वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री अमेरिकेला रवाना

0
95

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारांसाठी काल मध्यरात्री अमेरिकेला रवाना होत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे खास सचिव रूपेश कामत यांनी काल दिली.
सोमवारी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सरकारी अधिकारी व सत्ताधारी गटाचे मंत्री व आमदारांशी चर्चा करून आपल्या अनुपस्थितीत सरकारी कामकाज हाताळण्यासाठी तीन मंत्र्याची खास समिती स्थापन केली होती. त्यानंतर ते सहा आठवड्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला रवाना झालेे होते. मुख्यमंत्री पर्रीकर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये फेब्रुवारी महिन्यात सात दिवस वैद्यकीय उपचार घेऊन परतले होते. राज्यात परत आल्यानंतर त्यांनी वार्षिक अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु, त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना पाच दिवस गोमेकॉमध्ये उपचार घ्यावे लागले. त्यानंतर त्यांना १ मार्च रोजी गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आला होता.

त्यानंतर ५ मार्चला लीलावती हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी ते पुन्हा दाखल झालेे. लीलावती हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांना आजारावर पुढील उपचार घेण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा सल्ला दिला आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी एका पत्राद्वारे राज्यपालांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तसेच आपल्या अनुपस्थितीत काही दिवस सरकारी कामकाज हाताळण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तीन मंत्र्यांचा समावेश असलेल्या खास समितीची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा नियुक्त समितीकडून घेतली जाणार आहे. मंत्रिमंडळ सल्लागार समितीची ३१ मार्चपर्यंत दर आठवड्याला बैठक होणार आहे, असे राज्यपालांना कळविण्यात आले आहे.