विश्‍वचषकाचे अखेरचे शिलेदार

0
150

– संदीप मणेरीकर
विश्‍वचषकाचं बिगूल वाजून आता काही तास उलटले आहेत. क्रिकेटचा उत्सव सुरू झालेला आहे. जवळ जवळ दीड महिना हा ज्वर आता असाच चालू राहणार आहे. या उत्साही वातावरणात क्रिकेटप्रेमी अगदी न्हाऊन निघणार आहेत. यंदाचा हा विश्‍वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या दोन देशांनी संयुक्तरित्या आयोजित केलेला आहे. अगदी तगड्या संघासोबतच अगदी नवखे म्हणावेत असे संघही या विश्‍वचषकात सहभागी झाले आहेत. दोन गटात एकूण १४ संघ सहभागी झालेले आहेत. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च असे तब्बल ४४ दिवस हे सामने असणार आहेत. अशा या विश्‍वचषक स्पर्धेत असे कितीतरी खेळाडू असतील की जे आज आपल्या वयानुसार निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. आपला दर्जेदार फॉर्म कायम ठेवूनही केवळ वय हाच निकष लावून त्यांना एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यानंतरही आणि त्याच्या चाहत्यांना या खेळाडूने आणखी खेळायला हवं असं वाटत असतानाही निवृत्त व्हावं लागत आहे. हे शिलेदार यापुढील विश्‍वचषकात कदाचित दिसणार नाहीत. यात भारतीय संघाचेही काही खेळाडू आहेत. तसेच इतर संघांचेही खेळाडू आहेत वा असतील.
महेंद्रसिंह धोनी
भारतीय संघावर नजर टाकल्यास संपूर्ण संघात एक तरुण खेळाडूंचा जोश दिसत आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार असलेला आणि नुकताच कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतलेला महेंद्रसिंह धोनी हा कदाचित पुढील विश्‍वचषकात दिसणार नाही. कारण आज त्याचं वय ३३ वर्षं आहे. पुढील विश्‍वचषक येईल त्यावेळी त्याचं वय ३७ वर्षं असेल. त्यामुळे धोनी पुढील विश्‍वचषकपर्यंत भारतीय क्रिकेट संघात टिकेल याचा भरवसा नाही. बरं त्याचा आत्ताच्या फॉर्मचा विचार केल्यास त्या आधारेही तो संघात टिकून राहू शकत नाही. २००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या धोनीने विश्‍वविजेते पद मिळवून दिले तसेच सन २०११ मध्ये झालेल्या पन्नास षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतही त्याने भारतीय संघाला विश्‍वचषक मिळवून दिला होता.
कुमार संगकारा
सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक तसेच ज्येष्ठ खेळाडू कुमार संगकारा. नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये त्याने क्रिकेटचे भीष्माचार्य डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम तोडलेला आहे. केवळ वय हा एकच निकष त्याच्या कामगिरीआड येऊ शकतो मात्र तोही पुढील विश्‍वचषकामध्ये. या विश्‍वचषकात संगकाराकडून श्रीलंकन संघाला अशाच जबरदस्त फॉर्मची अपेक्षा आहे. एक दिवशीय क्रिकेट सामन्यात जलद गतीने ११ हजार, १२ हजार आणि १३ हजार धावा बनवणारा फलंदाज म्हणून संगकाराने विक्रम रचलेला आहे. वर्ल्डकप टी-ट्वेंटी च्या विश्‍वचषक विजेत्या श्रीलंका संघात त्याचं योगदान जबरदस्त आहे. एक दिवशीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करणार्‍या खेळाडूंच्या यादीत तो तिसर्‍या स्थानावर आहे. मात्र दुसर्‍या स्थानावरील रिकी पॉटिंगपेक्षा तो केवळ ११ धावांनी मागे आहे. १३ हजार धावांचा रतीब घालणारा संगकारा या विश्‍वचषकात हा विक्रम सहज मोडेल असं त्याच्या आजच्या फॉर्मवरून म्हणायला हरकत नाही. आज त्याचं वय ३७ वर्षे आहे. त्यामुळे पुढील विश्‍वचषकात तो खेळू शकणार नाही.
माहेला जयवर्धने
आज ३७ वर्ष वयाच्या असलेल्या माहेला जयवर्धने श्रीलंकेचा माजी कर्णधार आहे. एक दिवशीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी १२ हजार धावांचा तो मानकरी बनला आहे. कसोटी सामन्यात दहा हजार धावा बनवणारा महाले जयवर्धने हा श्रीलंकेचा पहिला फलंदाज बनला. तिसर्‍या स्थानासाठी कोणासोबतही सर्वाधिक धावांची भागिदारी करणार्‍याचा विक्रम जयवर्धनेच्या नावावर आहे. यापूर्वी तो विक्रम राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या जोडीच्या नावे होता. २००७ या विश्‍वचषकात जयवर्धने सर्वाधिक धावा बनवण्यात दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता. एक दिवशीय सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम जयवर्धनेच्या नावे आहे. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक पुढील विश्‍वचषकात दिसण्याची शक्यता नाही.
तिलकरत्ने दिल्शान
श्रीलंकेचा तिलकरत्ने दिल्शान हा आणखी एक गुणी किक्रेटपटू. आज तो वयाच्या ३७ व्या वर्षीही उत्तमोत्तम कामगिरी करत आहे. अगदी आक्रमक आणि तुफानी फलंदाज म्हणून त्याचा नावलौकिक आहे. शिवाय उत्तर क्षेत्ररक्षक आणि फिरकी गोलंदाज म्हणूनही त्याने आपला ठसा उमटवलेला आहे. २०१३ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतल्याची घोषणा केली. टी-ट्वेंटी विश्‍वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दिल्शानच्या नावावर होता. मात्र हा विक्रम त्यानतंर भारताच्या विराट कोहलीने मोडला. २०११ च्या विश्‍वचषकात दिल्शानने ५०० धावा करत एक विक्रम प्रस्थापित केला होता.
युनुस खान
भारत-पाकिस्तान सामना हा अत्यंत रोमांचक सामना म्हणून ओळखला जातो. कसोटी सामना असो वा एक दिवशीय वा टी-ट्वेंटी. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांसोबत अतिशय खुन्नसपणे खेळताना दिसतात. त्यातही भारताविरुद्ध टिच्चून आणि हमखास खेळणारा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा माजी कर्णधार युनुस खान. ऑस्ट्रेलियाविरोधात सलग तीन कसोटी सामन्यात तीन शतके ठोकणारा तो गेल्या ९० वर्षांतील पहिलाच खेळाडू बनला. हा फॉर्म आपण विश्‍वचषकातही कायम ठेवणार असून भारतासोबतच्या पहिल्याच सामन्यात आम्ही यंदा जिंकू असा आत्मविश्‍वास त्याने नुकताच व्यक्त केलेला आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला युनुस खान अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. मध्यंतरी मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याच्यावर बंदीही घालण्यात आली होती. मात्र तो सारा कलंक पुसून टाकत त्याने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. आणि विश्‍वचषकात भारतासोबत नेहमी हरलेल्या पाकिस्तानचा इतिहास यंदा बदलण्याची त्याने इच्छा व्यक्त केली आहे. फॉर्म आहे पण वय आड येत असल्यामुळे हा खेळाडू पुढील विश्‍वचषकात दिसणार नाही.
मिसबाह उल हक
विश्‍वचषक स्पर्धेत सर्वात बेभरवशी संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाकिस्तान संघाचे नेतृत्व ही तर काट्यावरची कसरत आहे. अशा या संघाचे नेतृत्व करणार्‍या मिसबाह उल हककडे पाकिस्तानी संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अर्धशतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम २०१३ साली तोडून तो विक्रम स्वतःच्या नावे करणारा पाकिस्तानचा मिसबाह उल हक हा ४० वर्षांचा खेळाडू आहे.
शाहिद आफ्रिदी
विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वात वेगवान शतक आपल्या नावे करण्याची मनीषा उरी बाळगून असलेला पाकिस्तानचा अष्टपैलू आक्रमक खेळाडू म्हणजे शाहिद आफ्रिदी. या विश्‍वचषकानंतर आपण क्रिकेटचा संन्यास घेणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळताना केवळ ३७ चेंडून शतक ठोकण्याचा आफ्रिदीचा विक्रम जवळजवळ १७ वर्षे अबाधित होता.