वेध एशियाडचे लक्ष्य तलाशाचे

0
159

– श्रद्धानंद वळवईकर
विहंगम समुद्रकिनारे आणि या सुपीक प्रदेशातील ग्राम तथा शहरांना आल्हाददायक किनार देणार्‍या नद्या देशी तथा विदेशी पर्यटकांनाच नव्हे तर स्थानिक गोमंतकीयानाही आकर्षित करतात. येथील सुंदर मंदिरे, चर्चेस प्रसिध्दीच्या प्रवाहात आघाडीवर असली तर खळखळत्या नद्या, समुद्रकिनारे हे गोमंतकीय भूषण बनले आहेत. म्हणूनच एकाअर्थी पश्‍चिमी किनारपट्टीला सुशोभित करणारा हा अद्भूत प्रदेश जलक्रीडा स्पर्धा आणि जलतरणपटूंच्या नैसर्गिक विकासाचे एक मुख्यस्रोत होणे आवश्यक होते. अनुकूल नैसर्गिक वातावरणामुळे शेजारील केरळप्रमाणे गोव्यातूनही कौशल्यप्रधान जलतरणपटूंची निर्मिती अपेक्षित होती.
पण, विद्यमान काळात तलाशा सतीश प्रभूच्या स्वरूपात एकमात्र गोमंतकीय ‘जलपरी’ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी आव्हानात्मक जलप्रवाहाच्या विरोधात जलक्रमण करीत आहे. ही ‘जलपरी’ २०१२ सालच्या लंडन ऑलिंपिक्ससाठी राष्ट्रीय निवड चाचणीत निसरत्या फरकाने दुर्दैवी ठरली अन्यथा गोमंतकीय क्रीडा क्षेत्राने तलाशाच्या स्वरूपात ऐतिहासिक निवडीचे उत्साही क्षण अनुभवले असते.
लंडन ऑलिंपिक्सच्या अपात्रतेची आणि अपयशाची दरी सध्या ऐन रंगात आलेल्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा तसेच येत्या सप्टेंबर महिन्यात दक्षिण कोरीयामध्ये इन्चिओन येथे होऊ घातलेल्या प्रतिष्ठेच्या आशियाई क्रीडा स्पर्धांत पात्र ठरून मिटविण्यासाठी तलाशा प्रयत्नशील होती. पण, हाताला झालेल्या दुखापतीमुळे गेल्या वर्षभरात तिला विशेष स्पर्धात्मक सराव घेता न आल्याने ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धांत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दुर्दैवाने पुन्हा हुकली; पण ‘एशियाड’ स्पर्धांनी तिला एक सुसंधी प्राप्त करून दिलीय. इतिहास रचण्याची ‘जलपरी’ची संधी अजूनही ‘एशियाड’च्या स्वरूपात शिल्लक आहे आणि स्वत:च्या जिगरी वृत्तीने तिने ती कामही राखली आहे. ग्लासो राष्ट्रकुल स्पर्धांत सजन प्रकाश शरथ गायकवाड व संदीप सेजवल आदी भारतीय जलतरण चमूचे प्रतिनिधीत्व करीत असून आगामी आशियाई स्पर्धांत त्यांच्या दिमतीला स्थान मिळविण्यासाठी तलाशा आतुर आहे. भारतीय जलतरण महासंघाने ‘एशियाड’साठी मजबूत चमूची प्राथमिक निवड करण्यासाठी भोपाळ-मध्यप्रदेशमध्ये विशेष चाचणीचे आयोजन केले होते; यात तलाशा यशस्वी ठरलीय.
‘एशियाड’ पूर्व चाचणी शिबिराच्या या प्राथमिक फेरीत तलाशा प्रभूने कमाल करताना राष्ट्रीय प्रशिक्षक प्रदीपकुमारसह महासंघालाही चकीत केले. आपल्या आवडत्या ५० मीटर्स फ्रीस्टाईल प्रकारातून या ‘जलपरी’ने अवघ्या २६.९७ सेकंदांची वेगवान वेळ नोंदवून आगामी ‘एशियाड’साठी आपण सज्जतेच्या मार्गावर आहोत, हे दर्शवून दिले.
राष्ट्रीय चमूत पुनरागमनाच्या प्रक्रियेत स्वत:ला झोकून दिलेल्या तलाशाकडून सुधारीत तथा वेगवान कामगिरी निकषाची अपेक्ष नव्हतीच. परंतु, गेल्या वर्षभरात राष्ट्रीय प्रशिक्षक प्रदीपकुमार यांच्या पझमुख मार्गदर्शनाखाली बेंगलूर, पुणे आणि गांधीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सुसज्ज जलतरण प्रशिक्षण शिबिर तथा सुविधांचा तलाशाने अप्रतिम लाभ घेऊन स्वत:ला सुस्थापित केले आहे.
चाचणी प्रक्रियेत तलाशाने दिलेली २६.९७ सेकंदांची वेगवान वेळ महिला विभागातून यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम सिध्द झाली आहे. शिवाय २६ सेकंदांच्या आसपास ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत पूर्ण करणारी तलाशा भारताची अन्य एक वेगवान जलतरणपटू शिखा टंडननंतरची अवघी दुसरीच क्रीडापटू आहे. २००८ साली शिखाने अशी उपलब्धी प्राप्त केली होती.
प्रशिक्षक प्रदीपकुमार तलाशाच्या या चमकदार कामगिरीने समाधानी असून कामगिरीचा हा निकष अजून सुधारल्यास भारताच्या या द्वितीय मानांकीत जलतरणपटूची ‘एशियाड’ वारी यशस्वी व्हावी. जलतरणाच्या आंतरराष्ट्रीय मानांकनात ही गोमंतकीय ‘जलपरी’ शतकीय मजल गाठून उत्तरोत्तर प्रगती साधण्यासाठी धडपडत आहे. फ्रीस्टाईल रिले हा ही तिचा आवडीचा प्रकार आहे.
२१ वर्षीय या जिगरी जलतरणपटूने आपला प्राथमिक विकास गोवा जलतरण संघटनेच्या छायेत साधलेला असला तरी आंतरराष्ट्रीय दर्जाला अनुरूप प्रगत सुविधांचा राज्यात अभाव जाणवतो. याच काणारस्तव तलाशाला दरवेळी बेंगलूरू, पुणे आणि गांधीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण शिबिर तथा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणे फलदायी सिध्द झाले आहे.
वास्तविक शालेय जीवनात तलाशाला नृत्य प्रकारात ‘भरतनाट्यम’चा भारी लगाव होता. त्याच बरोबरीने गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कांपाल-पणजी येथील जलक्रीडा संकुलात नियमित घेण्यात येणार जलतरण प्रशिक्षण वर्गातही ती सहभागी व्हायची. वयाच्या नवव्या वर्षी तिने आत्मसात केलेले जलतरण कौशल्य भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे तज्ज्ञ जलतरण प्रशिक्षण थॉमस जोस तसेच गोव्याच्या माजी राष्ट्रीय जलतरणपटू नीशा मडगावकर यांना प्रभावित करून गेले. २००३ सालचे राज्य स्पर्धांतील तिचे पदार्पण पदकी यश स्वरुपाचे होते. वयाच्या दहाव्या वर्षीच स्पर्धात्मक राज्य जलतरण स्पर्धांत विजयी कामगिरी केल्याने पालकांच्या आग्रहास्तव तिने संपुर्णत: जलतरणवरच लक्षकेंद्रीत करून ‘भरतनाट्यम’वर अधिक भर देण्याचा नाद सोडला. अशा प्रसंगी गोव्यातील प्रतिभावंत क्रीडापटूंत तलाशाची गणना होऊ लागली होती, आणि गोमंतकीय क्रीडा क्षेत्राच्या उत्कर्षासाठी अथक झटणारे धेंपो उद्योग समुहाचे सर्वेसर्वा श्रीयुत श्रीनिवासराव धेंपो यांनाही तिची दखल घेणे भाग ठरले.
एका होतकरू युवा क्रीडापटूला प्रोत्साहन देण्याचे आपले कर्तव्य यशस्वीरित्या निभावताना श्रीयुत धेंपो यानी तलाशाची ‘धेंपो गूडवील ब्रॅन्ड ऍम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती केली. आजही विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि शिबिरांत भाग घेताना तिला या नियुक्तीचा विशेष लाभ होतो आहे. पुरस्कर्त्यांच्या प्रभावाने क्रीडापटूची प्रतिभा अद्भूत परिणाम साधू शकते, हे आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांतून चमकून या ‘जलपरी’ने आज दाखवून दिले आहे. तलाशाने राष्ट्रीय प्रतिनिधीत्व केलेल्या स्पर्धांत २००८ सालच्या पूणे येथील ३र्‍या राष्ट्रकुल यूवा स्पर्धा, २००९ सालच्या सिंगापूर येथील १ल्या आशियाई युवा स्पर्धा, २००९ सालच्याच जपान येथील ६व्या आशियाई वयोगटपातळीवरील स्पर्धा, याच वर्षीच्या दोहा येथील विश्व शालेय जलक्रीडा स्पर्धा, २०१० सालच्या ११व्या दक्षिण आशियाई फेडरेशन स्पर्धा (बांगलादेशमध्ये) आणि २०११ सालच्या इंडोनेशिया येथील एएएसएफ वयोगट पातळीवरील जलतरण अशा मुख्य स्पर्धांचा उल्लेख होतो. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांतून दोन सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांसह राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक प्रमुख जलतरण स्पर्धांतून पटकावलेली एकूण १७५ सुवर्ण, २६ रौप्य व १२ कांस्यपदके या ’जलपरी’ची असामान्य जलतरण प्रतिभा दर्शविते आहे. देशासाठी एकूण नऊ आंतरराष्ट्रीय जलतरण, स्पर्धांत प्रतिनिधीत्व केलेली ‘ती’ एकमात्र भारतीय क्रीडापटू आहे, हे विशेष तिच्या या पदकीय यशाची दखल घेऊन २००७ साली गोवा क्रीडा पत्रकार संघटनेने उत्कृष्ट क्रीडापटूसाठीचा ‘जीनो’ पुरस्कार तर २०११ साली राज्य शासनाने स्व. दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कार प्रदान करून तिला सन्मानित केले आहे. यशाची तलाशा आज ‘एशियाड’ पर्यंत पोहोचली आहे. या प्रतिष्ठेच्या ‘एशियाड’मध्ये देशाचे यशस्वी प्रतिनिधीर्तंव करण्याची संधी लाभावी याकरीता ही गोमंतकीय परी पूर्वतयारीला झटलेली आहे. ‘प्रयत्नांतीच यशाची किनार गाठता येते’ हे तत्वज्ञान तिने अनुभवलेले आहे. ‘एशियाड’चे लक्ष्य ती पूर्ण करीलही, पण पुढे पदकीय संघर्षात या ‘जलपरी’ची आणि तिच्या प्रतिभेची निर्णायक कसोटी लागावी.