व्यक्ती जाते, विचार नव्हे

0
149

काश्मीरमधील ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांसह झालेली निर्घृण हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. बुखारी हे काही काश्मिरी फुटिरतावादाला ठामपणे विरोध करणारे पत्रकार नव्हते. फक्त त्यांची लेखणी काहीशी संतुलित राखण्याचा ते प्रयत्न करीत आणि तोच त्यांचा गुन्हा ठरला. मोटारसायकलवरून आलेल्या तिघांंनी ते आपल्या ‘रायझिंग कश्मीर’ च्या कार्यालयाबाहेर पडत असताना त्यांच्यावर निर्दयपणे गोळ्या झाडल्या. आपल्या मृत्यूच्या काही तास आधी खरे तर शुजात बुखारी ट्वीटरवरून संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांनी काश्मीरसंदर्भात जारी केलेल्या भारतविरोधी अहवालाचे जोरदार समर्थन करीत होते. आपल्यावरील पक्षपाती वार्तांकनाच्या आरोपाला खोडून काढत होते. असे असतानाही बुखारी यांच्यासारख्या संपादकाची हत्या होते याचा अर्थ काश्मीरमधील पत्रकारांनी यत्किंचितही समतोल, संतुलित भूमिका घेता नये असे पाकिस्तानला वाटते आणि जे अशी भूमिका घेतील त्यांची हीच गत होईल असे जणू या हत्येने दहशतवाद्यांनी सूचित केलेले आहे. काश्मीरमध्ये शांतता नांदावी ही बुखारींची भूमिकाच दहशतवादी शक्तींना झोंबली असावी. एखाद्या निःशस्त्र पत्रकाराचा अशा प्रकारे गोळ्या झाडून काटा काढणे हा काही पराक्रम नव्हे. तो भेकडपणा आहे. आपल्या वैचारिक प्रतिस्पर्ध्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनी करायची हिंमत आणि धमक नसलेल्या व्यक्ती आणि संघटनाच अशा भ्याड मार्गांचा अवलंब करीत असतात. बुखारी यांनी वेळोवेळी काश्मीरसंदर्भात केंद्र सरकारला ठणकावले होते. ‘रायझिंग कश्मीर’ मधील त्यांच्या ‘ऑन द रेकॉर्ड’ या साप्ताहिक स्तंभातील त्यांचे लेख याची साक्ष देतात. लष्कराला काश्मीरमध्ये असलेल्या विशेषाधिकारांना, काश्मीरमधील पब्लिक सेफ्टी ऍक्टला त्यांचा विरोध होता. काश्मिरी तरुण भारताचा तिरस्कार करतात असे त्यांचे म्हणणे होते. निवडणुका जवळ आल्याचे पाहून अफजल गुरूला का फाशी दिलेत असा सवाल त्यांनी एकदा एका जाहीर कार्यक्रमात कपिल सिबलना विचारला होता. पण आपली ठाम मते असणे हे अनेकदा नुकसानकारक ठरत असते. काश्मीरसारख्या अत्यंत संवेदनशील विषयामध्ये तर स्वतःचा तोल या वा त्या बाजूने यत्किंचितही ढळू न देता नित्यनेमाने घडणार्‍या घटनांवर लेखन करणे ही तेथील पत्रकारांसाठी फार मोठी कसोटीच असते. तरीही काश्मीरमध्ये हिंमतीने पत्रकारिता केली जाते. पण लेखणी हे कितीही प्रभावी शस्त्र असले तरी शेवटी बंदुकीचा मुकाबला करू शकत नाही. बुखारींवर यापूर्वी तीन वेळा प्राणघातक हल्ला झाला होता. नव्वदच्या दशकात इखवान या दहशतवादी संघटनेने त्यांच्यासह एकोणिस पत्रकारांचे अपहरण केले होते. काश्मीरमध्ये पत्रकारिता करताना जिवंत राहणे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे असे त्यांनी एकदा आपल्या स्तंभात लिहिले होते. त्यांच्या दैनिकाच्या कालच्या अंकात त्यांचे काही जुने स्तंभलेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामधून काश्मीरचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न ते सतत कसे करीत आले होते हे पाहायला मिळते. असे असूनही त्यांची राजरोस हत्या होते यावरून काश्मीरमधील परिस्थितीची कल्पना येते. रमझानच्या काळात मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींच्या आग्रहावरून केंद्र सरकारने तेथे युद्धविराम लागू केला. परंतु खोर्‍यात शांती निर्माण करण्यासाठी पुढे केल्या गेलेल्या या हाताला प्रतिसाद देण्याऐवजी दहशतवादी शक्तींनी रक्तरंजित कारवाया सुरूच ठेवल्या. शुजात बुखारींची हत्या हा त्यातील सर्वांत मोठा धक्का आहे. एक मात्र झाले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त झैद अल हुसेन यांनी नुकत्याच काश्मीरसंदर्भात जारी केलेल्या ४९ पानी भारतविरोधी अहवालाचे समर्थन करण्यासाठी पुढे सरसावलेल्या ढोंगी मानवतावाद्यांची या हत्येमुळे बोलती बंद झाली आहे. हा अहवाल जारी होताच त्यांना एकाएकी कंठ फुटला होता. काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे कसे हनन सुरक्षा दलांकडून चालले आहे, बळाचा आत्यंतिक वापर कसा होतो आहे, निरपराध नागरिकांची हत्या कशी होते आहे, लष्कराचे व पोलिसांचे विशेषाधिकार तेथील जनतेला न्यायापासून कसे वंचित ठेवत आहेत असा गळा काढणार्‍या या अत्यंत एकतर्फी अहवालाचा पर्दाफाश या हत्येच्या घटनेमुळे झाला आहे. हा अहवाल अत्यंत वरवरचा आहे. त्यात भारताला सतरा शिफारशी करण्यात आल्या आहेत, तर पाकिस्तानला केवळ सात. संयुक्त राष्ट्रसंघाने काश्मीरसंदर्भात चौकशी आयोग नेमावा असे हा अहवाल म्हणतो. पण केवळ ठराविक घटनांचा संदर्भ घेत त्यात भारतावर आरोप करण्यात आलेले आहेत. परंतु त्या घटना का घडल्या, त्यांची पार्श्वभूमी काय हे शोधण्याचा तीळमात्र प्रयत्न त्यात करण्यात आलेला नाही. फक्त आपल्या देशातील काही उघड आणि बर्‍याचशा छुप्या देशद्रोह्यांच्या हाती आयते कोलीत मात्र त्याने दिले आहे. पण काश्मीरमध्ये दहशतवाद कोणत्या पातळीवर पोहोचलेला आहे आणि संतुलित भूमिका घेणेही खोर्‍यात कसे कठीण बनलेले आहे हेच शुजात बुखारींची हत्या आज सांगते आहे. पण अशा हत्येने केवळ ती व्यक्ती जाते, तिचा विचार नव्हे!