व्यंकय्यांचा विजय

0
100

भारताचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून अखेर व्यंकय्या नायडू यांची निवड झाली. एकाच सत्ताधारी पक्षाचे सदस्य राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि लोकसभा सभापती या तिन्ही महत्त्वपूर्ण घटनात्मक पदांवर आरूढ होण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. वरील पदांवरील व्यक्तीने पक्षातीत व्यवहार करावा अशी अपेक्षा असते आणि वरील सर्वांना त्याची नक्कीच जाण आहे. मात्र, ही मंडळी केवळ एका पक्षाचीच आहेत असे नव्हे, तर एकाच विचारधारेच्या मुशीतून घडलेली आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. कॉंग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमीची माणसे सामावलेली असायची, परंतु आपण सगळे एकाच कुटुंबाचे घटक आहेत असे खुद्द पंतप्रधान मोदी नुकतेच म्हणाले ते खोटे नाही. उपराष्ट्रपतीपदावरील व्यक्ती हीच राज्यसभेची अध्यक्ष असते. लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि सहयोगी पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आजवर भरभक्कम बहुमत जरी असले तरी राज्यसभेत सत्ताधारी आजवर अल्पमतात होते. नुकतेच त्यांना निसटते बहुमत प्राप्त झालेले आहे आणि भाजप हा राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे, पण कॉंग्रेसपेक्षा केवळ एका मताधिक्क्याने. बहुमत नसल्याने आतापर्यंत सरकारने राज्यसभेत पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी अध्यादेशांचाच मार्ग पत्करला होता. आता परिस्थिती बदलेल. व्यंकय्या नायडूंना उमेदवारी देताना भाजपने त्यांचा संसदीय व्यवहार हाताळण्यातील आजवरचा गाढा अनुभव विचारात घेतला होता. विरोधी पक्षांच्या महागठबंधनाने गोपाळकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीवर सर्वसहमती केली खरी, परंतु त्याची शाई वाळायच्या आत संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये राजद – कॉंग्रेसची साथ सोडून भाजपच्या साथीने आपले सरकार पुन्हा घडवले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही संयुक्त जनता दलाच्या मंडळींनी रामनाथ कोविंद यांच्या बाजूने मतदान केले. मात्र, या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांच्याच उमेदवारीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. गुप्त मतदानाने ही निवडणूकही होत असल्याने राजकीय पक्षांकडून व्हीप जारी केला जात नाही. त्याचा फायदा या निवडणुकीतही काहींनी उठविल्याचे दिसते. व्यंकय्या नायडू हे दाक्षिणात्य आहेत आणि राष्ट्रपतीपदावर रामनाथ कोविंद यांच्यासारखे उत्तर भारतीय आणि उपराष्ट्रपतीपदावर दाक्षिणात्य व्यंकय्या आरूढ झाल्याने खर्‍या अर्थाने आता संपूर्ण देशाला महत्त्वपूर्ण घटनात्मक पदांवर प्रतिनिधित्व मिळालेले आहे असे म्हणायला हरकत नसावी. नायडूंना अभाअद्रमुक, वायएसआर कॉंग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती आदींच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांची ही निवडणूक सुकर झाली. व्यंकय्या यांच्या निवडीबरोबरच हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपतीपदाची दोन कार्यकाळांची प्रदीर्घ कारकीर्दही संपुष्टात येत आहे. अन्सारी यांनी आपल्या कार्यकाळांमध्ये आपल्या पदाची शान राखली. राज्यसभेचे काम त्यांनी वेळोवेळी चांगल्या प्रकारे हाताळले. कोठेही आपल्यावर पक्षपाताचा ठपका येऊ दिला नाही, त्यामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले. आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द घालवलेल्या पक्षापासून दूर जाऊन निष्पक्षता निभावणे हे सोपे नसते हे खरे, परंतु त्या पदाची ती गरज आहे. नुकतेच निवृत्त झालेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अशी पक्षातीतता दाखवली, म्हणून तर पंतप्रधान मोदी यांना अत्यंत भावपूर्ण पत्र लिहून प्रणबदांच्या कारकिर्दीचा गौरव करावासा वाटला. आपण दोघे वेगळ्या राजकीय पक्षांतून कारकीर्द घडवली, वेगळ्या विचारधारांत घडलो, तरीही एकरूपतेने काम करू शकलो याविषयी मोदींनी त्यात आनंद व्यक्त केला आहे. भारतीय लोकशाहीचे हेच तर सौंदर्य आहे. ते राखण्याची जबाबदारी उपराष्ट्रपती व्यंकय्या पार पाडतील अशी अपेक्षा आहे.