वृद्धापकाळातील थायरॉइड ग्रंथीचे आजार

0
143

– संकलन ः नीला भोजराज

ज्या रुग्णाची थायरॉइड ग्रंथी मोठी झाली असेल व त्यात भरपूर गाठी असतील अशा व्यक्तीला सुरुवातीला निओमर्क्याझोल देऊन रोग आटोक्यात आणतात व नंतर ऑपरेशन करून ते थायरॉइड अंशतः किंवा पूर्णपणे काढून टाकतात. ऑपरेशननंतर बर्‍याच व्यक्तींना थायरॉक्सीन हे औषध जन्मभर घ्यावे लागते.

वृद्धापकाळात जसे जसे वय वाढू लागते त्याप्रमाणे शरीरातील क्रिया मंदावू लागतात. सुमारे ७५% वृद्धांना कोणता ना कोणता आजार असतोच असे निदर्शनास आले आहे. थायरॉइड ग्रंथीचे कार्यसुद्धा याला अपवाद नाही.
सर्वसाधारणपणे वाढत्या वयानुसार टी३, टी४ आणि टीएसएच यांच्या रक्तातील प्रमाणात फारसा बदल होत नाही. या वयात असणारे इतर आजार व सोबत येणारी औषधे यांच्यामुळेसुद्धा थायरॉइड ग्रंथींचे स्राव किंवा क्रिया मंदावू शकतात.
हायपो-थायरॉइडिझम
सहसा तरुण वयात आढळणारा हा रोग वृद्धापकाळीसुद्धा आढळतो. २ ते ७ टक्के वृद्धांना हा रोग होऊ शकतो.
थायरॉइड ग्रंथींचे आजार सोडून या वयात घेण्यात येत असलेल्या इतर औषधांमुळेसुद्धा थायरॉइड ग्रंथीचे कार्य मंदावू शकते. यात ऍमिओडरोन व लिथिअम या दोन प्रमुख औषधांचा समावेश होतो.
हा रोग विशेष करून स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
सुरुवातीच्या काळात हायपो-थायरॉइडिझमची लक्षणे अतिशय अस्पष्ट असतात त्यामुळे बर्‍याचशा लोकांमध्ये या आजाराचे उशिरापर्यंत निदान होऊ शकत नाही. ५०% रुग्णांमध्ये थकवा वाटणे किंवा शरीर कमजोर वाटणे इतकीच लक्षणे दिसून येतात. वजन वाढणे, सुस्ती येणे, दिवसा झोप येणे, केस गळणे, कातडी कोरडी पडणे, उदासीनता येणे तसेच हृदयरोगांची लक्षणे अशा प्रकारचे रुग्ण आढळून येतात. थायरॉइडच्या कमतरतेची कल्पना लक्षात घेऊनच अशा रुग्णांची थायरॉइड टेस्ट करावी लागते.
हायपोथायरॉइडच्या व्यक्तींना तपासताना सर्वच निकष सापडत नाहीत. अशा वेळेस मात्र लॅबॉरेटरीचा आधार घ्यावा लागतो.
त्या चाचण्यांसोबत कोलेस्ट्रॉल, ब्लडशुगर, किडनीटेस्ट, ईसीजीची तपासणी आवश्यक असते. कधीकधी छातीचा एक्स-रे व इको-कार्डिओग्राम पण करावा लागतो.
वृद्धापकाळातील हायपोथायरॉइडवर उपचार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या वयात उच्चरक्तचाप, हृदयरोग, पोटाचे आजारसुद्धा सोबत असतात. उपचार तसे अगदी सोपे आहेत. परंतु थायरॉइडचा डोस मात्र सुरुवातीला कमी प्रमाणात लागतो व नंतर हळुहळू त्याला वाढवावे लागते. सोबत असणार्‍या इतर आजारांच्या लक्षणांची विशेष काळजी घेत डोज वाढवतात. टीएसएचची पातळी १.० ते ३.० मध्ये राहील अशी काळजी घेणे आवश्यक असते. सुरुवातीला दर ३ महिन्यांनी व नंतर दर सहा महिन्यांनी टीएसएचची पातळी तपासून पाहणे आवश्यक ठरते.
सबक्लिनिकल हायपोथायरॉइड म्हणजे लक्षणांशिवाय फक्त टीएसएचची पातळी वाढते. सध्या सुरु असलेल्या हेल्थ चेक-अपमध्ये अशा प्रकारचे निकष आढळतात. असे झाल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्यावे व त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा.
हायपर-थायरॉइडिझम
थायरॉइड ग्रंथीमधून निघणार्‍या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढल्यानंतर होणार्‍या शरीरातील बदलांच्या लक्षणाद्वारे निदान करता येते. अशा रुग्णांचे प्रमाणे हायपो.पेक्षा बरेच कमी आहे.
अशा रुग्णांमध्ये बर्‍याचवेळा थायरॉइड ग्रंथींची वाढ झालेली आढळते व त्यात बर्‍याचवेळा गाठीपण असतात.
छातीत धडधड होणे, हाताला कंप सुटणे, वजन कमी होणे, झोप कमी, स्नायूंची कमजोरी, बसल्यानंतर उठण्यास कष्ट होणे, चालताना दम लागणे, हृदयाची शक्ती कमी होणे अशी लक्षणे आढळतात. अशा रुग्णांमध्ये तरुण वयात होणारे डोळ्यातील बदल या वयात दिसत नाहीत.
हायपरथायरॉइडच्या रुग्णांचे निदान तपासताना होऊ शकते. परंतु जोपर्यंत लॅबॉरेटरीचा रिपोर्ट मिळत नाही तोपर्यंत औषधोपचार सुरू करता येत नाहीत. त्याशिवाय ईसीज, एक्स-रे, इकोकार्डियोग्राम यांची पण गरज भासते.
उपचारांचे ३ प्रकार आहेत. बिटा-ब्लॉकर नावाच्या औषधांचा वापर सुरुवातीला करणे आवश्यक असते. काही पेशंटची बरीचशी लक्षणे यांचा वापर केल्याने आटोक्यात येतात. सुमारे २ ते ३ महिने यांचा वापर करतात.
निओमर्क्याझोल किंवा पीटीयु नावाचे औषध टी३, टी४चे प्रमाण कमी करण्यास मदत करते. साधारणपणे ३ ते ४ महिन्यात आजारावर नियंत्रण मिळविता येते. परंतु हे औषध नेहमीकरता घ्यावे लागते. सोबत याचे शरीरावर होणारे दुष्परिणामसुद्धा लक्षात ठेवावे लागतात.
त्यामुळे एकदा रोग नियंत्रणात आल्यावर रेडिओ ऍक्टिव्ह आयोडिन नावाच्या औषधाचा वापर करण्याचा विचार केला पाहिजे. या औषधाचा १ डोज किंवा काही जणांमध्ये २ डोज दिल्यावर रोग ६ महिन्यांत पूर्ण नियंत्रणाखाली येतो. कधी कधी रुग्ण हायपोथायरॉइड होऊ शकतो. परंतु त्याचा औषधोपचार सोपा आहे.
ज्या रुग्णाची थायरॉइड ग्रंथी मोठी झाली असेल व त्यात भरपूर गाठी असतील अशा व्यक्तीला सुरुवातीला निओमर्क्याझोल देऊन रोग आटोक्यात आणतात व नंतर ऑपरेशन करून ते थायरॉइड अंशतः किंवा पूर्णपणे काढून टाकतात. ऑपरेशननंतर बर्‍याच व्यक्तींना थायरॉक्सीन हे औषध जन्मभर घ्यावे लागते.