वेस्ट इंडीजसमोर पाकिस्तानचे लोटांगण

0
127

>> केवळ २१.४ षटकांत संपूर्ण संघ १०५ धावांत गारद
>> ओशेन थॉमसचे चार बळी ः रसेल, होल्डरचा प्रभावी मारा

वेस्ट इंडीजच्या आखूड टप्प्यांच्या गोलंदाजीसमोर काल पाकिस्तान संघाने शरणागती पत्करली. विश्‍वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील विंडीजकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. विंडीजच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव २१.४ षटकांत अवघ्या १०५ धावांत गुंडाळून १३.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठताना पाकचा ७ गडी व तब्बल २१८ चेंडू राखून पराभव केला.

सलामीवीर ख्रिस गेलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडीजने लक्ष्य सहज गाठले. गेलने पाकच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३४ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. गेलने आपल्या अर्धशतकी खेळी दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हिलियर्स याचा विश्‍वचषकात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम मोडला. डीव्हिलियर्सच्या नावावर २३ सामन्यांत ३७ षटकार आहेत. तर गेलच्या षटकारांची संख्या २७ सामन्यांत ४० झाली आहे. ख्रिस गेलला निकोलस पूरनने चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ फलंदाजांना माघारी धाडले, मात्र धावसंख्येचे पाठबळ नसल्यामुळे यापलीकडे त्याला काही करता आले नाही. वहाब रियाझची धुलाई करत आमिरने टाकलेला दबाव हटविण्याचे काम विंडीजने केले.

तत्पूर्वी, विंडीजच्या गोलंदाजीचा सामना करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १०५ धावांमध्ये माघारी परतला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा जेसन होल्डरचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कॉटरेलचा चेंडू लेग साईडला मारण्याच्या नादात इमाम उल-हकला सोपा झेल देऊन परतला. यानंतर विंडीजने आखूड टप्प्यांचा मारा करत पाक संघाला गोत्यात आणले. पाकच्या एकाही फलंदाजाकडे विंडीजच्या या रणनीतीला उत्तर नव्हते. यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळतीच लागली. विंडीजच्या गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा मारा करत पाक फलंदाजांना नाकीनऊ आणले. फखर झमान आणि बाबर आझमने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. विंडीजकडून ओशेन थॉमसने ४, कर्णधार जेसन होल्डरने ३, आंद्रे रसेलने २ आणि शेल्डन कॉटरेलने १ १ बळी घेतला.

धावफलक
पाकिस्तान ः इमाम उल हक झे. होप गो. कॉटरेल २, फखर झमान त्रि. गो. रसेल २२, बाबर आझम झे. होप गो. थॉमस २२, हारिस सोहेल झे. होप गो. रसेल ८, सर्फराज अहमद झे. होप गो. होल्डर ८, मोहम्मद हफीझ झे. कॉटरेल गो. थॉमस १६, इमाद वासिम झे. गेल गो. होल्डर १, शादाब खान पायचीत गो. थॉमस ०, हसन अली झे. कॉटरेल गो. होल्डर १, वहाब रियाझ त्रि. गो. थॉमस १८, मोहम्मद आमिर नाबाद ३, अवांतर ४, एकूण २१.४ षटकांत सर्वबाद १०५
गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल ४-०-१८-१, जेसन होल्डर ५-०-४२-३, आंद्रे रसेल ३-१-४-२, कार्लोस ब्रेथवेट ४-०-१४-०, ओशेन थॉमस ५.४-०-२७-४
वेस्ट इंडीज ः ख्रिस गेल झे. शादाब गो. आमिर ५० (३४ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार), शेय होप झे. हफीझ गो. आमिर ११, डॅरेन ब्राव्हो झे. बाबर गो. आमिर ०, निकोलस पूरन नाबाद ३४, शिमरॉन हेटमायर नाबाद ७, अवांतर ६, एकूण १३.४ षटकांत ३ बाद १०८
गोलंदाजी ः मोहम्मद आमिर ६-०-२६-३, हसन अली ४-०-३९-०, वहाब रियाझ ३.४-१-४०-०

पाकिस्तानची विश्‍वचषकातील
नीचांकी धावसंख्या
७४ धावा वि. इंग्लंड, ऍडिलेड, १९९२
१०५ धावा वि. विंडीज, नॉटिंघम, २०१९
१३२ धावा वि. ऑस्ट्रेलिया, लंडन १९९९
१३२ धावा वि. आयर्लंड, किंग्सटन २००७
१३४ धावा वि. इंग्लंड, केपटाऊन २००३