विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान यांचा साक्षात्कार घडविणारे दक्षिणेश्‍वर मंदिर

0
531

– सौ. पौर्णिमा केरकर

खादा प्रदेश, परिसर पाहण्याची मनाची ओढ ही प्रत्येक वेळी निसर्गसंपन्नच परिसराची असेल असे नाही. अशा अनेक जागा आहेत की ज्यांना वैचारिक उंची प्राप्त झालेली आहे. आत्मा आणि परमात्मा यांतील संबंध दर्शविणार्‍या अंतिम सत्याच्या साक्षात्काराने जी माती पुनीत झालेली आहे, इतिहास साक्षी असलेल्या अनेक वास्तूंनी ज्या प्रदेशाचे सौंदर्य खुलविले आहे, असा प्रदेश ज्याला शक्तिपीठ मानले जाते- ते म्हणजेच कोलकाता (कलकत्ता) शहर.
या शहराला काव्याची, कला-संस्कृती-इतिहास-अध्यात्माची आंतरिक लय आहे. गंगा नदीच्या प्रवाहाने या सार्‍या परिसरालाच शुचिर्भूत केलेले आहे. शक्तिरूपिणी महाकालीचे रौद्रभीषण रूप दिसते ते याच परिसरात. सत्याचे आचरण व वाईटाचे निर्गमन ही इथली परंपरा. त्यामुळेच महाकालीचे विराट रूप दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी सदैव तत्पर असलेले दिसते. भवतारिणी ‘काली’ ही इथली शक्ती. या कालिमातेची वेगवेगळी रूपे विविध भागांत आपल्या दृष्टीस पडतात. कालिमातेच्या रूपाचे वर्णन करताना ती काळ्या घोड्यावर स्वार होऊन पुढे जाणारी, काळ्या रंगाचेच वस्त्र, अलंकार, माळा, काळे उटणे धारण केलेली, हातात खड्‌ग घेऊन भक्तांच्या रक्षणासाठी त्वरेने धावत येणारी अशी आहे.
काली ही महाकाल म्हणजेच ‘शिव’ यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारी माता. शव व शिव ही एकाच तत्त्वाची नावे. निराकार ब्रह्माचे सगुण साकार रूप म्हणजे ‘शव.’ ते निश्‍चल, स्थिर असते. त्याच्यात जेव्हा शक्तीचे स्पंदन सुरू होते तेव्हा ते सजीवंत होऊन कार्यप्रवण होते. सृष्टीच्या निर्माणासाठीची त्याची सक्रियता वाढत जाते. तेच ‘शिव’ असते. ज्या ब्रह्मात शक्ती नाही ते म्हणजे ‘शव,’ तर शक्ती ज्याच्यात पुरेपूर भरलेली आहे असे ब्रह्म म्हणजे ‘शिव.’ हे तत्त्व चैतन्यमयी, विशाल, आध्यात्मिक तत्त्वचिंतनात समरस होणारे, म्हणून भक्तगणांसाठी सामर्थ्यशाली असलेले. कालिमातेची उपासना बंगालमध्ये प्राचीन काळापासूनच चालू आहे. उग्र, भयंकर, रक्षा करण्याच्या काळात चतुर्भूज, मस्तकाभोवती अग्निप्रभावलय, गळ्यात मुंडमाळा अशा स्वरूपात असलेली कालिमाता बंगालवासीयांना अतिप्रिय आहे. ज्येष्ठ आश्‍विन व माघ या महिन्यांच्या कृष्ण चतुर्दशीला कालिपूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. श्री रामकृष्ण परमहंस यांना साक्षात्कार झालेल्या कालिमातेचे दर्शन गंगा नदीच्या पात्राशेजारी वसलेल्या दक्षिणेश्‍वर मंदिरात अनुभवण्याचा योग हा पश्‍चिम बंगालच्या प्रवासात आला.
कोलकात्याच्या उत्तरेला गंगा नदीच्या काठावर दक्षिणेश्‍वर नावाचे छोटेसे गाव वसलेले होते. याच जागेवर पुढे राणी रासमणीने कालिमातेचे सर्वांगसुंदर मंदिर बांधून घेतले. असे सांगितले जाते की राणीच्या अंतर्मनात नेहमीच भक्तिचिंतन असे. राणी रासमणी सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय प्रगल्भ होती. शक्तिरूपिणी कालिमातेवर तिची नितांत श्रद्धा होती. संसाराचे मोहपाश तिला सतावत होते, त्यामुळे ते सर्व त्यागून त्यांनी तीर्थाटाला जाण्याचा निर्णय घेतला. तो दिवस अगदी जवळ येऊन पोहोचला. तीर्थाटनाला जाताना चोवीस बोटींचा प्रवास त्यांना करायचा होता. सोबत नातेवाईक व नोकरचाकर मंडळी होती. एकूण काय तर मोठा लवाजमा बरोबर घेऊनच राणी रासमणीचा प्रवास होणार होता. प्रवासाचा दिवस उजाडणार होता, तोच कालिमातेचा साक्षात्कार राणीला झाला. ‘काशी बनारसला न जाता कालिमातेचे मंदिर उभारा’ असा दृष्टांत मातेने दिला आणि मग क्षणाचाही विलंब न लावता राणीने मंदिर बांधण्यास सुरुवात केली. आज दक्षिणेश्‍वर मंदिर पाहताना मनात श्रद्धा तुडुंब भरून येते.
दक्षिणेश्‍वर मंदिर म्हणजे बंगाली स्थापत्त्यकलेचा सर्वांगसुंदर नमुनाच म्हणावा लागेल. मंदिरात असलेली कालीची मूर्ती ही कृष्णवर्णी, मुंडमालिनी व लवलवत्या जिभेची आहे. हे मंदिर भव्य आणि अवाढव्य दिसण्यापेक्षा आखीव, रेखीव व नेटके आहे. विशाल आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर कोण्या एखाद्या चित्रकाराने हे चित्र काढलेले आहे असा आभास निर्माण व्हावा एवढा त्यात जिवंतपणा साधला गेला आहे. बंगाली स्त्रीमनाची देवीवर असलेली विलक्षण श्रद्धा इथे अनुभवता येते.
दक्षिणेश्‍वर मंदिर पाहण्यासाठी आम्ही उतरलो तेव्हा रखरखीत दुपार होती. मे महिन्यातील रणरणत्या उन्हाचे चटके पावलांना सहन करावे लागणारच होते. त्याशिवाय एवढे सारे कडक ऊन असूनही फार मोठ्या प्रमाणात पर्यटक, भक्तगण देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. गर्भगृहात शिवाच्या हृदयावर पाय ठेवून उभी असलेली ही मूर्ती. हजारो कमळपाकळ्यांच्या सान्निध्यातील मूर्तीचे तेजोवलय विकसित होत जाते. आजूबाजूला शिवाची जवळ जवळ बारा मंदिरे दक्षिणेकडेच तोंड करून असलेली. गंगेचा फाटा आणि हुगळी नदीचे सान्निध्य या परिसराला लाभलेले दिसते. हजारो भाविक आजही भक्तिभावाने या देवतेची पूजा करतात. गंगामातेचे स्थान भारतीय समाजमनात वंदनीय आहे आणि या गंगेचा सहवास मंदिराला लाभला, म्हणजे अतिप्रियच झाले. त्याबरोबरीनेच श्री रामकृष्ण परमहंस यांच्या पावन सहवासात याच देवालयाने तीन दशके भवतारिणीची मनोभावे भक्ती केली. त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतीने, शुचिर्भूत पावित्र्याने, अंतर्ज्ञानाने लावलेल्या तत्त्वज्ञानाच्या शोधाने दक्षिणेश्‍वर देवालयाचा सारा परिसरच भारलेला होता. आत्मा आणि परमात्मा यांतील परस्पर संबंध दर्शविणार्‍या अंतिम सत्याचा प्रसार येथे होत राहिला. श्री रामकृष्णांनी कालिमातेची आज्ञा घेऊनच अद्वैत मार्गाची दीक्षा घेतली. कालिमातेचा त्यांना साक्षात्कार घडला. ‘भाव मुखी रहा’ असे कालिमातेने सांगितले तेव्हा त्यांची अवस्था ही लौकिक आणि पारलौकिकाचा अभूतपूर्व संगमच होती. घरच्या कठीण परिस्थितीमुळेच आपल्या वडीलबंधूबरोबर आलेल्या श्री रामकृष्णांचे अद्वैतच इथे साधले. मॉं काली, आई चंद्रमणीदेवी, पत्नी शारदामणी या तिघांमध्येही एकाच दिव्यतत्त्वाचा त्यांना प्रत्यय येई. दक्षिणेश्‍वर मंदिर- हीच ती जागा जिथे रामकृष्णांना देव भेटला आणि याच जागेवर नरेंद्रला रामकृष्णांची भेट झाली. अलौकिक एकाग्रता आणि तीव्र स्मरणशक्ती यामुळेच स्वामी विवेकानंदांची इच्छाशक्ती प्रबळ झालेली होती. आपण देव पाहिलात का? हा प्रश्‍न विचारण्यासाठी विवेकानंद देवेंद्रनाथांकडे गेले. त्यांनी त्यांची भेट रामकृष्णांशी घालून दिली. त्यांनी त्यांना त्याचवेळी दक्षिणेश्‍वरी येण्यास सांगितले. भेटीचा तो ऐतिहासिक क्षण आला होता १५ जानेवारी १८८३.
दक्षिणेश्‍वरीला असलेले कालिमातेचे मंदिर पाहताक्षणीच दोन अलौकिक महामानवांच्या अभूतपूर्व भेटीचा तो क्षण नजरेसमोर आला. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच नतमस्तक व्हायला होते ते स्वामी विवेकानंदांच्या भव्य-दिव्य, आत्मविश्‍वासपूर्वक उभ्या असलेल्या पुतळ्यासमोर. आणि मग आठवतात रामकृष्णांनी विवेकानंदांशी याच मंदिरात दरवाजा बंद करून काढलेले उद्गार. एक आर्त तळमळ त्यात होती. जणू काही युगान्‌युगे ते स्वामी विवेकानंदांचीच वाट पाहत होते. ‘नरेन्द्र का रे इतका उशीर केलास? मी तुुझी वाट बघत असेन असा विचार एकदाही तुझ्या मनात आला नाही काय? लोकांची तीच तीच बोलणी ऐकून माझे कान अगदी किटून गेलेत. माझ्या मनातील गुज बोलण्यासाठी मला कोणीतरी हवे होते रे- नाहीतर माझे काळीज अशाने फुटून जाईल हे….’ एका काळजाची आर्त हाक दुसर्‍या काळजापर्यंत पोहोचली आणि युगप्रवर्तक महामानवाचे विचारसौंदर्य जगाला भावले.
ईश्‍वराच्या शोधात असलेल्या स्वामिजींना ऐहिक जीवनातील समस्यांनी त्रस्त केले असता ते जेव्हा कालिमातेला साकडे घालण्यासाठी जातात तेव्हा कालिमातेच्या दिव्यत्वाच्या अनुभूतीने त्यांच्या तोंडून फक्त ‘मला विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ती दे’ एवढेच शब्द आले. कालिमातेच्या मंदिराने या भूमीला विवेकत्व बहाल केले. ‘शिव’मधील चैतन्य हे या दोन महामानवांच्या अद्वैतात दिसून येते. या संपूर्ण परिसरालाच मानवतेच्या सद्विचारांचे प्रकटीकरण आहे. सत् हे अविनाशी, सृजनशील, मानवतेला मिळालेला तो शाश्‍वत वारसा आहे. भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीत या गुरू-शिष्याचे नाते आगळेवेगळे असेच आहे. स्वतःच्या जीवनाद्वारे त्यांनी आपले विचार, त्यांची सत्यता पटवून देण्याचा प्रयत्न समाजमनाला, शिष्यगणांना केलेला आहे. ‘रामकृष्ण संग्रह मंदिरा’च्या माध्यमातून हे कार्य अव्याहतपणे आजही सुरू आहे. असे अनेक प्रसंग, अनेक घटना, व्यक्ती यांच्या आठवणी या संग्रहमंदिराच्या माध्यमातून नजरेसमोर तरळतात. मॉं शारदादेवीचा दिनक्रम, त्यांना श्री रामकृष्णानी दिलेले आपल्या जीवनातील महत्त्वाचे स्थान, हे सारेच तिथे भेट देणार्‍यांना चिरंतन मूल्यांचा साक्षात्कार घडवतात. श्री रामकृष्णांनी तर आपल्या पत्नीची देवी म्हणूनच पूजा केली होती. स्त्रियांप्रतीचा त्यांचा दृष्टिकोनच त्यांची विचारशैली अधोरेखित करतो. पिंपळ, वड, बेल, अशोकाच्या वृक्षांनी तर हा परिसर नैसर्गिकरीत्या समृद्ध ठेवलेलाच आहे, शिवाय तत्कालीन काळातील वातावरणाचा आभास व्हावा अशा तर्‍हेची रचना लक्षवेधक ठरते.
कालिमातेच्या मंदिरपरिसरात एकदा का प्रवेश केला की तिथून बाहेर पडावेसे वाटतच नाही. बाहेरच्या आवारात उभे राहून समोर नजर टाकली तर ब्रिटिश कालखंडातील प्रसिद्ध हावडा ब्रीज नजरेसमोर येते. कोलकाता म्हटले की आठवत राहतात रवींद्रनाथ टागोर. रवींद्र संगीताने या भूमीतला नाद सर्वदूरपर्यंत पोहोचविला. दक्षिणेश्‍वर मंदिर, रामकृष्ण संग्रहमंदिर हा परिसरच एवढा मोठा आहे की मनात इच्छा असूनही वेळेअभावी रवींद्रनाथांच्या निवासी जाता आले नाही. अगदी काही क्षणांतच पाय लावून येण्याचा कृतघ्नपणा केला असता तर आयुष्यभराची खंत मनात राहिली असती. म्हणूनच विचार केला, रवींद्रनाथांसाठी, शांतिनिकेतनसाठी पुन्हा यायचेच! ते नैसर्गिक विश्‍व, गीतांजलीतील जीवनकण समरसतेने हृदयात जतन करायचे. इथल्या मातीतील हळवे, कोवळे तेवढेच संवेदनशील जीवनकण सोबतीला घेऊनच मार्गक्रमण करायचे आहे, तेव्हा त्यांना विसरून कसे चालेल?
संग्रहमंदिरात मातीपासून तयार केलेल्या प्रतिकृती, त्यात कालिघाटावरील कालिमंदिर, म्युझियम, कोलकाताच्या किल्ल्यातील मैदानावर उंच उडणार्‍या फुग्यांचे दर्शन, तिथे उभे असलेले रामकृष्ण, कालीमंदिर, ब्रह्ममंदिर, मस्जिद, गिरिजाघर, प्राचीन चित्रकला, मॉं शारदादेवीचा कक्ष, त्यांचे निवासस्थान, पूजागृह, स्वामिजींची लिहिण्या-वाचण्याची खोली वगैरे इतिहासाच्या आध्यात्मिक उंचीची प्रचिती देणार्‍या वस्तू या संग्रहमंदिराचे वैशिष्ट्य आहे. या संग्रहमंदिराच्या तळाला दक्षिणेश्‍वरमधील पंचवटीची प्रतिकृती दिसते. याच जागेवर श्रीरामकृष्ण अद्वैताची साधना करायचे. विवेक आणि वैराग्य, ज्ञान व भक्ती यांचा सुयोग संगम गंगातीरीच्या दक्षिणेश्‍वर मंदिरात अनुभवता येतो. सृजन आणि संहार, त्यातही दुष्टांचा संहार करण्यासाठी कालिमातेची शक्ती उदयास आली. शक्तिरूपिणी ही माता सृजनाची देवी! सुजलाम्, सुफलाम् अशा या भूमीत तत्त्वचिंतन, अध्यात्म, आत्मसाक्षात्कार, चिरंतनत्व, प्रेम, सेवा, त्याग, सम्यकता या मूल्यांची रूजवण झाली. कमळफुलांच्या माध्यमातून प्रेम-भक्तीची पखरणही येथे सातत्याने होते. इथे सत्य-शिव-मांगल्याचा मार्ग आहे. असंख्य साधकांचे असंख्य साधनाप्रवाह, त्यांतील असीमाची आनंदलीला इथे भेटते. इथे आल्यानंतर आपण सत्याच्या, मानवतेच्या, सेवेच्या मार्गाने पुढे जात आहोत अशी भावना होते आणि श्री रामकृष्णांच्या ‘शिवभावे जीवसेवा’ या उपदेशाशी आपण जोडले जातो.