विस्मरणात गेलेली चकमक

0
199
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

सकाळी अंदाजे साडे सात वाजता चिनी पोस्टच्या उत्तरेला तैनात चिनी लाईट मशीनगननी नाथू ला वर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. नाथू ला पोस्ट अगदी खुली असल्याने आणि अशा प्रकारच्या चिनी उत्तराची अपेक्षा नसलेल्या, खुल्यात वावरणार्‍या ७२ भारतीय सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. यानंतर नाथू ला जवळच असलेल्या चो ला मध्येही तेथे तैनात असलेल्या गोरखा युनिटची चीनशी चकमक झाली. १९६७ मधील या चकमकी भारत चीन संबंधातल्या शेवटच्या हत्यारी चकमकी होत्या.

चीनकडून १९६२ मध्ये झालेल्या दारुण पराभवाचा बदला घेण्याची संधी भारताला १९६७ मध्ये मिळाली. डोकलाममधील सामरिक तणाव शिगेला पोहचला असताना इकडे लडाखच्या पँनगॉन्ग त्सो लेक क्षेत्रातील लाईन ऑफ कंट्रोलवर एकमेकांशी धक्काबुक्की करणार्‍या सैनिकांचे व्हिडियो आपण सर्वांनी पाहिले आणि प्रशंसाही केली; पण १९६०च्या दशकात भारतीय व चिनी सैनिक अक्साई चीन क्षेत्रात एकमेकांशी धक्काबुक्की तर करत असतच, पण एकमेकांवर दगडफेकही करत असत. १९६५ च्या दुसर्‍या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी चीनने पाकिस्तानच्या समर्थनार्थ उत्तर सीमेवर सैन्याची जमवाजमव केली होती. त्या अंतर्गत १९६७ मध्ये हिमालयाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या सिक्कीमजवळील डोकलाम पठारावर चिनी सैनिक मोठ्या प्रमाणात तैनात होते. सप्टेंबर – ऑक्टोबर १९६७ मध्ये या क्षेत्रात अशा प्रकारच्या धक्काबुक्कींनी गंभीर वळण घेतले आणि त्यात जवळपास ३०० चिनी आणि १०० भारतीय सैनिकांना मृत्युमुखी पडावे लागले.

१९६२ मधील पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यास आतुरलेले भारतीय सैनिक आणि १४,५०० किलोमीटरचा प्रदेश काबीज करताना मिळालेल्या विजयाच्या गुर्मीत वावरणार्‍या चिनी सैनिकांमध्ये झालेल्या या तीन दिवशीय चकमकीचा अधिकृत इतिहास अजूनही डिक्लासिफाय झालेला नाही.

१९६७ च्या उन्हाळ्यात चीन व भारताचे सैनिक सिक्कीम क्षेत्रात एकमेकांसमोर ‘आय बॉल टू आय बॉल पोझिशन’ मध्ये आले. नाथू ला बॉर्डर पोस्टवर भारत उभारत असलेल्या काटेरी तारेच्या कुंपणावरून तेथे वातावरण तापायला सुरवात झाली. नाथू ला ही सामजिकदृष्ट्‌या सिक्कीममधील सर्वात महत्वाची खिंड आहे. उत्तर व पूर्व क्षेत्रात खिंडीला ‘ला’ म्हणतात. उदाहरणार्थ पूर्वेकडील बुम ला, डोक ला, नाथू ला, से ला, जलप ला आणि उत्तरेतील झोझी ला, रेझान्ग ला, शांग्री ला, खारडुंग ला इत्यादी. चीनच्या आक्रमक घुसखोरीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारताला नाथू ला क्षेत्रात काटेरी तारेचे कुंपण घालायचे होते आणि चीन या कारवाईकडे मुजोरी आक्रमकतेच्या दृष्टिकोनातून पाहत होता. बुधवार, १५ जानेवारीला साजर्‍या होत असलेल्या स्थल सेना दिवसाच्या निमित्ताने त्यावेळी त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी सैनिकाच्या पोतडीतील ही आठवण.

नाथू ला पासून २८८८ किलोमीटर दूर असलेल्या चीनची राजधानी पेकिंगमध्ये सुरू झालेल्या या कहाणीचे नायक राजकीय मुत्सद्दी के रघुनाथ होते. ते चीनमधील तत्कालीन इन्फर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा होते. पुढे ते परराष्ट्र सचिव झाले आणि त्यांनीच १९९० मधील फेमस ‘गुजराल डॉक्ट्रीन’ अमलात आणले होते. त्यावेळी भारतीय दूतावासात सेकण्ड सेक्रेटरी असलेले के. रघुनाथ आपले सहकारी पी. विजय यांच्याबरोबर पेकिंगनजीक असलेल्या स्लीपिंग बुद्धा टेंपलचे फोटो घेत असतांना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर भारत व चीनमध्ये प्रचंड राजकीय खळबळ माजली. या घटनेवर आधारित ‘सीव्हीयरली पनिश इंडियन स्पाय रघुनाथ’ या नावाची फिल्म त्यावेळी चिनी चित्रपटगृहांमध्ये दाखवली जात होती. भारताने अर्थातच यावर तीव्र नाराजी नोंदवली आणि सर्व आरोपांना धुडकावून लावले. परिणामस्वरूप, चीनने त्या दोन्ही मुत्सद्यांची हकालपट्टी केली आणि भारतात त्यांचे वीरोचित स्वागत करण्यात आले. १९६२ पासून वृद्धिंगत होत असलेले अविश्वासाचे वातावरण या रघुनाथ घटनेने तापू लागले.

या घटनेला चीन-पाकिस्तान सामजिक सहकार्याची जोड मिळाल्यामुळे दिल्लीतील भारतीय परराष्ट्र मंत्रालय, पेकिंगमधील भारतीय दूतावास आणि चिनी परराष्ट्र खात्यात ‘एक्सचेंज ऑफ हॉट नोट्स’ सुरू झाल्या. त्यातच त्यावेळी भारताच्या पश्चिम सीमेवर सुरू असलेल्या भारत – पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबर १९६५ रोजी चिनी सैनिकांनी पश्चिम क्षेत्रात लडाखमधील त्सास्कुर येथे लाईन ऑफ ऍक्च्युुअल कंट्रोल पार करत आधी तीन भारतीय सैनिकांचे अपहरण केले व नंतर त्यांची हत्या केली. याच्याच जोडीला चिनी सैनिकांनी पूर्वेकडील क्षेत्रात घुसखोरी व आक्रमण करत सिक्कीममधील सामरिक महत्वाचा नाथू ला आपल्या ताब्यात घेण्याची मोहीम सुरु केली. त्यावेळी तत्कालीन मेजर जनरल सगत सिंग सिक्कीममधील सतराव्या भारतीय डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग : जीओसी होते. नंतरच्या काही महिन्यांमध्ये नाथू ला वर चीन व भारतीय सैनिकांमध्ये रोजच शाब्दिक चकमकी होत असत. राजकीय व मुत्सद्दी स्तरावर रोजच तीव्र शब्दांच्या नोट्सची देवाणघेवाण सुरु झाली. जानेवारी १९६६ नंतर चीन तेथील पासपोर्टधारक भारतीयांचा अकारण छळवाद करतो आहे, तियानस्टीन (सांप्रत तियानजिन) येथील गुरुद्वार्‍याचे पावित्र्य विडंबन करून तोडफोड करण्यात आली आहे, शांघाय येथील पारशी मंदिरात चायनीज रेड आर्मी अनधिकृतरित्या घुसली आहे, असे विविध प्रकारचे आरोप भारताने चीनवर केले. प्रत्येक भारतीय आरोपाच्या उत्तरात चीन ‘इंडिया इज द ऍग्रेसर’ हा स्टॅण्डर्ड रिप्लाय देत असे.
अमेरिकन सीआयएच्या नुकत्याच डीक्लासिफाय झालेल्या दस्तावेजांनुसार, नाथू लामध्ये झालेल्या रक्तरंजित चकमकीचे मूळ या राजकीय तणावात होते. या झमेल्यातच रघुनाथच्या घटनेने आगीत पडणार्‍या तेलाचे काम केले. त्यामुळे रघुनाथच्या चीनमधून झालेल्या हकालपट्टीनंतर ज्यावेळी भारतीय सैनिकांनी नाथू ला मध्ये काटेरी कुंपण घालण्याची कारवाई सुरू केली, त्यावेळी त्यांना लष्करी कारवाईला तोंड द्यावे लागले. त्यानंतर अशी परिस्थिती अर्ध्या शतकानंतर डोकलाम संघर्षाच्या वेळीच निर्माण झाली; पण सुदैवाने त्यावेळी हत्यारांचा वापर झाला नाही. या चकमकीची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे या लेखासाठी स्वानुभवाखेरीज, लेफ्टनन्ट जनरल सगत सिंग यांचे आत्मचरित्र, त्याचप्रमाणे मेजर जनरल शेरू थपलियाल आणि मिलिटरी हिस्टोरियन, मेजर जनरल व्ही. के. सिंग यांच्या लिखाणाचा आधार घेण्यात आला आहे.

हे कुंपण उभारण्याबाबत सेनेच्या दिल्ली व कलकत्ता येथील मुख्यालयांमध्ये बराच विचारविनिमय झाला. भारतीय व चिनी सैनिकांनी कुठे उभे राहायचे या मुद्द्यावर नाथू ला येथे रोज होणार्‍या शाब्दिक चकमकींना आळा घालण्यासाठी तेथे काटेरी कुंपण उभारणी हा एकमेव उपाय आहे, यावर सर्वांचे एकमत झाले. चीन मात्र हे मानायला तयार नव्हता. १९६६-६७ मध्ये भारताकडून कुंपण उभारण्यासाठी होणार्‍या प्रत्येक प्रयत्नाला चीनने विरोध केला.

सप्टेंबर १९६७ मध्ये एक दिवस, नाथू ला कॉम्प्लेक्समध्ये तैनात भारताच्या सेकण्ड ग्रेनेडियर रेजिमेंटचे सैनिक नाथू ला आणि त्याच्या उत्तरेकडील सेबू ला पोस्टच्या मध्ये कुंपण उभारत असताना झालेल्या शाब्दिक व शारीरिक धक्काबुक्कीच्या वेळी चिनी पोलिटिकल कमिसार अक्षरश: रडला, कारण झालेल्या धक्काबुक्कीत त्याचा चष्मा खाली पडला असता भारतीय सैनिकांनी तो पायदळी तुडवला असे शेरू थपलियाल म्हणतात चिनी सेनेत प्रत्येक युनिट बरोबर पोलिटिकल कमिसार नेमला जातो आणि त्याचा हुद्दा खूपच वरचा असतो. या अक्षम्य मानहानीनंतर ११ सप्टेंबर,१९६७ ला भल्या पहाटे तोच पोलिटिकल कमिसार ११ हत्यारधारी सैनिकांसोबत परत आला. आता चीनने कुंपण उभारण्यासाठी अँगल आयर्न पीकेट्स गाडणे सुरू केले. यावेळी नाथू लाच्या उत्तरेकडील सेबू ला आणि दक्षिणेकडील कॅमल्स बॅक या पोस्टसवर आर्टिलरी ऑब्झर्व्हेशन पोस्ट (एओपी) ऑफिसर्स तैनात होते आणि सेकण्ड ग्रेनेडियरचे कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनन्ट कर्नल राय सिंग नाथू ला पोस्टवर त्यांच्या कमांडो प्लाटूनसह हजर होते.
भारताची ७० फिल्ड इंजिनियर कंपनी आणि १८ राजपूत रेजिमेंटचे सैनिक, नाथू ला समोर कुंपण उभारण्याची कारवाई करत असताना ‘तुम्ही भारतीय सैनिकांची कारवाई थांबवा’ असा आदेशवजा हुकूम चिनी पोलिटिकल कमिसारनी कर्नल राय सिंगना दिला, पण त्या जॉंबाज अधिकार्‍यांनी त्याला धुडकावून लावत आपली कारवाई सुरूच ठेवली. अर्थातच दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये कुंपण उभारण्याच्या जागेवरून आधी वाद आणि नंतर शारीरिक धक्काबुक्की सुरु झाली. या कारवाई दरम्यान, एका आठवड्यात दुसर्‍यांदा भारतीय सैनिकांनी चिनी पोलिटिकल कमिसरला तुडवला. त्यानंतर गर्भगळीत झालेले चिनी सैनिक आपल्या बंकर्समध्ये परतले. हे होत असतानाच एका शिट्टीचा कर्कश्य आवाज घुमला आणि सकाळी अंदाजे साडे सात वाजता, चिनी पोस्टच्या उत्तरेला तैनात चिनी लाईट मशीनगननी नाथू लावर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. नाथू ला पोस्ट बिना आडोशाची, अगदी खुली होती. सर्व सैनिक खुल्यातच कार्यरत असल्यामुळे काही क्षणांमध्येच अशा प्रकारच्या चीनी उत्तराची अपेक्षा नसलेल्या आणि खुल्यात वावरणार्‍या ७२ भारतीय सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. कर्नल राय सिंग गंभीररीत्या जखमी झाले. सेकण्ड ग्रेनेडियरचा कॅप्टन अनुप सिंग डागर आणि १८ राजपूतच्या मेजर हरभजन सिंग यांनी उरल्या सुरल्या सैनिकांना जमवून चीनी पोस्टसवर समोरून तडक हल्ला चढवला. कर्नल राय सिंगनी जखमी अवस्थेत त्यांना फायर सपोर्ट दिला. बाजूच्या दोन्ही पोस्ट्सवर तैनात एओपींनी चीनी पोस्टसवर तगडा आर्टिलरी फायर आणला. चीनचे २७६ सैनिक व पोलिटिकल कमिसार मारले गेले. भारतीय आर्टिलरीनी पुढील पाच दिवस चिनी सैनिकांना अक्षरश: भाजून काढत अजून जीवितहानी केली आणि ग्रेनेडियर्सच्या सैनिकांनी हॅन्ड टू हॅन्ड फाईटमध्ये १२ चीनी सैनिकांना यमसदनी धाडले. पाच दिवसांनी युद्धबंदी झाली. या चकमकीत कॅप्टन डागरला मरणोत्तर वीरचक्र, मेजर हरभजन सिंगला मरणोपरांत महावीर चक्र, कर्नल राय सिंगना महावीर चक्र आणि दोन्ही युनिट्स व इंजिनियर आणि आर्टिलरीला एकूण ४१ वीरता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यापैकी ३७ पुरस्कार मरणोपरांत होते. ही चकमक भारतानेच सुरू केली, असा आरोप चीनने केला. यानंतर ०१ ऑक्टोबर,६७ ला, नाथू ला जवळच असलेल्या चो ला मध्येही तेथे तैनात असलेल्या गोरखा युनिटची चीनशी चकमक झाली आणि त्यात गोरखा सैनिकांनी ‘आयो गोरखाली’असा नारा गगनभेदी देत कुकरी अटॅकने चिनी पोस्टवर कब्जा केला आणि बर्‍याच चिनी सैनिकांना देवाकडे धाडले, असे व्ही के सिंग आपल्या पुस्तकात लिहितात.
नाथू ला व चो ला मध्ये झालेल्या चीन-भारत चकमकींमुळे आंतरराष्ट्रीय वातावरण ढवळून निघाले. तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई त्या वेळी अमेरिकेच्या दौर्‍यावर असतांना तेथे व्हिएतनाम खालोखाल याच चकमकींची चर्चा होती. अमेरिकी सीआयएनुसार, याच वेळी रशियाने चीनच्या उत्तरेकडील सीमेवरील आपली सैन्य तैनाती ५ वरुन २१ डिव्हिजनवर नेत तेथे एक टँक डिव्हिजनही तैनात केली. या तैनातीचे कारण काहीही असो, पण यामुळे चीनची प्राथमिकता मंच्युरियन सीमेकडे गेली आणि भारताला श्वास घ्यायला वेळ मिळाला. त्यानंतर १९६९ मध्ये चीन आणि रशिया यांच्यात सीमावाद सुरू झाला. एके काळचा मित्र असलेला रशिया चीनसाठी रिव्हीजनिस्ट ट्रेटर झाला. यानंतर चीनला भारताकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. नाही म्हणायला १९७१ च्या तिसर्‍या भारत पाक युद्धात निक्सन केसिंगर द्वयींनी चीनला भारताची उत्तरी सीमा कार्यान्वयीत करण्याची विनंती केली असता रशियन दडपणाखाली चीनने त्याला नकार दिला. १९६७ मध्ये नाथू ला आणि चो लामध्ये झालेली चकमक भारत चीन संबंधातली शेवटची हत्यारी चकमक होती. यानंतर सीमेवरील तणाव कमी होत गेला तरी चीन भारतातील नक्षल आणि नागा, मिझो अलगाववादी गनिमांना हत्यारे, आर्थिक, वैचारिक व संघटनात्मक मदत करतो हे वारंवार सिद्ध झाले. याला सीआयएनीही दुजोरा दिला आहे. भारतीय स्थल सेना दिन : आर्मी डेला नाथू ला व चो लामध्ये लढलेल्या प्रत्येक वीर भारतीय सैनिकाला आम्हा निवृत्त सैनिकांचा सलाम.