विश्‍वासाने विश्‍वास वाढतो!

0
178
  • प्रमोद गणपुले (कोरगाव)

‘‘तुम्ही येणार, आम्हाला बाहेर काढणार याची मला खात्री होती. मी माझ्या या मित्रांना तेच सांगत होतो, बाबा नक्की येणार. माझा माझ्या बाबांवर विश्‍वास आहे. त्यांनी मला कधीही अंतर देणार नाही… असा शब्द दिलाय. त्या विश्‍वासावर तर आम्ही दोन दिवस एवढ्याशा जागेत अन्नपाण्याविना जिवंत राहिलो.’’

मी ज्या शाळेमध्ये शिकवायचो त्या शाळेमध्ये अरविंद नावाचा एक प्यून होता. खरं तर आमच्यासाठी तो प्यून कमी आणि सहकारीच अधिक होता. अगदी तरूण वयात तो नोकरीला लागला. तसे आम्ही दोघेही एकाच वर्षी नोकरीला लागलो. पुढे आमची मुलंही त्याच शाळेत शिकली.

अरविंदच्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट एकदा माझ्या लक्षात आली. मधल्या सुट्टीची बेल वाजवल्यावर तो लगेच येऊन वर्‍हांड्यात उभा राहायचा. तेवढ्यात कुठल्याशा एका वर्गांतून त्याचा पाचवीत शिकणारा मुलगा धावत येऊन त्याच्यासमोर उभा राहायचा. मग अरविंद त्याच्या हातावर दोन रुपये ठेवायचा. ते दोन रुपये घेऊन तो मुलगा आनंदाने उड्या मारत कँटीनच्या दिशेने पळायचा. पुढे पाच-सहा दिवस मी मुद्दामच, मधल्या सुट्टीनंतर लक्ष ठेवून राहिलो. अरविंद रोज दोन रुपये त्याच्या हातावर ठेवायचा.
एकदा न राहवून मी त्याला विचारलंच. काय रे, तू रोज त्याला दोन रुपये का देतोस? त्यापेक्षा एकदाच सहा दिवसांचे बारा रूपये त्याच्याजवळ का नाही देऊन ठेवत? त्यामुळे तुलाही आठवणीने रोज दोन रूपये आणावे लागणार नाहीत आणि त्यालाही रोज सगळ्यांसमोर तुझ्याकडून पैसे घ्यावे लागणार नाहीत.’’
त्यावर हसून तो म्हणाला, ‘‘सगळे पैसे एकदाच दिले तर दोन दिवसातच तो ते फस्त करून टाकेल’’.
‘‘तू असं का म्हणतोस? पूर्वी कधी असं केलंय का त्यानं?’’, मी.
‘‘त्यानं असं केलं नाही. पण सगळी मुलं असंच करतात ना!’’ त्यानं आपला तर्क मांडला.
‘‘हे बघ, एक तर सगळीच मुलं असं करतात, हे काही खरं नाही. आणि बाकीची मुलं करतात म्हणून तुझा मुलगा करील हे तरी खरं कशावरून? तू एकदा त्याच्यावर विश्‍वास ठेवून बघ. सहा दिवसांसाठी बारा रुपये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्याला दे. त्याला समजावून सांग, की रोज दोनच रुपये वापरायचे, रोज एक कापा-पाव खायचा. हे पैसे सहा दिवस पुरवायचे. मला खात्री आहे तो तसंच करेल.’’
पुढच्या आठवड्यात त्यानं खरोखरच ते पैसे सहा दिवस पुरवले. अरविंदलाही आश्‍चर्य वाटलं. आज त्याला त्याच्याच मुलाची नव्यानं ओळख होत होती.
घटना एवढीशीच, परंतु तिचे काय-काय परिणाम झालेत! मुलगा विश्‍वासपात्र निघाला. सहा दिवस त्यानं ते पैसे जपून ठेवले. त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. एवढे पैसे हातात असतानाही त्यानं रोज दोनच रुपये वापरले. तो संयम शिकला. वडिलांचा माझ्यावर विश्‍वास आहे हे त्याला कळल्यामुळे त्याच्या मनात वडिलांविषयीचा आदर वाढला. अरविंदची आपल्या मुलाविषयीची एका बाबतीतली चिंता मिटली. त्यांच्यामधलं नातं अधिक समृद्ध झालं.

‘‘विश्‍वास बहुत बडी चीज होती है बाबू!’’ हे आता तरी पटलं ना? विश्‍वासाने विश्‍वास वाढतो हेच खरं. घरात घडणार्‍या अशा छोट्या छोट्या घटनांतूनच मुलांची मनं संस्कारित होत असतात. हेच संस्कार पुढे जीवनभर उपयोगी पडतात.
आपल्या घरात अलीकडे फार तर चार-पाच माणसंच असतात. तरीसुद्धा घरातील सगळ्या वस्तू कडीकुलुपात बंद असतात. कारण कुणाचाच कुणावर विश्‍वास नसतो.
आपल्या घरात तीन-चार मुलं असतील तर हा प्रयोग अवश्य करून बघा. वीस-पंचवीस रुपयांची नाणी एका भांड्यात घालून टीव्हीसमोरच्या टेबलावर ठेवून द्या. मुलांना सांगून ठेवा- ‘‘तुम्हाला कधी पैसे लागले तर या भांड्यातले घ्या. घेताना शक्यतो आम्हाला सांगून घ्या, म्हणजे पैसे संपल्यावर दुसरे ठेवायला बरं पडेल.’’
मला खात्री आहे, मुलं आवश्यक तेवढेच पैसे प्रामाणिकपणे वापरतील. मी स्वतः हा प्रयोग करून बघितलाय, तुम्हीही करून बघा.

आठ वर्षांचा दादा आणि पाच वर्षांची ताई. दोघं एकत्र असली की आपसात सारखी भांडत असतात. दादा तसा मस्तीखोर आहेच. ताईला रडवल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. आई किचनमध्ये असते आणि इकडे ही दोघं, अक्षरशः घर डोक्यावर घेतात, पण त्यांचे आई-बाबा जेव्हा बाहेर जातात तेव्हा दादाला ताईची काळजी घ्यायला सांगून जातात, ‘‘तिला रडवायचं नाही. तिला बाहेर अंगणात जाऊ द्यायचं नाही. तिची नीट काळजी घ्यायची. आम्ही परत येईपर्यंत ताईला सांभाळायची जबाबदारी तुझी!’’
आश्‍चर्य म्हणजे आईबाबा घरी येईपर्यंत दादा ताईला नीट सांभाळतो. ती अंगणात जायला लागली तर उचलून घरात आणतो. ती रडू नये म्हणून तिची समजूत घालतो. सगळं शहाण्या मुलासारखं करतो.

आई-बाबा घरात असताना ताईला छळणारा दादा, ती घरात नसताना शहाण्यासारखा वागतो कारण त्याच्यावर जबाबदारी दिलेली असते. त्याच्यावर विश्‍वास ठेवलेला असतो. विश्‍वास ठेवला की मुलं विश्‍वासू आणि विश्‍वासपात्र बनतात.
आजकाल आपल्या सामाजिक जीवनातलाही विश्‍वास कमी होत चालला आहे. लोक वैतागून म्हणतात, ‘‘विश्‍वास मागेच पानिपतच्या युद्धात मेलाय. आता विश्‍वास ठेवण्यासारखं कुणीच राहिलं नाही.’’ तो विश्‍वास पुन्हा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं मा. पंतप्रधान मोदींनी ‘सेल्फ अटेस्टेशन’चा केलेला कायदा म्हणजे समाजात विश्‍वास निर्माण करण्यासाठी उचललेलं एक धाडसी पाऊल आहे.

‘विश्‍वास’ या शब्दामध्ये किती शक्ती असते त्याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि हवामान विषयाचे तज्ज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांचा एक लेख काही वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झाला होता. रशियामध्ये झालेल्या एका भीषण भूकंपानंतरची एक घटना त्यांनी त्या लेखामध्ये मांडली होती.
एक बाप, आपल्या एकुलत्या एका मुलाला सायकलवर बसवून रोज शाळेत सोडायला जायचा. बाप परत जायला निघाला की तो मुलगा खूपच हळवा व्हायचा. बापाचाही मुलावर खूप जीव होता. तो मुलाला नेहमी म्हणायचा, ‘‘तू घाबरू नकोस. मी तुला कधीच अंतर देणार नाही. बर्‍यावाईट सर्वच प्रसंगी मी तुझ्याबरोबर असेन. माझ्यावर विश्‍वास ठेव.’’
असाच एके दिवशी मुलाला शाळेजवळ सोडून तो परत फिरला. काही अंतर मागे आला असेल तेवढ्यात अचानकपणे, प्रचंड शक्तीच्या भूकंपाने धरती हादरली. जवळपासच्या इमारती धडाधडा कोसळू लागल्या. रस्ते दुभंगले. धुळीचे लोळ उठले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हजारो लोक पडक्या इमारतींखाली दबले गेले. जी माणसं घरातून बाहेर पडली त्यांनी हलकल्लोळ माजवला. हा बाप मात्र उघड्या मैदानात होता म्हणून वाचला. या सर्व गदारोळातून तो थोडा सावरला तेव्हा त्याला आठवण झाली ती त्याच्या मुलाची.

सायकल तिथेच टाकून तो शाळेच्या दिशेने मागे फिरला. वाटेत रस्ते दुभंगलेले. दगडाधोंड्यांचे ढीग रस्त्यावर आडवे पडलेले, तो कसाबसा शाळेची इमारत होती तिथे पोचला. इमारत संपूर्ण भुईसपाट झाली होती. त्या दिवसात जोरदार थंडी होती. बर्फ पडत होता. मुलाचा वर्ग जिथं होता तिथे तो अंदाजाने पोचला. समोर दगडधोंडे, इमारतीची लाकडं यांचा डोंगर झाला होता. त्यानं एक-एक दगड बाजूला करायला सुरुवात केली. हळूहळू लोक रस्त्यावर आले. लोक आणि सरकारी यंत्रणा हतबल झाली होती. हा मात्र एकटाच एक-एक दगड बाजूला करत होता. लोकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाचंच ऐकत नव्हता. तो म्हणाला, ‘‘काही बोलू नका. शक्य असेल तर दगड बाजूला करायला मला मदत करा. माझा मुलगा इथेच खाली असेल. तो माझी वाट बघत असेल. मी त्याला शब्द दिलाय की मी त्याला कधीच अंतर देणार नाही. विश्‍वासानं तो माझी वाट बघत असेल.’’
कडाक्याच्या त्या थंडीत आणि डोक्यावर पडणार्‍या बर्फात तो एकटाच रात्रंदिवस काम करीत होता. अधून मधून मुलाला हाका मारीत होता. सांगत होता, ‘‘घाबरू नकोस, मी येतोय’’. तब्बल दोन दिवसांनंतर बराचसा ढिगारा हटवल्यावर त्याला आतून कुठून तरी कुणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. तिथले आणखीन थोडे दगड हटवल्यावर, मुलाच्या वर्गाच्या एका कोपर्‍यात, दोन भिंतींच्या आधारानं तीन-चार मुलं एकत्र उभी असल्याचं लक्षात आलं. आता इतर लोकही मदतीला आले. सर्वांनी मिळून त्या मुलांना बाहेर काढलं. बाहेर आल्यावर मुलगा म्हणाला, ‘‘तुम्ही येणार, आम्हाला बाहेर काढणार याची मला खात्री होती. मी माझ्या या मित्रांना तेच सांगत होतो, बाबा नक्की येणार. माझा माझ्या बाबांवर विश्‍वास आहे. त्यांनी मला कधीही अंतर देणार नाही… असा शब्द दिलाय. त्या विश्‍वासावर तर आम्ही दोन दिवस एवढ्याशा जागेत अन्नपाण्याविना जिवंत राहिलो.’’ बापानं मुलाला घट्ट पोटाशी धरलं आणि दोन दिवस दाबून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
विश्‍वासामध्ये अशी प्रचंड शक्ती असते. म्हणून आपण आपल्या मुलांवर विश्‍वास ठेवायला हवा आणि त्यांचा विश्‍वास कमवायला हवा!