विशेष संपादकीय – निर्विवाद वर्चस्व

0
111

पणजीकरांनी सतत पाचवेळा वाढत्या मताधिक्क्यानिशी निवडून दिलेल्या मनोहर पर्रीकरांचा राजकीय वारसदार तशाच भरघोस मतांनी निवडून देऊन पणजीवासियांनी पर्रीकरांप्रतीचे आपले प्रेम आणि विश्वास पुन्हा एकवार व्यक्त केला आहे. भाजप सरकारचे स्थैर्य, सरकारची कामगिरी याच्यापेक्षाही केवळ मनोहर पर्रीकर या आपल्या नेत्याविषयीचे प्रेम, आपुलकी या निकालातून अधिक व्यक्त होते आहे. ‘बाय वन गेट वन फ्री’ च्या आवाहनाला मतदारांनी दिलेला हा प्रतिसाद आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जे बळकट संघटन पर्रीकरांनी पणजीमध्ये ९४ च्या निवडणुकीपासून उभे केले, त्यालाही या विजयाचे श्रेय जाते. सिद्धार्थ कुंकळकर यांनी पणजीचे घर न् घर प्रचारादरम्यान पिंजून काढले होते आणि कार्यकर्त्यांनी आपले मतदार मतदानाला बाहेर पडतील याची पुरेपूर काळजी घेतली. या परिश्रमांचे फळ त्यांना अर्थातच मिळाले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार व शहराचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना सुमारे ४६०० मते मिळाली आहेत. गेल्या २०१२ च्या निवडणुकीत पर्रीकरांना ११,०८६ मते मिळाली होती व त्यांची आघाडी ६०६८ मतांची होती. यावेळी सिद्धार्थ कुंकळकरांना ९९८९ मते मिळाली आहेत आणि त्यांची आघाडी ५३६८ मतांची आहे. म्हणजे फरक फक्त सातशे मतांचा आहे. जे दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी समीर केळेकर यांना ६२०, तर वायंगणकर यांना १४० मते मिळाली. यापैकी बहुतेक मते ही मूळ भाजपची असतील. ‘नोटा’ या विकल्पाची निवड ३३० मतदारांनी केली, त्यामध्ये उमेदवारांबाबत वैयक्तिक नाराजी असलेली मंडळी असतील आणि बहुधा बाबुश समर्थक मतदारांनीही हा विकल्प निवडलेला असू शकतो. पण एकूण चित्र पाहता गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळचा निकाल काही वेगळे चित्र दर्शवीत नाही. बाबुश मोन्सेर्रात यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध केलेले बंड म्हणजे वाहत्या वार्‍याच्या बाजूनेच राहण्याचा प्रकार होता. फुर्तादो यांच्या पराभवातून स्वतःचे राजकीय अस्तित्व कमकुवत झाल्याचा संदेश जनतेत जाऊ नये यासाठीच त्यांनी हा बंडाचा घाट घातला होता हे स्पष्ट आहे. निकालावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत नाही, कारण कॉंग्रेसची जी सुमारे चार हजार मते पणजीत आहेत, ती सुरेंद्र यांच्या बाजूनेच राहिली आहेत. सुरेंद्र यांनी प्रयत्नांची शिकस्त जरूर केली, पण कॉंग्रेस पक्षाचे पणजीत संघटन असे नव्हतेच. त्यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेतील बाबुश गटही यावेळी त्यांच्या बाजूने नव्हता. असे असूनही त्यांनी कॉंग्रेसच्या पारंपरिक मतांना खिंडार पडू दिलेले नाही हे लक्षात घ्यावे लागेल. अल्पसंख्यक मतांचा फायदा त्यांना मिळाल्याचे दिसते. त्यांच्या प्रभागातील मतदारांचा त्यांच्यावरील विश्वास या निवडणुकीतही दिसून आला आहे. कांपालमधील मतदान केंद्र क्र. २६, २७ मध्ये त्यांनी सिद्धार्थ यांच्यावर आघाडी घेतल्याचे दिसून आले. केंद्र क्र. २५ व क्र. ३० मध्ये फुर्तादोंना आघाडी मिळाली नसली, तरी त्यांची मते तोडीस तोड आहेत. मेरी इमॅक्युलेट शाळा केंद्रावरही फुर्तादो यांना आघाडी मिळाली आहे. फुर्तादोंना आघाडी मिळवून दिलेली तीन मतदान केंद्रे सोडली, तर सर्वत्र सिद्धार्थ कुंकळकर आघाडीवर राहिले आहेत. बोक द व्हाकसारख्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना फुर्तादोंच्या सहापट मते मिळाली आहेत. अन्यत्रही मिळालेली आघाडी भरभक्कम आणि निर्णायक आहे. पणजी मतदारसंघामध्ये भाजपचे प्राबल्य सतत वाढते राहिले आहे. यावेळीही त्याचेच प्रत्यंतर हा निकाल देतो आहे. ८४ व ८९ च्या निवडणुकीत जेव्हा भाजपला अवघी अडीचशेच्या आसपास मते मिळायची, तेव्हा मगो उमेदवाराच्या पारड्यात चार हजार मते असत. परंतु ९४ मध्ये पणजीच्या राजकीय क्षितिजावर मनोहर पर्रीकर यांचा उदय झाला आणि भाजपचे कार्य मतदारसंघात फोफावत गेले. ९४ पासून २०१२ पर्यंत पर्रीकरांना मिळालेली मते याची साक्ष देतात. ४४ टक्के, ५१ टक्के, ५५ टक्के, ६७ टक्के अशी त्यांच्या मतांची टक्केवारी या काळात वाढतच गेली. यावेळी सिद्धार्थ यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ६३.६० टक्के आहे. दोन अपक्षांनी भाजपच्या मतांना फोडण्याचा केलेला प्रयत्न विशेष परिणाम दाखवू शकलेला नाही. पणजीच्या विकासाचे काही प्रश्न अर्धवट राहिलेले असले, तरीही ते पूर्ण होतील या विश्वासानेच मतदारांनी मतदान केले आहे हे हा निकाल सांगतो आहे. माजी आमदार पर्रीकरांनी आश्वासन दिलेल्या, परंतु पूर्ण न झालेल्या विषयांना कॉंग्रेसने जनतेसमोर मांडले होते. पणजीची कचरा समस्या, पार्किंग व वाहतूक कोंडीची समस्या, आल्तिनोसारख्या भागातील पाणीटंचाईची समस्या, सांडपाणी निचर्‍याचा प्रश्न, बेती – पणजी पूल, पाटो – नेवगीनगर पूल, रायबंदरचा मार्केट प्रकल्प, पणजी मासळी बाजाराचे स्थलांतर, पालिकेला अपुरा निधी, मांडवीतील तरंगते कॅसिनो, असे मुद्दे पुढे करून कॉंग्रेसने भाजपप्रती असंतोष निर्माण करायचा प्रयत्न केला, परंतु मतदारांनी त्याला भीक घातलेली दिसत नाही. अर्थात, नव्या आमदारांना आता जी दोन वर्षे मिळणार आहेत, त्या काळामध्ये त्यांनी आपण जाहीरनाम्यात दिलेल्या ‘पणजी फर्स्ट’ या वचनाला जागून या सार्‍या विषयांचा नेटाने पाठपुरावा करावाच लागेल. जनतेचे हे अलोट प्रेम जबाबदार्‍याही घेऊन येत असते याची जाणीव सिद्धार्थ यांनी ठेवावी. विजयाचा स्वीकार त्यांनी ज्या नम्र भावनेने केला, तीच भावना त्यांच्या आमदारकीच्या काळातही त्यांना कायम ठेवता आली, तर पुढच्या निवडणुकीत त्यांना कोणी ‘पॉलिटिकल पपेट’ म्हणून हिणवू शकणार नाही. तशी स्वतःची स्वतंत्र प्रतिमा त्यांना घडवावी लागेल. मनोहर पर्रीकर यांचे मार्गदर्शन आणि सरकारचे पाठबळ त्यांना सतत राहील ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाब आहे. त्यामुळे आता पणजीला ग्रासून राहिलेल्या प्रश्नांना ते कसे हाताळतात, आपल्याच सरकारकडून कसे कामे करून घेतात आणि जनतेचा विश्वास कसा सार्थ ठरवतात त्यावरच त्यांचा कस लागेल.