‘विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेला प्रेक्षकांची गर्दी उसळणार’

0
125

>> श्रीनिवास धेंपो यांना एसजेएजीकडून सन्मानपत्र प्रदान

फिफा अंडर-१७ विश्‍वकप फुटबॉल स्पर्धेच्या गोव्यातील सामन्यांना ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून फुटबॉलवेड्या गोव्यात या स्पर्धेला प्रेक्षकांची गर्दी उसळणार असल्याचा आत्मविश्‍वास गोवा केंद्राचे संचालक श्रीनिवास धेंपो यांनी व्यक्त केला. सर्व तयारी पूर्ण झाली असून फातोर्डा मैदान सामन्यांसाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा क्रीडा पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळाने धेंपो उद्योग समूहाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री. धेंपो यांना सन्मानपत्र प्रदान केले, यावेळी श्री. धेंपो यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी एसजेएजीचे अध्यक्ष नीरज प्रभू, सरचिटणीस महेश गावकर, खजिनदार मंगेश बोरकर, पदाधिकारी सचिन कोरडे, नंदेश कांबळी उपस्थित होते.

कोल्हापूर, पुणे या शेजारच्या राज्यातील शहरांतून मोठ्या प्रमाणात तिकिटे आरक्षित केली जात असल्याने फातोर्डा मैदानावरील सामने हाऊसफुल्ल होणार असल्याचे ते म्हणाले. ब्राझिल, जर्मनी या संघांच्या सामन्यांसाठी तिकिटांसाठी मोठी मागणी आहे. येथे होणार्‍या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांची तिकिटेही बरीच संपली आहेत. त्यामुळे सर्व सामन्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे ते म्हणाले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सामने गोव्यात व्हावेत यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

यावेळी श्री. धेंपो यांनी गोव्यात फुटबॉलच्या विकासासाठी गोमंतकीयांनी आपल्या मुलांना मनापासून प्रोत्साहन देण्याचा सल्ला दिला. पालक तसेच शाळांनी फुटबॉलची आवड असलेल्या मुलांना मदतीचा हात देत परिश्रमाची कास धरण्यास प्रोत्साहन द्यावे. फुटबॉलच्या विकासासाठी सांघिक प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. ईशान्येकडील राज्यांत कुशल युवा खेळाडू पुढे येत आहेत. परिस्थितीमुळे तेथील तरुण फुटबॉल करिअर निवडतात. मात्र, गोव्यात फुटबॉलच्या ध्येयाने पछाडलेले फारच कमी आहेत. साधनसुविधांसह येथे सर्व काही मिळते. मात्र, येथे व्यावसायिक खेळाडूंसह सगळेजण फुटबॉलकडे गंभीरतेने पाहत नाहीत. फुटबॉलमध्ये क्रांती घडवण्यासाठी या वृत्तीत बदल झाला पाहिजे असे धेंपो म्हणाले.