वीज मंत्र्यांविरुद्ध खोटी माहिती पोस्ट केल्याने महिलेविरुद्ध पोलीस तक्रार

0
120

मुंबईतील इस्पितळामध्ये मागील तीन महिने उपचार घेणारे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या आरोग्याविषयी खोटी माहिती फेसबुकवर पोस्ट करणार्‍या संकिता घाडी (सुर्ला, डिचोली) हिच्या विरोधात ओल्ड गोवा पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशनवर तक्रार काल दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, सदर तक्रार वरील दोन्ही पोलीस स्टेशनच्या कक्षेत येत नसल्याने ‘ती’ पर्वरी पोलीस स्टेशनकडे वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली.

मंत्री मडकईकर यांच्या सूचनेनुसार त्यांचे वैयक्तिक सचिव विष्णू तिवरेकर यांनी ही तक्रार दाखल केली. मंत्री मडकईकर यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने तीन महिन्यांपासून मुंबईतील इस्पितळामध्ये ते उपचार घेत आहेत. मंत्री मडकईकर यांच्या आरोग्याविषयी १९ ऑगस्ट २०१८ रोजी खोटी माहिती फेसबुकवर पोस्ट करण्यात आल्याचे आढळून आले आहे. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेली पोस्ट आणि माहिती पोस्ट करणार्‍या व्यक्तीची माहिती तक्रारीच्या सोबत जोडण्यात आली आहे.
पोलीस स्टेशनच्या कक्षेत हा प्रकार घडलेला नसल्याने ओल्ड गोवा पोलिसांनी सदर तक्रार विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करून आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.