व्यक्तिमत्वाचे आजार

0
318

– डॉ. प्रियंका सहस्रभोजनी (पर्वरी)

आधीच मानसरोगांबद्दल आपल्या समाजात खूप अज्ञान आहे. त्यात व्यक्तिमत्त्वाच्या विकारांची लक्षणे त्यामानाने गूढ असल्यामुळे तेसुद्धा एक विकार आहे हे सर्वसाधारण लोकांना समजत नाही.
जरीही या विकारांच्या लक्षणांमुळे त्या व्यक्ती आणि तिच्या संबंधितांचे बरेच नुकसान होत असले तरीसुद्धा त्याला स्वभावातील एक दोष म्हणून कधी आवश्यकतेपेक्षा जास्त सहन केले जाते…
 

प्रत्येक गोष्ट ही बरी की वाईट हे कसे ठरवले जाते तर ते आणखी काही नसून तिचे प्रमाण होय. हीच गोष्ट व्यक्तिमत्त्वाबद्दल सुद्धा खरी ठरते. कोणताही एक किंवा अनेक गुण सर्वसाधारण माणसांपेक्षा अतिरेकी प्रमाणात असेल तर त्याला ‘पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ म्हणतात. प्रसिद्ध मनोविश्‍लेषक सिगमंड फ्रॉइड म्हणतात- आपल्या मनाचे तीन भाग आहेत – १) अन-कॉन्शियस माइंड – बेशुद्ध किंवा बेसावध मन, २) प्रि-कॉन्शियस माइंड – अचेतन मन ३) कॉन्शियस माइंड – सावध मन.
आपल्या आयुष्यातली एकूण एक घटना आपल्या मेंदूमध्ये कुठेतरी साठलेली असते आणि त्यातला बराचसा भाग म्हणजे अनकॉन्शियस माइंड होय. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शिशु असतानाच्या गोष्टी तुम्हाला आठवत नाहीत, तर ते काही प्रमाणात चूक आहे, कारण त्या कुठेतरी तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ठेवलेल्या आहेत. उदा. तुम्ही पहिल्यांदा वाक्य बोलायला लागले तो प्रसंग.
सावध मनामध्ये या क्षणाला तुम्ही काय विचार करत आहात… त्या गोष्टी असतात आणि उरलेल्या सर्व अचेतन मनामध्ये असतात. या अचेतन मनातल्या गोष्टी योग्य प्रसंगी सावध मनामध्ये आणता येतात. पण बेशुद्ध मनातल्या नव्हे! उदा. तुम्ही दहावी कधी पास झालात, हे तुम्हाला लक्षात असते, पण कोणी प्रत्यक्ष विचारेपर्यंत तो दिवस तुम्ही सहसा मनात आणणार नाहीत. म्हणजेच तुमच्या सावध मनात आणणार नाही. तरीपण फ्रॉइडने शोध लावलेल्या मानसिक विश्‍लेषणानुसार हे काही प्रमाणात शक्य आहे. असो.
तर.. हे सर्व लक्षात घेता आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेले शेकडो बरे-वाईट प्रसंग आपल्या मनाच्या कोणत्यातरी कोपर्‍यात साठलेले आहेत. तार्किकपणे विचार केला तर या प्रसंगांचा परिणाम त्यांच्यापुरताच असायला हवा. पण इथेच सर्व अतर्क्य असते ते म्हणजे आपल्या बेसावध मनाला तर्क आणि कालरेखा समजत नाही. म्हणून अगदी तान्ह्या अवस्थेत का होईना.. उदा. एखादे संकट आले असेल तर त्याचा परिणाम फ्रॉइडच्या मते आपल्या वर्तमानात आपण कसे वागतो त्यात दिसून येतो. अशा रीतीने आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हाताळण्याची त्या व्यक्तीची एक पद्धत बनते- ज्याला आपण त्याचे व्यक्तिमत्व किंवा ‘पर्सनॅलिटी’ म्हणतो. परिस्थितीची जाण ठेवूनच सर्वसाधारण लोक ही पद्धत लवचिक ठेवतात आणि अनुभवाने परिस्थितीशी जुळवून घेतात. पण जेव्हा एखाद्याची ही पद्धत जास्त कडक होते किंवा त्या व्यक्तीमध्ये अधिक प्रमाणात ‘अनिष्ट गुणवैशिष्ट्ये’ असतात तेव्हा त्याला व्यक्तिमत्वाचे आजार किंवा अडथळा म्हणतात. यामध्ये निश्‍चितपणे त्या स्वभावाचे दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या दैनंदिन, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात झालेले दिसतात. आपल्या स्वतःच्या किंवा आवडीच्या वर्तुळात जरी या व्यक्ती ठीक वागत असल्या तरीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे लोक स्वतःसह आपल्या संबंधातल्या लोकांना बहुधा त्रासात पाडतात.

व्यक्तिमत्वातील दोषांचे प्रकार ः
माणसाचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत तयार होत असते. त्यातील दोषांचे मुख्य तीन प्रकार आहेत- क्लस्टर, पॅरानॉइड, सिझोटाइपल. या व्यक्ती समाजात जास्त लवकर उठून दिसतात कारण सर्वसाधारण माणसाला त्यांची विचार करण्याची पद्धत फार विचित्र वाटते. वाजवीपेक्षा जास्त संशयीपणा, वास्तविकतेबाहेरचे विचार (मॅजिकल थिंकिंग), अलीप्तपणा (लोकांपासून मुद्दाम दूर राहणे), नात्यांमध्ये भावनिक बंधन नसणे इत्यादी मुख्य गुण असले तरीसुद्धा तिन्ही प्रकारांमधील विशिष्ट गुणांमध्ये फरक आहेत.
क्लस्टर बी ः आत्मरती (नारसिसिस्ट), असामाजिक (अँटीसोशल), सीमावादी (बॉर्डरलाईन), ढोंगी (हिस्ट्रीयॉनिक) असे प्रकार असून , हे लोक खूप अनियंत्रित आणि धाडसी असतात व सर्वसामान्य लोकांपेक्षा आत्मकेंद्री असतात ज्यामुळे त्यांच्या संबंधितांना याचा त्रास होऊ शकतो.
कल्स्टर सी ः यामध्ये परावलंबी (डिपेंडंट), दुर्लक्षित (ऍव्हॉइडंट) आणि पछाडणारी सक्तीची (ऑब्सेसिव्ह-कंम्पल्सिव्ह) असे प्रकार असून या व्यक्ती सर्वसाधारण लोकांपेक्षा जास्त चिंताग्रस्त (ऍन्क्शियस) आणि प्रतिबंधित (इन्हिबिटेड) असतात.
वास्तविक कोणतीही व्यक्ती संपूर्णपणे कुठल्याही एका प्रकारची नसून तिच्यात एकापेक्षा जास्त प्रकारांचे गुणवैशिष्ट्ये असतात. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणदोषांचे संयोग असल्यामुळेच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ ही उक्ती खरी ठरते.
सर्वाधिक लोकांमध्ये वरील व्यक्तिमत्त्वाचे काही मोजके गुण असतात पण जसे मी प्रथम म्हटले- जेव्हा हे गुण प्रमाणाबाहेर जातात आणि माणसाच्या दैनंदिन जीवनात बाधा आणतात तेव्हा त्याची ‘डिस-ऑर्डर’ म्हणजे ‘अडथळा’ किंवा ‘विकार’ बनतो. कोणता गुण किती व्यक्त होतो आणि त्या गुणामुळे कुटुंब आणि समाजावर कितपत परिणाम/दुष्परिणाम होतो त्यावर समाजातील त्या व्यक्तीची स्वीकारार्हता अवलंबून असते.

व्यक्तिमत्त्वातील दोषांबद्दल माहिती का असावी?…
आधीच मानसरोगांबद्दल आपल्या समाजात खूप अज्ञान आहे. त्यात व्यक्तिमत्त्वाच्या विकारांची लक्षणे त्यामानाने गूढ असल्यामुळे तेसुद्धा एक विकार आहे हे सर्वसाधारण लोकांना समजत नाही.
जरीही या विकारांच्या लक्षणांमुळे त्या व्यक्ती आणि तिच्या संबंधितांचे बरेच नुकसान होत असले तरीसुद्धा त्याला स्वभावातील एक दोष म्हणून कधी आवश्यकतेपेक्षा जास्त सहन केले जाते किंवा त्या व्यक्तीला वाळीत टाकले जाते. परिणामतः आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता नसल्यामुळे अशा व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक, सामाजिक किंवा व्यावसायिक जीवन विस्कळीत होते. उदा. नोकरी-व्यवसाय, कौटुंबिक ताण-तणाव इत्यादी.
याउलट या विकारांबद्दल ज्ञान असल्यास वेळीच मार्गदर्शन घेण्यास समाज तत्पर राहील.

व्यक्तिमत्त्व विकार व मानसरोग तज्ज्ञ

व्यक्तिमत्त्वाचे विकार असलेले लोक सहसा मानसरोग तज्ज्ञांच्या ओपीडीमध्ये, त्यांच्या कौटुंबिक/सामाजिक/व्यावसायिक जीवनावर गंभीर परिणाम झाल्याशिवाय दिसत नाहीत किंवा आलेच तर इतर मानसिक तक्रारीं घेऊन येतात. कारण व्यक्तिमत्त्वाचे विकारग्रस्त व्यक्ती सर्वसाधारण लोकांपेक्षा जास्त प्रमाणात काही मानसिक रोगांचे रुग्ण असतात. उदा. दारु किंवा अंमली पदार्थांचे व्यसन, नैराश्य, चिंता आणि अगदी काही प्रकारांमध्ये सायकोसीस सुद्धा जास्त प्रमाणात आढळून येतात. याचे कारण आनुवंशिक, जुळवून घेण्याची कौशल्ये कमी असणे आणि इतर प्रतिकूल प्रसंग (जसे बालकांचा दुरुपयोग – चाईल्ड ऍब्यूज) इत्यादी अनेक कारणे असावीत.. असे म्हणतात.

उपाय ः
व्यक्तिमत्त्वाच्या विकाराचा कोणताच ठरावीक आणि निश्‍चित असा उपाय नाही. उपचाराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अनिष्ट वागणूक कमी करणे आणि दूरवरचे उद्दिष्ट म्हणजे आयुष्यातील प्रतिकूल प्रसंगांना योग्य रीतीने हाताळण्याबद्दल मार्गदर्शन आणि समुपदेशन करणे, जेणेकरून त्यांचे दैनंदिन जीवन मार्गी लागेल.

समुपदेशनाचे प्रकार हे व्यक्तिमत्त्वाच्या विकाराच्या प्रकारानुसार बदलते आणि नक्कीच बर्‍यापैकी व्यक्तिगत असते. समुपदेशन त्या व्यक्तीसोबत त्याच्या कुटुंबियांचे/संबंधितांचेदेखील गरजेप्रमाणे केले जाते- जेणेकरून त्यांना एकमेकांशी वागताना कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याबाबतीत मार्गदर्शन मिळते.
काही अनिष्ट गुण उदा. क्रोध, लहरी, चिंताग्रस्त इत्यादी अतिरेकी प्रमाणात असल्यास औषधोपचाराची गरज असते. विशेषतः जर त्या व्यक्तीला इतर मानसिक रोगांच्या तक्रारी असतील तर नक्कीच!
अशा वेळी नियमित आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार करणे गरजेचे ठरते.
स्वभावातील दोष हे एका मर्यादेपलीकडे बदलणे कठीण असते कारण ते त्या व्यक्तीची ओळख किंवा व्यक्तिमत्त्वाचा भाग असते. म्हणूनच
व्यक्तिमत्त्वाच्या विकारांवरील उपाय हा मानसरोगतज्ज्ञांकरता सर्वांत जास्त आव्हानात्मक गोष्टींपैकी एक आहे.