विविध रोगांमधील पथ्यापथ्य भाग – १

0
235

– डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)

ताप हा आमजनित म्हणजेच अपचनातून उत्पन्न होणारा रोग आहे. मग आमपाचन व्हायला हलक्या आहाराची गरज असते. अशा अवस्थेत नेहमीचं जडान्न घेतल्यास आमउत्पत्ती जास्त होते व ताप लवकर उतरत नाही.

आयुर्वेद शास्त्र हे केवळ रोगाची चिकित्सा करण्यापुरतेच मर्यादित नसून आरोग्य टिकून रोग उद्भवूच नये, नेहमीच स्वस्थ रहावे इथपर्यंत विस्तारित आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये आहार-विहाराला, पथ्यापथ्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. रोग आटोक्यात रहावा, अधिक वाढू नये, चिकित्सेला सहाय्य व्हावे यासाठी आहार-विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. यालाच पथ्यापथ्याचे पालन करणे असे म्हणतात.
‘पथ्यं पथोऽनपेतं यत्’ अशी पथ्याची व्याख्या केली जाते. चिकित्सेच्या मार्गात अडथळा न आणणारे ते पथ्य. पथ्य म्हणजे रोगामध्ये हितकर तर अपथ्य म्हणजे रोगासाठी अहितकर असा आहार व विहार होय.
काही रुग्णांना पथ्य नको असते. त्यांच्या मते हवी तर औषधे जास्त द्या. पण पथ्य नको. आयुर्वेदिक औषधे घ्यायची म्हणजे पथ्ये भरपूर असतात असेही काहींचे मत आहे. अशा रुग्णांसाठी समजून घेण्याची गरज आहे ते म्हणजे मुळातच कुठल्याही रोगाची उत्पत्ती ही अपथ्यकर आहार-विहारानेच होते. जर आपला रोग उत्पन्न होण्यास हा अहितकर आहार-विहार कारणीभूत आहे तर मग या कारणाच्या मूळावर घाव नको का घालायला?

पूर्वी आजी ताप आल्यावर भाताची पेज जेवायला द्यायची. याचे कारण माहीत आहे का? तर ताप हा आमजनित म्हणजेच अपचनातून उत्पन्न होणारा रोग आहे. मग आमपाचन व्हायला हलक्या आहाराची गरज असते. अशा अवस्थेत नेहमीचं जडान्न घेतल्यास आमउत्पत्ती जास्त होते व ताप लवकर उतरत नाही. तापाच्या गोळ्या-औषधे घेतल्यावर तापलेले अंग थंड होते, पण ताप बरा होत नाही कारण मूळ कारण नष्ट होत नसते. म्हणूनच रोग लवकर बरा व्हायला व समूळ नष्ट व्हायला पथ्याची गरज असते.
पथ्यापथ्य सांगताना रोगहेतूंचा विचार करणे क्रमप्राप्तच आहे.

‘संक्षेपतः क्रियायोगो निदानपरिवर्जनं’ – या सूत्रानुसार निदानपरिवर्जनाने चिकित्सा घडते हे खरे पण ही संपूर्ण चिकित्सा नव्हे. या प्रकारच्या निदानपरिवर्जनाने रोगाच्या वाढीला आळा बसतो हे निश्‍चित. हेच पथ्य होय. जी संप्राप्ती घडली असेल त्याचा भंग करण्यासाठी म्हणजेच रोगाच्या समवायी वा असमवायि कारणांचा नाश करण्यासाठी या निदानपरिवर्जनाखेरीज म्हणजेच पथ्याखेरीज अन्य चिकित्सा करावीच लागते. पथ्यापथ्याने निमित्त कारण दूर होते. समवायि वा असमवायि कारण नव्हे.
रोगानुरूप पथ्यापथ्य हे बदलत असते. उदा. ज्वराच्या रुग्णास पूर्ण विश्रांती आवश्यक असते तर मधुमेही रुग्णात भरपूर चालण्याचा व व्यायामाचा सल्ला दिला जातो. ज्वरासारख्या आमप्रधान रोगात पूर्ण लंघन जरुरीचे असते तर याउलट धातुक्षयजन्य वातव्याधीत गुरू, बल्य असा आहार देणे क्रमप्राप्त ठरते. उदरासारख्या रोगात दुग्धपान पथ्यकर असते पण जलपान मात्र निषिद्ध ठरते.
पथ्यापथ्याचा विचार केल्याखेरीज औषधांचा यथायोग्य उपयोगच करता येणार नाही.

विविध रोग – पथ्यापथ्य …
१) स्त्री-रोग – सर्व प्रकारच्या स्त्रीरोगांमध्ये संतुलित आहार हा पथ्यकर आहे. हितकर पदार्थ – गहू, सालाची मुगाची डाळ, गाजर, कारले, पडवळ, पालक, मेथी, मोड आलेले कडधान्ये, शेवग्याच्या शेंगा, आळीव, डिंक, खारीक, बदाम, बाळंतशेप, बडीशेप, गाईचे तूप व दूध.
सर्व प्रकारच्या स्त्रीरोगांमध्ये शतावरी घालून दूध पिणे हे हितकर आहे. कारण शतावरी ही स्त्रीसखी आहे.
व्यायामामध्ये चालणे हा उत्तम व्यायाम आहे. त्याचबरोबर योगासनांमध्ये कंबरेसाठी विशेष योगासने – त्यामध्ये सर्वांगासन, पवनमुक्तासन, वज्रासन, पद्मासन यांसारखी योगासने हितकर आहेत.
प्राणायाम व ध्यान प्रत्येक स्त्रीरोगामध्ये हितकर तसेच कपालभाती सर्व वयोगटातील स्त्रियांसाठी गरजेचेच आहे.
अपथ्य – जास्त मीठ, तेल, आंबट पदार्थ, गरम मसाले, लोणची, नवा तांदूळ, उडीद, राजमा, आधुनिक व्यंजन, बटाटे, रताळी, बेसन, मैदा.

२) मूत्रविकार – वृक्करोग
पथ्य – गायीच्या दुधाचं तार (स्नेह विरहित), गाईचे दूध, उकळलेले पाणी, नारळाचे पाणी, जवाचे पाणी, अननसाचा रस, ऊसाचा रस, काकडी, पडवळ, कोथिंबीर, शोप, पपई, पेरू, भोपळा, कच्चे केळे, शेवग्याच्या शेंगा, गाजर, नागकेशर, पुनर्नवा, पेठा.
अपथ्य – वाटाणे, दही, चणा, राजमा, उडीद, बटाटे, फ्लॉवर, पालक, चवळी, टोमॅटो, वांगी, लाल मिरची, आंबट पदार्थ, मशरूम्स, चिकू, मीठ. जास्त व्यायाम त्याज्य आहे.

३) मूत्रकृच्छ विकार –
पथ्य – जीर्णशाली, मुद्गयूष, पडवळ, तांदूळजा, भुईकोहळा, खजूर, मनुका, नारळ, आवळा, गोड ताजे ताक, गाईचे दूध, तूप-दही, जांगलमांस, विविध प्रकारचे फळांचे रस व लिंबूपानक हे विशेष पथ्यकर आहे.
अपथ्यकर – विरुद्धाशन, विषमाशन, विदाही- अम्ल असे अन्न, तळलेले पदार्थ, मद्य, मत्स्य, लवण, तांबुल, हिंग व मोहरी यांसारखे तीक्ष्ण व अभिष्यंदी पदार्थ हे अपथ्यकर असतात.
अतिव्यवाय, अतिश्रम, जास्त प्रवास व मूत्रवेग विधारण हेही अपथ्यकर आहेत.

वृक्काश्मरी किंवा मूत्राश्मरी –
अश्मरी पडून गेल्यानंतरही त्याचा पुनरुद्भव होऊ नये म्हणून बरेच दिवस पथ्य सांभाळणे जरुरीचे असते, ज्यामध्ये क्षार अधिक प्रमाणात असतात असे पदार्थ टाळावेत. अळूची भाजी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारखे पदार्थ पूर्ण वर्ज्य करावेत. मूत्रप्रवृत्तीचे व मूत्राचेही प्रमाण अधिक राहावे याची काळजी घेतली पाहिजे. या दृष्टीने भरपूर पाणी पिणे, नारळाचे पाणी तत्सम द्रव पदार्थ अधिक प्रमाणात घेणे आवश्यक आहे.

पथ्य – कोंड्यासहित पोळी, मूग, कुळीथ, काकडी, मोसंबी, संत्रे, लिंबू, गाजर, कारले, दुधी भोपळा, नारळाचे पाणी, पाषाणभेदाची पाने, सुंठ, धणे, पुदीना, पुनर्नवा, अननसाचा रस, द्रव पदार्थ – जास्त प्रमाणात पाणी.
अपथ्यकर – फ्लॉवर, कोहळा, मशरुम, वांगी, पालक, पनीर, टोमॅटो, चवळीबिया असलेली फळे व भाज्या, चिकू, काजू, मटार, मांस, आंबट व तिखट पदार्थ, कांदे, काळी द्राक्षे.
३) हृदयरोग व उच्चरक्तदाब –
हृद्रोगामध्ये रोग्यास पूर्ण विश्रांतीची गरज असते. आहार हा द्रव, लघु व संतर्पण करणारा हवा. तांदळाची किंवा रव्याची खीर, द्राक्षे, डाळिंब इत्यादींचे फलरस, लिंबू, सरबत हे पथ्यकर आहेत. मूग, जांगलमास, पडवळ, कारले हेही हृद्रोगात पथ्यकर आहेत.

उच्चरक्तदाबामध्ये विशेष म्हणजे लवण वर्ज्य किंवा अगदी अल्प लवण असणारा आहार घ्यावा.
पथ्य – गव्हाचे पीठ, कमी प्रमाणात बाजरी व ज्वारी, मूग व मोड आलेले धान्य, पालेभाज्या- पालक, मेथी, चंदनबटवा, ओवा, काळे हरभरे, भोपळा, पडवळ, शेवगा, कारले, ढेमसे, कोहळा, आले, लिंबू, मनुका, तुळशीची पाने इत्यादी.

द्राक्ष, बदाम, मोसंबी, पपई, डाळिंब, संत्र अननस, सफरचंद, पेरू, सायीशिवाय दूध, ताक, अर्जुन साल, सिद्ध दूध, तेलामध्ये मोहरी, सोयाबीनचे तेल, गाईचे शुद्ध तूप, दूध, गूळ, मध, मुरब्बे इत्यादी.
अपथ्यकर – केक, पेस्ट्री, नूडल्स, पिझ्झा, बर्गर, मीठ, तळलेले पदार्थ, डबाबंद पदार्थ, लोणी, खवा, साय, मांस, मासे, डालडापासून बनवलेले पदार्थ, मैदा व बेसनाचे तळलेले पदार्थ, जड भोजन, फणस, काजू, अक्रोड, पिस्ता आदी सुका मेवा, दारू, लोणचे, सॉस, पापड, बिस्किटे, चिप्स, धूम्रपान, अतिश्रम, क्रोध, चिंता, शोक इत्यादी वर्ज्य करावेत.
विशेष म्हणजे अन्न व डाळींचा प्रयोग करा. एका वेळी स्निग्ध व जड जेवण करण्यापेक्षा हलके अन्न थोड्या थोड्या वेळाने खावे.
रोज हलका व्यायाम करा व फिरा. खाल्ल्यानंतर एकदम व्यायाम करू अथवा फिरू नका.
क्रमशः