विशेष संपादकीय – त्सुनामी!

0
96

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षाला अस्मान दाखवले. मोदींच्या लाटेवर स्वार होऊन हवेत तरंगत निघालेल्या भाजप नेत्यांना या अत्यंत नामुष्कीजनक आणि अपमानास्पद पराभवाने पार जमिनीवर आणले आहे, जनतेला गृहित धरणार्‍यांची गुर्मी ‘आप’ च्या त्सुनामीने उतरवली आहे. एका अर्थी हा निकाल भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हितावह आहे, कारण मोदी लाट देशाला जवळजवळ एककेंद्रित्वाकडे घेऊन चालली होती आणि त्यामध्ये आता हुकूमशाहीची बीजे रुजणार की काय अशी भीती हळूहळू डोके वर काढू लागली होती. त्यामुळे सार्‍यांचे पाय या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक निकालाने जमिनीवर आणले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सातपैकी सातही जागा भाजपला बहाल करणारी दिल्लीची जनता यावेळी मात्र केजरीवाल यांच्या पाठीशी का उभी ठाकली याचे चिंतन आता भाजपला करावे लागेल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षनेतृत्वाने किरण बेदींना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून लादले, ते भाजपच्या पारंपरिक मतदारांना रुचले नाही हे तर स्पष्टच आहे, पण या पराभवाचे खापर केवळ बेदींवर फोडून नामानिराळे होता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व केले होते. त्यामुळे हा निकाल केंद्र सरकारच्या कामगिरीला प्रतिबिंबित करीत नाही ही सारवासारव व्यर्थ ठरते. पंतप्रधान मोदींचा करिष्मा का चालू शकला नाही हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ‘अच्छे दिन’ आणण्याची घोषणा करीत मोदींनी ज्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा वाढवल्या, तिला हे सरकार सर्वसामान्यांचे नव्हे, तर भांडवलदारांचे सरकार असल्याचे आज वाटू लागले का? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांशी मोदींनी ‘बराक’, ‘बराक’ करीत भले भलती सलगी दाखवली असेल, ‘मेक इन इंडिया’ म्हणत विदेशी भांडवलदारांसाठी पायघड्या अंथरल्या असतील, विदेशांतील दौरे आणि मेडिसन स्क्वेअरसारख्या हायफाय सभा रॉकस्टारच्या थाटात गाजवल्या असतील, अदानी – अंबानींसमवेत व्यासपीठे भूषवली असतील, पण या देशातील गोरगरिबांच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षाची धग कमी करण्यासाठी या सरकारने काय केले, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला होता. त्यामुळे जेव्हा आम आदमी पक्षाने या जनतेला साद घातली आणि बघा, तुमचे मोदी दहा लाखांचा विदेशी सूट घालून फिरत आहेत, दिवसाला चार कडक इस्त्रीचे झकपक कुर्ते आणि महागड्या कोटी घालून मिरवत आहेत हे जनतेला सांगू लागले, तेव्हा साहजिकच मोदींची ‘चायवाल्या’ ची प्रतिमा गळून पडली. या व्हीआयपी संस्कृतीचा तिटकारा असलेला सामान्य दिल्लीकर पुन्हा एकवार केजरीवाल यांच्यासारख्या आपल्या वीज, पाणी, स्वच्छता अशा दैनंदिन प्रश्नांमध्ये रस घेणार्‍या साध्या माणसाच्या पाठीशी उभा राहिला. दिल्लीत गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे सर्व उमेदवार आपापल्या मतदारसंघांशी जोडलेले राहिले होते. त्याचा फायदा त्यांना यावेळी मिळाला आहे. ज्यांची गेल्यावेळी डिपॉझिटे जप्त झाली होती, त्यांनाही मतदारांनी यावेळी विजयाची वाट दाखवली आहे. आजवर भाजपाला तुल्यबळ ठरत आलेल्या कॉंग्रेसची स्थिती दिवसेंदिवस अतिशय निर्नायकी आणि दारूण बनत चाललेली आहे. दिल्लीतील निकाल हा तर कॉंग्रेसच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा म्हणावा लागेल. त्यामुळे कॉंग्रेसचा पारंपरिक निधर्मी, अल्पसंख्यक, दलित मतदारही यावेळी दिल्लीत आम आदमी पक्षाने आकृष्ट केला. त्यामुळे आम आदमी पक्षाची मतांची टक्केवारी मात्र दुपटीहून वाढली आहे. भाजपची पारंपरिक मते शाबूत आहेत ही तेवढी पक्षासाठी जमेची बाब, परंतु सत्तरपैकी इन मिन तीन जागा ही नामुष्की मात्र ओढवली आहे. मोदींचे उडते विदेश दौरे भाजपला महाग पडले. शिवाय मध्यंतरीच्या काळात दिल्लीत झालेले अल्पसंख्यकांच्या प्रार्थनास्थळांवरील हल्ले, कडव्या हिंदुत्ववाद्यांची बेताल, बेबंद वक्तव्ये यांनीही भाजपपुढील पेच अधिक बिकट केला. अत्यंत काटेकोर व शिस्तबद्ध निवडणूक नियोजन आणि त्याला असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्पित कार्यकर्त्यांची जोड ही भाजपच्या निवडणूक प्रचाराची बलस्थाने असतात. मात्र, सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांचे तोडीस तोड संघटन यावेळी आम आदमी पक्षाने उभे केले आणि दिल्लीचा कानाकोपरा गेल्या काही महिन्यांत पिंजून काढला. ज्या मतदारांपर्यंत भाजपा पोहोचू शकला नाही, तेथवर आम आदमी पक्ष पोहोचला. सवलतीत वीज, मोफत पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगारादी आश्वासने आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रशासकीय निर्णयांमध्ये जनसहभाग, कारभारातील पारदर्शकता आदी आश्वासनांनी दिल्लीवासियांना भुरळ घातली. आम आदमी पक्षापाशी हुकुमाचा एक्का होता तो म्हणजे अरविंद केजरीवाल. निवडणूक तोंडावर आली तरी त्यांना तोडीस तोड चेहरा भाजपापाशी नव्हता. त्यामुळे शेवटच्या क्षणी किरण बेदींना आयात करण्यात आले, परंतु त्यातून पक्षप्रतिमा वाढण्याऐवजी खालावली. कृष्णानगरसारख्या हर्षवर्धन यांच्या बालेकिल्ल्यात बेदी हरल्या हे बोलके आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांनी घरी बसणे पसंत केले. समाजाच्या सर्वसामान्य स्तराच्या ह्रदयाला साद घालण्यात आम आदमी पक्ष यशस्वी ठरला आणि त्यातून कालचा नेत्रदीपक विजय साकारला. अर्थात ही विजयश्री हा केवळ पहिला टप्पा आहे. आता केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाची पुढची कामगिरी अत्यंत महत्त्वाची असेल. गेल्या वेळी अवघ्या ४९ दिवसांत सत्ता सोडून पलायन केले, त्याचा कलंक पुसून काढून जनताभिमुख सरकार देण्याचे आव्हान या घडीस केजरीवाल यांच्यापुढे आहे. भारतीय लोकशाहीच्या संवैधानिक चौकटीत आणि अराजकतावादाला खतपाणी न घालता अत्यंत जबाबदारीने आणि कसोशीने दिल्लीवासियांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांना ‘आप’ च्या सरकारला भिडावे लागेल आणि आपला पक्ष खरोखरीच आम आदमींचा पक्ष आहे हे सिद्ध करावे लागेल. निवडणूक जिंकण्याएवढेच हे कामही कठीण आहे. हे आव्हान जर ते पेलू शकले, तर हा दिल्ली प्रयोग देशात अन्यत्रही यशस्वी ठरण्याच्या शक्यता निर्माण होऊ शकतात. अर्थात, त्यासाठी दिल्ली ही प्रयोगभूमी असेल.