वेदांताची खनिज वाहतूक आजपासून सुरू होणार?

0
119

>> स्थानिक ट्रकमालक धरणार गेटसमोर धरणे

कोडली येथील वेदांता कंपनीतर्फे आज सोमवारपासून पोलीस संरक्षणात खनिज वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. मात्र स्थानिकांनी ट्रक खाणीवर पाठवू नयेत तसेच सकाळी ८ वा. ट्रक मालकांनी कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. काल रविवारी कळसाई-दाबाळ येथील आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत स्थानिक आमदार दीपक पाऊसकर, सरपंच संदीप पाऊसकर, धारबांदोडा ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष बालाजी गावस, सावर्डे प्रोग्रेसिव फ्रंटचे अध्यक्ष वल्लभ दळवी, रमाकांत गावकर, मोहन गावकर, जितेंद्र नाईक व अन्य सुमारे ५०० हून अधिक ट्रकमालक उपस्थित होते. वेदांता कंपनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केलेल्या दरात वाहतूक करण्यासाठी सोमवारपासून पोलीस संरक्षणात प्रयत्न करणार आहे. मात्र ट्रक मालक १२.५० रुपये वाहतूक दर व डिझेल दर ५२ रुपये करावा या मागणीवर ठाम आहेत. सरकारने १२.५० रुपये वाहतूक व डिझेल ५८ रुपये जाहीर केला आहे. त्यामुळे सोमवारी स्थानिकांनी ट्रक खाणीवर पाठवू नयेत तसेच कंपनीच्या गेटसमोर येऊन हजेरी लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
संदीप पाऊसकर यांनी ट्रकमालक आपल्या मागणीवर ठाम असून सोमवारी वेदांता कंपनी पोलीस संरक्षणात वाहतूक सुरू करणार आहे. मात्र स्थानिकांनी एकही ट्रक खाणीवर पाठविला नाही तर कंपनीचा प्रयत्न अयशस्वी होणार असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष बालाजी गावस यांनी, आज सोमवारी सकाळी किर्लपाल पंचायतीने निवडलेली समिती, सावर्डे प्रोग्रेसिव्ह संघटना व धारबांदोडा ट्रक मालक संघटना आमदारासहीत गेटसमोर एकत्रित येऊन कंपनीच्या अधिकार्‍यांशी बोलणी करणार असल्याचे सांगितले. वेदांता कंपनीने ट्रकमालकांशी तडजोड करण्याची गरज असल्याचे सांगितले.

आमदार पाऊसकर ट्रक मालकांसोबत
आमदार पाऊसकर यांनी ट्रक मालकांच्या निर्णय आपल्याला मान्य असून सोमवारी त्यांच्यासोबत कंपनीच्या गेटसमोर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा भाव कमी झाला आहे. मात्र यापुढे जर डॉलरचा भाव ४० वर गेला तर कंपनीकडे पुन्हा दर वाढ करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाऊसकर म्हणाले.