त्वाच्या वाङ्‌मयीन नियतकालिकांतून, दिवाळी विशेषांकांमधून त्यांच्या आशयघन कविता सातत्याने प्रसिद्ध होतात. आपले कविमन त्यांनी सदैव ताजे टवटवीत ठेवले. अभिरूची मोकळी ठेवली.
गतीतून अखंड उलगडत जाणारा काळ आणि काळ- एक अटळ विनाशशक्ती या दोन्ही दृष्टींनी काळाचा अनुभव कविमनाला असंख्य वेगवेगळ्या रूपांत जाणवतो. प्रेमानुभूतीची अभिव्यक्ती ते संयत भाषेत करतात. उदा.
समुद्ररंगी अथांग खेळे तव लालस मन
बघता बघता उरे किनार्‍याइतुके मीपण!
(पापणिच्या काठावर/‘कालस्वर’)
—————–
फुलाफुलांचा प्रवाह
न्हाते तेच एक मन
तुझा रंग माझा गंध
एका फुली ये फुलून
(धागा/‘कालस्वर’)
—————–
तुझ्या रतिसांद्र डोळ्यांतला
हा अभिषेक भोगताना
माझेच सर्वस्व होते अनावर
निर्झरत्या सुखधारा
अभिषिक्त तू
अभिषिक्त मी….
….दिशाकार डोळ्यांत भरलेला आनंद
आनंदकलश ओसंडणारा!
(अभिषेक/‘कालस्वर’)
——————
वास फुलाचा घेताना
तूच व्हायचीस फूल
स्पर्श गंधात अबोल
(वास फुलाचा घेताना/‘कालस्वर’)
निसर्गानुभूतीची ओढही या कविमनाला आहे. ‘कालस्वर’मधील ‘थेंब!’, ‘काजवा’, ‘एक अनुभव… स्वप्नातला’, ‘श्रावणसरी’, ‘ऊन!’, ‘यायची तू’, ‘रूळ’, ‘आज हवेला’, ‘रंग’, ‘ओंजळ’, ‘श्रावण-संध्या’, ‘स्पंदन’, ‘मी पाहिलेली कळी’ आणि ‘पक्षी’ या कवितांमधून निसर्गाच्या छटा आणि भावानुभूती यांचे साहचर्य आढळते.
चिंतनशीलता हादेखील या कविमनाचा गुणविशेष आहे. अलीकडच्या ‘हात’ (‘मौज’/दिवाळी २०११), ‘जिथे-तिथे रामायण’ (‘लोकमत’/दीपोत्सव २००७) या कवितांतून तो दिसून येतो.
****