विश्‍वचषक स्पर्धेच्या निमित्ताने

0
96

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव

गेल्या तीन परदेश दौर्‍यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक आहे. भारताने एकूण एक डझन सामन्यांपैकी केवळ तीन १ दिवशीय सामने जिंकले असून हे तिन्ही विजय इंग्लंडविरुद्ध आहेत. भारताने १२ पैकी ६ सामने गमावले असून तीन सामने अनिर्णित ठेवण्यात त्यांना यश आले. या पार्श्‍वभूमीवर पुढील महिन्यात होणार्‍या एक दिवशीय विश्‍वचषक स्पर्धेत निवडण्यात येणार्‍या खेळाडूंमध्ये कोण असणार, कोण नसणार याकडे क्रिकेट खेळाडूंचे आणि क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले होते. राजकारण्यांनी जसा युवाशक्तीला पुढे आणण्याचे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, तसाच काहीसा निर्णय खेळाडूंच्या बाबतीत घेऊन एक सुखद धक्का देण्यात आल्याचे दिसते. या खेळाडूंमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, आर. आश्‍विन, अक्षर पटेल, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, स्टुअर्ट बिनी आणि उमेश यादव या खेळाडूंचा समावेश आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांचा अभ्यास करता हा संघ थोडासा कमी भासत असला तरी त्यातल्या त्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. युवराज सिंह आणि पार्थिव पटेल यांची उणीव भासत असली तरी नवीन खेळाडूंना प्राधान्य देताना त्यांची पूर्ण कामगिरीही लक्षात घेण्यात आली असल्यामुळे या खेळाडूंसह विश्‍वचषक जिंकण्याची उमेद आता बाळगली पाहिजे.
तसे पाहता, एक दिवशीय क्रिकेटमध्ये भारताला कमी लेखण्याची चूक कोणताही संघ करणार नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गेल्या सात वर्षांतील भारताची कामगिरी मुळीत दुर्लक्षिता येणारी नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये होणार्‍या या एक दिवसाच्या सामन्यामध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या तुल्यबळ संघांशी आपल्याला सामना करावा लागणार आहे. शिवाय मागील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे बलशाली संघ होते. यावेळीही अशीच परिस्थिती आहे.
आपला संघ निवडताना एक महत्त्वाची डोकेदुखी असते, ती म्हणजे आपल्याकडे अष्टपैलू-ज्याला ऑलराऊंडर म्हणतात अशा खेळाडूंची काहीशी वानवा आहे, त्यामुळे उडदामाजी काळेगोरे, यानुसार गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यापैकी निदान दोन गोष्टीं मध्ये ज्यांचे प्रबळ स्थान आहे, त्यांनाच संघात सामावून घेतले जाते. एकूण संघ निवड पाहता आपल्या लक्षात ही गोष्ट येऊ शकेल.
खरे तर, ही विश्‍वचषक स्पर्धा म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानपदाची सत्वपरीक्षा आहे. असे असले तरी त्या दिवशी सामन्याच्या ठिकाणच्या खेळपट्‌ट्या कशा राहतील, त्या खेळपट्‌ट्यांवर चेंडू कसे वळतील हाही भाग गोलंदाज, फलंदाजीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. ज्येष्ठ क्रीडातज्ञ प्रितमराज बाम यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘भारतीय संघातील खेळाडूंचा विचार केला तर फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणाची बाजू भक्कम ठरेल असे दिसते, परंतु त्याचवेळी संघाची गोलंदाजी काहीशी कमकुवत पडेल का, असाही प्रश्‍न पडत आहे. कप्तान महेंद्रसिंग धोनी संघाची कशी बांधणी करू शकतो, खेळाडूंकडून कितपत कामगिरी करून घेऊ शकतो यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.
येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, ज्या न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये या विश्‍वचषक स्पर्धेचे सामने होणार आहेत, त्या न्यूझिलंडमधील खेळपट्‌ट्या या इंग्लंडसारख्याच आहेत. त्यावर बर्‍यापैकी हिरवळ असते आणि तेथे चेंडू बर्‍यापैकी ‘स्विंग’ होतो व त्याचा गोलंदाजांना फायदा होतो. ऑस्ट्रेलियातीलखेळपट्‌ट्या या बाऊंसरसाठी फायदेशीर ठरतात आणि मुख्य म्हणजे या दोन्ही देशांतील खेळपट्‌ट्यांचा आपल्या तरुण खेळाडूंना विशेषतः फलंदाजांना विशेष अनुभव नाही. शिवाय दोन्ही देशांमधील हवामान, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. या देशातील वातावरणाशी व खेळपट्‌ट्यांशी आमचे पठ्ठे किती जुळवून घेतात, यावर आपल्या यशस्विततेचे गमक सामावलेले आहे. नेमके याच गोष्टीवर बोट ठेवून क्रिकेटर चंदू बोर्डे यांनी म्हटले आहे, ‘यावेळी भारतीय संघात एखादा स्पिनर’ घेतला असता तर बदल झाले असते, कारण आजवर शेन वॉर्न, शिवरामकृष्णन यांसारख्या लेग स्पिनर्सचा त्या त्या संघांना मोठा फायदा झाला आहे. काही का असेना, काही उणिवांसह आपला भारतीय संघ आता जाहीर झाला आहे. आता सुनील गावस्कर, जी. विश्‍वनाथ, रवि शास्त्री, कपील देव, सचिन तेंडुलकर अशा आपापल्या अंगात श्रेष्ठ ठरलेल्या क्रिकेटवीरांचे स्मरण करीत या संघाचे कप्तानसह सर्व खेळाडूंना शुभेच्छा देणे, हेच आपल्या हाती आहे. म्हणून तमाम गोमंतकीय क्रिकेट रसिकांच्यावतीने संघास मनःपूर्वक शुभेच्छा!