विवेकानंद विचार परिषदेच्या निमित्ताने….

0
158

– अभिषेक बाबली कांदोळकर
(धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय,
मिरामार)

‘‘चला उठा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका’’, असा संदेश देणारे, युवकांना सदैव प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद. कित्येक वर्षे त्यांच्या विचारांनी एक
नवचेतना युवकांच्या मनात रुजवली. मनात जर ती ऊर्जा, चेतना प्रज्वलित असली तर वय कितीही असो आपल्यातील तारुण्य कधीही मरत नाही. आम्हा गोमंतकीय लोकांना स्वामीजींच्या विचारांची शिदोरी १२ जानेवारी २०२० रोजी सकाळी ठीक ९ :३० वाजता इन्स्टिट्यूट मिनेझेस ब्रागांझाच्या सभागृहात मिळणार आहे. देशातील नामवंत वक्ते या कार्यक्रमाला आम्हा सर्वांना संबोधित करणार आहेत.

१२ जानेवारी २०२० रोजी स्वामीजींची १५७ वी जयंती तसेच १९७० मध्ये बांधण्यात आलेल्या विवेकानंद शिलास्मारकाला आता पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. भारतभूमीच्या पुनरुत्थानाचे स्वामी विवेकानंदांचे कार्य, भारताच्या दक्षिण
टोकावरील श्रीपादशिलेवर ते बसलेले असताना त्यांना स्फुरले. या शिलेवर आता त्यांचे स्फूर्तिदायी स्मारक उभे राहिलेले आहे. वंदनीय एकनाथजी रानडे यांनी या कार्यासाठी भगीरथ प्रयत्न करून अवघा भारत एक केला. सप्टेंबर १९७० मध्ये या प्रेरक स्मारकाचा लोकार्पण सोहळा झाला.

स्वामी विवेकानंदांसाठी ही शिला स्फूर्तिदायी ठरली. त्याचप्रमाणे एकनाथजी रानडे यांनीही शिलास्मारकातून स्फूर्ति घेऊन विवेकानंद केंद्राची स्थापना केली. सहस्रावधी कार्यकर्ते या कार्यात नित्य सहभागी आहेत. विविध वर्ण, धर्म, प्रांत वा पंथ यांतील सांसद प्रतिनिधींनी हे स्मारक व्हावे म्हणून आवाहन केले. एक रुपया, दोन रुपये असे योगदान या कार्यासाठी देशातील लक्षावधी बांधवांनी केले. सर्व प्रांतांच्या शासनांनी एकमताने पक्षभेद विसरून प्रत्येकी एक लाखाचे योगदान या कार्यात केले. या स्मारकाची उभारणी देशातील विविध प्राचीन स्थापत्यशैलींचा विचार करून केली गेली.
भारतमातेच्या चरणांशी असलेल्या या शिलेमध्ये ‘पराशक्ती’चा वास होता. त्यामुळे स्वामी तिकडे आकर्षित झाले. १८९२ मध्ये त्यांच्या परिक्रमाकालात स्वामीजी परिव्राजक म्हणून फिरत कन्याकुमारीला आले. दोन वर्षांच्या परिक्रमाकालात या पवित्र मायभूमीची लेकरे दारिद्य्रात कशी खितपत पडली आहेत ते स्वामीजींनी पाहिले. अज्ञान आणि न्यूनगंड यांनी पछाडलेल्या आपल्या देशबांधवांना बघून त्यांना मनस्वी दुःख झाले. परकीय जुलुमाच्या वरवंट्याखाली भरडले गेलेले त्यांचे बांधव स्वतःचे मूळचे तेजस्वी स्वरूप विसरले होते. आक्रमकांमध्ये शेवटचे होते ते ब्रिटिश. त्यांच्या काळात भारतीयांची आत्मविस्मृती पराकोटीला गेली. या स्थितीत भारतीयांना विसर पडला होता की जगाला देण्यासारखे मौलिक काही त्यांच्यापाशी आहे आणि ते देणे हे त्यांचे परम कर्तव्य आहे. मातृभूमीचे पुनरुत्थान कसे होईल, अवनत स्थितीतून उठून भारतीय बांधव ताठ मानेने, आत्मविश्वासाने कसे उभे राहतील, त्यासाठी मी काय करायला हवे? हाच प्रश्न स्वामीजींना व्यथित करत होता.

श्रीपादशिलेवर बसून ध्यान- चिंतन करताना स्वामीजींना कळले, की भारताची अवनती धर्मामुळे नव्हे तर धर्माचे स्वरूप न कळल्याने झाली आहे. वैश्विक एकतेची वेदांतातील सत्ये, विविधतेचा (भिन्न मतांचा) आदर, देशात दूरवर पसरलेल्या बहुजन समाजाला करून द्यायला हवी आहे; त्याचबरोबर विश्वातल्या दूरस्थ देशातल्या लोकांनाही करून द्यायला हवी आहे.. ही जाणीव त्यांना जागतिक धर्म परिषदेला जाण्यासाठी आणि जगापुढे उदात्त स्वरूप मांडण्यासाठी प्रेरित करती झाली. जर वेदांताचा संदेश जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचला तर भारतीयांचा हिंदू धर्मावरील विश्वास दृढावेल, पुन्हा प्रस्थापित होईल. यासाठी जागतिक धर्मपरिषदेला जायला हवे. स्वामीजींना त्यांचे जीवितध्येय गवसले होते. केवळ स्वतःमधले ईश्वरत्व जागृत करणे नाही तर सपूर्ण भारतीय समाजातले ईश्वरत्व जागृत करणे! हे कशासाठी? केवळ भारताच्या कल्याणासाठी नव्हे तर जगताच्या कल्याणासाठी.

आजच्या पिढीला स्वामीजींचे विचार आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रचेतना पल्लवित करणे, देशहित जपणे हे आम्हा युवकांचे कर्तव्य. याच उद्देशाने देशातील नामवंत वक्ते येत्या रविवारी इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या विचारांनी सर्वांना प्रेरित करणार आहेत. डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. रघु दत्त, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे सर्व विविध विषयांवर व्याख्याने देणार आहेत. गोमंतकीय लोकांनी या व्याख्यानमालेला उपस्थित रहावे आणि लाभलेल्या विचारांनी इतरांना सदैव प्रेरित करून स्वामीजींचे ‘एक भारत विजयी भारत’ चे स्वप्न साकारावे.