व्याघ्र गणना फेब्रुवारी-मार्चमध्ये

0
711

दर चार वर्षांनी एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना यंदा फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात होणार आहे. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने या गणनेची तारीख अद्याप जाहीर केली नसल्याचे गोवा वन खात्यातील सूत्रांनी काल सांगितले. शेवटची व्याघ्र गणना २०१४ साली झाली होती. या गणनेत गोव्यातील वन क्षेत्रात ३ ते ७च्या आसपास वाघ असल्याचे आढळून आले होते असे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय यांच्यातर्फे हे वाघ गणनेचे काम हाती घेण्यात येते. ह्या वाघ गणनेच्या वेळी वाघांबरोबरच अन्य सर्व प्रकारच्या शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचीही गणना करण्यात येत असते. मात्र, जास्त भर असतो तो नामशेष होण्याचे भय असलेल्या वाघांच्या गणनेकडे असे सूत्रांनी स्पष्ट केले.

देशभरातील सर्व राज्ये व संघ प्रदेशांत हे व्याघ्र गणनेचे काम पुढील फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी म्हणजेच खात्यातील कर्मचार्‍यांना त्यासाठीचे खास प्रशिक्षण वगैरे देण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले असल्याचे सूत्रांनी नमूद केले. व्याघ्र व अन्य प्राण्यांची गणना करण्यासाठी त्यांच्या विष्ठेचे नमुने, पावलांचे ठसे, नखांचे नमुने, नखांमुळे झाडांच्या खोडांवर उमटलेले ओरखडे आदी विचारात घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ह्या गणनेच्या वेळी वन क्षेत्रातील प्राण्यांबरोबरच विविध प्रकारची झाडे, वृक्ष व गवत आदींचीही पाहणी करून त्यासंबंधीचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे सूत्रानी स्पष्ट केले. कुठल्या वन क्षेत्रात कुठल्या प्रकारचे प्राणी असू शकतात हे कळण्यास त्याची मदत होऊ शकते. ह्या गणनेचे काम झाल्यानंतर ज्या वनक्षेत्रात वाघ असल्याचे पुरावे हाती लागलेले असतात त्या क्षेत्रात त्यांना कॅमेर्‍यावर टिपण्यासाठी कॅमेरे बसवण्यात येतात. कॅमेर्‍यांवर वाघांचे फोटो टिपले गेले की वाघांचे छायाचित्रांतून दर्शन होऊ शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.