‘विशेष मुले’ही बनतात स्वावलंबी!

0
137

सिद्धेश वि. गावस (लोकविश्‍वास प्रतिष्ठान)

राजूच्या आईने पुढाकार घेतला म्हणून. जर तो शिकत नाही असे समजून त्याला घरी ठेवला असता तर काय झालं असतं?…
ही मुलं शिकत नाही, त्यांना वाचता-लिहिता येत नाही म्हणून काय झालं? त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवता येतं.

राजू शाळेतून आल्यावर गप्पच असायचा. कोणी काही सांगितल्यावर त्याच्यावर ओरडत असे आणि भरपूर राग आल्यावर घरातील भांडी फेकून देई. त्याची आई बिचारी हे त्याचं कृत्य पाहून हताश होई. कारण राजू एकुलता एक असल्याकारणामुळे ती काहीच करू शकत नव्हती. राजू विशेष होता पण ते त्याच्या घरातील माणसांना कळले नव्हते. राजूला शाळेत कितीही शिकवले तरी त्याला काहीच कळत नव्हते. त्याच्या बरोबरचे त्याचे मित्र त्याच्या पुढे गेले होते. तो मात्र एकाच वर्गात होता. एक दिवस शिक्षकांनी त्याच्या आईला शाळेत बोलवून घेतलं व त्यांना दुसर्‍या शाळेत पाठवा, असे सांगू लागले. कारण तो त्या शाळेत काहीच शिकू शकत नव्हता. घरातील माणसांनीसुद्धा त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फरक पडला नाही. त्याला आज शिकवलं आणि दुसर्‍या दिवशी विचारलं तर त्याला काहीच येत नसे. आईला मात्र आपला मुलगा शिकत नाही म्हणून काळजी वाटू लागली. पण करणार काय? राजू ‘स्लो लर्नर’ होता हे शिक्षकांच्या लक्षात आले नव्हते. ते समजत त्याला काहीच येत नाही. मूल जरी सामान्य दिसलं तरी ते ‘स्लो लर्नर’ आहे की नाही ते त्याला शाळेत घातल्यावरच आपल्याला कळतं. तसेच त्याचे चार प्रकार आहेत.
१) डिसलेक्सिया – या प्रकारातील मुलांना बरोबर वाचता येत नाही. ते एक एक शब्द वाचतात. त्यांना जर ‘ब’ वाच म्हणून सांगितले तर ते ‘भ’ वाचतात.
२) डिसकॅलक्युलिया – यात मुलांना गणित विषयात अडचण येते. त्यांना अंक मोजता येत नाही. बजाबाकी करता येत नाही. त्यांना ३६ हा अंक लिहिण्यास सांगितला तर ते ६३ लिहितात.
३) डिसग्राफिया – यामध्ये मुलांना लिहायलाच जमत नाही. त्यांना समजून घेऊन लिहिता येत नाही. मोठमोठी उत्तरे ते लिहू शकत नाही आणि याच्यातील सर्व लक्षणे राजूमध्ये होती.
एक दिवस माझ्याकडे पूजा होती व त्या पूजेला राजू आणि त्याची आई आली होती. मी विशेष मुलांचा शिक्षक असल्यामुळे राजूच्या हालचालींवरून मला समजले की तो ‘विशेष मुलगा’ आहे. तेव्हा त्याच्या आईकडे मी त्याबद्दल विचारणा केली असता ती म्हणाली, ‘‘त्याला शाळेत शिकवलेलं कळत नाही. स्वतःचं नाव सुद्धा लिहिता येत नाही.’’ मग मी त्यांना सांगितलं की अशी भरपूर मुलं असतात. त्यांच्यासाठी वेगळी शाळा असते. त्या शाळेत गेल्यावर ही मुले चांगल्या प्रकारे शिकतात, पण त्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बुद्ध्यांत प्रमाणपत्र लागते आणि ते मिळवण्यासाठी बांबोळीला जावं लागहतं. हे सर्व मी सांगितल्याप्रमाणे त्या मातेनं केलं व शेवटी त्याला विशेष शाळेत पाठवलं.

सुरुवातीला ती राजूला सकाळी घेऊन जाई व दुपारी घरी परत घेऊन येई. शाळा सुटेपर्यंत ती त्याच्या शाळेतच थांबायची. तीन महिन्यांनी राजू स्वतःचे नाव लिहू लागला. ते पाहून ती माता आनंदाने फुलून गेली. पहिली दोन वर्षे राजूला शाळेत घेऊन येत व घेऊन जात. नंतर सहा महिन्यांनी राजू स्वतः बसमधून यायला लागला. जेव्हा राजू विशेष मुलांच्या शाळेत जायचा तेव्हा त्याला त्याचे काका म्हणायचे, ‘‘कशाला त्याला शाळेत पाठवता? या शाळेत शिकला नाही, त्या शाळेत जाऊन काय शिकणार?’’ पण त्या मातेनं ठरवलं होतं, काही करून आपल्या मुलाला शिकवायचंच!

राजू मोठा झाल्यामुळे त्याला व्होकेशनलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. तिथं शिक्षकाने शिकवलेले पेपर बॅग्ज, मेणबत्ती तो व्यवस्थित बनवत होता. एक दिवस त्याच्या शाळेमार्फत राजूला कारखान्यात काम करण्यासाठी ठेवण्यात आलं. राजू त्या कारखान्यात व्यवस्थित काम करतो. हे का शक्य झालं?… कारण राजूच्या आईने पुढाकार घेतला म्हणून. जर तो शिकत नाही असे समजून त्याला घरी ठेवला असता तर काय झालं असतं?…

ही मुलं शिकत नाही, त्यांना वाचता-लिहिता येत नाही म्हणून काय झालं? त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवता येतं. आज राजूचे वडील आजारी असतात पण राजू कामाला जातो. त्याची आई म्हणते, ‘‘जर त्यावेळी मी राजूला विशेष मुलांच्या शाळेत पाठवलं नसतं तर आजयुद्धा तो घरीच राहिला असता व मी कुणाकडे पाहिले असते?’’
आज राजूच्या आईने घेतलेल्या एका निर्णयामुळे राजू स्वावलंबी झाला.