वीजमंत्री पांडुरंग मडकईकरांना ब्रेन स्ट्रोक

0
102

>> मुंबईतील इस्पितळात शस्त्रक्रिया; धोका टळला

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना ‘ब्रेन स्ट्रोक’ आल्यामुळे मुंबई येथील कोकिलाबेन इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मडकईकर सोमवारी (दि. ४) दुपारी मुंबईला गेले होते. तेथेच सोमवारी उशिरा रात्रौ त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून धोका टळला आहे, असे त्यांची विचारपूस करण्यासाठी मुंबईल गेलेले आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले. पुढील ७२ तास मडकईकर हे विशेष देखरेखीखाली असतील, अशी माहितीही राणे यांनी दिली.

विश्‍वजित राणे यांनी काल दुपारी मुंबईत जाऊन कोकिलाबेन इस्पितळातील डॉक्टरांची भेट घेतली. तसेच नंतर सर्व डॉक्टरांची एक बैठक घेऊन मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या प्रकृतीसंबंधीची सगळी माहिती मिळवली. तसेच मडकईकर यांच्या उपचारासंबंधी डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेतानाच डॉक्टरांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. माजी उपसभापती विष्णू वाघ, मुख्यमंत्री पर्रीकर, आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या पाठोपाठ आजारी पडलेले मडकईकर भाजपचे चौथे नेते ठरले आहेत.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून
पूर्ण सहकार्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आपण मडकईकर यांच्या उपचारासंबंधी बोलून सहकार्याची मागणी केली. फडणवीस यांनी पूर्ण सहकार्याचे आश्‍वासन दिले आहे, असे राणे यांनी सांगितले.

गेल्या रविवारी कदंब पठार येथील वीज उपकेंद्रावरून बंद केलेला वीज पुरवठा रविवारी रात्रभरही चालू न केल्यामुळे मडकईकर यांना लोकांच्या टीकेला व रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सोमवारी ते तणावाखाली होते. त्याच स्थितीत मुंबईला गेलेले असताना उशिरा रात्रौ त्यांना ब्रेन स्ट्रोक आला.
मडकईकर यांच्याकडे सध्या वीज, समाजकल्याण खाते व अपारंपरिक ऊर्जा अशी तीन खाती आहेत.

दरम्यान, गोव्याचा कोणीही राजकीय नेता आजारी पडल्यास तो उपचारासाठी मुंबईला जात असतो, असे आरोग्य मंत्र्यांच्या नजरेस आणून देऊन तुम्हा नेतेमंडळीचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयावर विश्‍वास नाही काय, असा प्रश्‍न पत्रकारांनी पत्रकार परिषदेत केला तेव्हा राणे म्हणाले की, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही काही दिवस गोमेकॉत उपचार घेतले होते. आमदार कार्लुस आल्मेदा हे आजारी असताना त्यांनीही गोमेकॉत उपचार घेतला. नंतर आयुर्वेदीक उपचार व मसाज घेण्यासाठी ते केरळला गेले. एवढेच कशाला आपले वडील तथा आमदार आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांना काही दिवसांपूर्वी अचानक छातीत जळजळ व्हायला लागली तेव्हा त्यांनीही गोमेकॉत उपचार घेतल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गोव्यातील राजकीय नेत्यांचा गोमेकॉवर विश्‍वास नाही हे म्हणणे बरोबर नसल्याचे ते म्हणाले.