वीजमंत्र्यांच्या राजीनाम्याची कॉंग्रेसकडून मागणी

0
130

राज्यातील जनतेला सुरळीत वीज पुरवठा करण्यात अपयशी ठरलेले वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. माजी वीजमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून वीज खात्याचा कारभार योग्य पद्धतीने हाताळण्याबाबत महिनाभर प्रशिक्षण घ्यावे, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने काल केली.

गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील जनता खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त बनली आहे. राजधानी पणजीमधील नागरिकांना सुध्दा खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सोमवारपासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात होत असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. परंतु, बाजारपेठत वीज पुरवठा नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. वीज मंत्री पांडुरंग मडकईकर खात्याचा कारभार योग्य प्रकारे हाताळण्यास अपयशी ठरले आहेत, अशी टिका कॉंग्रेसचे प्रवक्ते ऊर्फान मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत काल केली. राज्यात खंडीत वीज पुरवठ्याबाबत यापूर्वी अशी स्थिती कधीच निर्माण झालेली नव्हती. पावसाळ्यात काही भागात वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडतात. परंतु, पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वीज मंत्री मडकईकर यांच्या कार्यकाळात वीज खाते अकार्यक्षम बनले आहे. खंडीत झालेल्या वीज पुरवठ्याबाबत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून विचारणे वीज पुरवठा थेट खंडीत झालेला आहे, अशी माहिती दिली जात आहे, असेही मुल्ला यांनी सांगितले.

महिला कॉंग्रेसकडून गॅस दरवाढ निषेध

गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसने पारंपरिक चुलीवर चहा तयार करून काल निषेध केला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढ करण्यात आली आहे. देशपातळीवर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढीमुळे जनता हैराण झालेली असताना आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे, अशी टिका गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.
युपीए सरकारच्या काळात दरवाढ केल्यानंतर विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली, विदेश मंत्री सुषमा स्वराज, मंत्री स्मृती इराणी या सारखे भाजपचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असत. पूर्वी दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरणारे भाजप नेते आता दरवाढीच्या विरोधात मूग गिळून बसले आहेत, अशी टिका कुतिन्हो यांनी केली.