व्याघ्र संवर्धनाचे फलित

0
102

जवळजवळ शतकानंतर आता जगभरातील जंगलांमधील वाघांची संख्या हळूहळू वाढू लागल्याचा निष्कर्ष जागतिक पाहणीत अलीकडेच काढण्यात आला. गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या तेरा देशांच्या एका परिषदेच्या वेळी यासंबंधीचा अहवाल प्रसृत करण्यात आला होता. त्यातही वाघांची संख्या वाढत असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झाले होते. रानावनांतील वाघांची संख्या वाढत असल्याच्या या वृत्ताचे महत्त्व भारतासाठी मोठे आहे, याचे कारण आज संपूर्ण जगामध्ये जे वन्य वाघ आहेत, त्यापैकी अर्ध्याहून अधिक केवळ आपल्या भारतामध्येच आहेत. विसाव्या शतकाच्या सुरवातीला संपूर्ण जगभरामध्ये राना – वनांमध्ये जवळजवळ एक लाख वाघ होते असे म्हणतात, परंतु त्यांची संख्या नंतरच्या काळात झपाट्याने कमी कमी होत गेली. एक तर जंगले नष्ट झाली. दुसरे म्हणजे वाघाच्या कातड्याला, हाडांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मोठी किंमत येऊ लागल्याने शिकारीत वाढ झाली. परिणामी वाघांची प्रजाती झपाट्याने नष्ट होत चालली. त्यामुळे एकविसावे शतक उजाडेपर्यंत वाघांची संख्या कमी कमी होत एवढी खालावली की, सन २०१० मध्ये झालेल्या पाहणीत संपूर्ण जगामध्ये केवळ ३२०० वाघ शिल्लक राहिले असल्याचे धक्कादायकरीत्या आढळून आले. त्यामुळे वाघ वाचवण्यासाठी संघटित आणि व्यापक प्रयत्न सर्व स्तरांवर सुरू झाले. वाघांच्या सर्वेक्षणांसाठी तंत्रज्ञानांची मदत घेतली जाऊ लागली. कॅमेर्‍यांचा वापर केला जाऊ लागला. शास्त्रोक्त गणना केली जाऊ लागली. या सार्‍यांतून वाघांची नेमकी संख्या स्पष्ट होऊ शकली. पर्यावरणविषयक नियम अधिक कडक झाल्याने संरक्षित व्याघ्रक्षेत्रे निर्माण होऊ शकली. अभयारण्यांचा विद्ध्वंस थांबला. याची परिणती म्हणून वाघांचे संवर्धन होण्यास मोठा हातभार लागला आहे. वन्य प्राण्यांची शिकार हा अत्यंत गंभीर गुन्हा गणला जाऊ लागल्याने शिकारीचे प्रमाणही कमी होत चालले आहे. वन्य प्राण्यांच्या संवर्धनासंबंधी जनजागृतीही वाढली आहे. त्याचेही सुपरिणाम दिसून येत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून का होईना, परंतु जगातील वन्य वाघांचे प्रमाण वाढू लागल्याची सुवार्ता आली आहे. भारतामधील वनांमध्ये, अभयारण्यांमध्ये मिळून एकूण २२२६ वाघ असल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. म्हणजेच जगातील एकूण वाघांच्या संख्येच्या अर्ध्याहून अधिक वाघ केवळ आपल्या भारतामध्ये शिल्लक उरले आहेत. साहजिकच आपल्या देशावरील व्याघ्र संवर्धनाची जबाबदारी कितीतरी पटींनी वाढते. त्यासाठी अधिकाधिक व्यापक प्रयत्नांची निकडही भासू लागली आहे. कंबोडियासारख्या देशामध्ये एकेकाळी वाघांचे प्रमाण मोठे असे. आज तेथे नावालाही वाघ शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, मुद्दामहून वाघ आणून जंगलात सोडण्याची पाळी त्या देशावर आली आहे. इंडोनेशियासारख्या देशातील वाघांची संख्याही अशीच झपाट्याने कमी होत चालली आहे. त्यामुळे केवळ भारत, रशिया, नेपाळ, भूतान आदी आशियाई राष्ट्रांमध्ये व्याघ्र संवर्धनासाठी झालेल्या प्रयत्नांचे फलित दिसू लागले आहे. त्यामुळे वाघांच्या संख्येत थोडी का होईना भर पडू लागली आहे. ही खरोखरीची संख्यात्मक वाढ आहे की सर्वेक्षणाच्या अधिक शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब केल्याने आणि अधिक वनक्षेत्र सर्वेक्षणाखाली आणल्याने ही संख्यावाढ दिसते आहे हा वादाचा विषय आहे, परंतु तरीही व्याघ्रसंवर्धनाच्या बाबतीत भारत अग्रेसर आहे हा दिलासा यातून मिळाला आहे. मात्र, या आकडेवारीवर नुसते समाधान मानण्यात काही अर्थ नाही. वन्य प्राण्यांची शिकार ही एक ज्वलंत समस्या आहे आणि त्या वन्य प्राण्यांच्या अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणारी प्रचंड किंमत लक्षात घेता मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय टोळ्या यात गुंतलेल्या असतात. अलीकडेच आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात एका गेंड्याची एके ४७ रायफलीने निर्घृण हत्या झाली होती. अशा गुन्हेगारी टोळ्या किती पाशवी पद्धतीने वन्य पशूंच्या जिवावर उठल्या आहेत याचे हे उदाहरण म्हणायला हवे. या शिकार्‍यांकडे एके ४७ आली कुठून? म्हणजेच यामध्ये आंतरराष्ट्रीय शिकार्‍यांचा हात आहे. अशाच प्रकारे वाघांच्या जिवावर माणसे उठली आहेत. व्याघ्रसंवर्धन मोहिमेच्या यशापासून स्फूर्ती घेऊन आता ‘बिग फाईव्ह’ मानल्या जाणार्‍या प्राण्यांपैकी अन्य नामशेष होत चाललेल्या प्राणीजातीच्या बचावासाठी पावले उचलावी लागतील. अन्यथा हे प्राणी काही वर्षांनी चित्रांमध्येच उरतील!