विविध परंपरा, विधींनी समृद्ध गोव्यातली चवथ!

0
147

– राजेंद्र पां. केरकर चैत्र कालगणनेतील भाद्रपद हा कृषी संस्कृतीचा अधिष्ठात्रा देव म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणपतीच्या उत्सवाचा महीना असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थी ही गणपतीची विशेष आवडीची असली तरी त्या दिवसापासून दीड, पाच, सात, नऊ, अकरा तर काही ठिकाणी तब्बल हा उत्सव चक्क एकवीस दिवसही चालतो. गोव्याची भूमी भौगोलिक आकाराने अगदी छोटीशी असली तरी प्रांत बदलतो तशी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपराही इथे बदलत जाते. इतकेच कशाला? एका प्रांतातही या उत्सवाचे इतके वैविध्यपूर्ण स्वरूप असेल यावरती सुद्धा विश्‍वास बसणे कठीण याची प्रचितीदेखील आपणाला इथे आल्याशिवाय रहात नाही. काही कुटुंबात चवथीचा हा उत्सव जरी दीड दिवसाचा असला तरी त्याच्या पूर्वतयारीचे वेध श्रावण महिना सुरू झाला की लागतात. इतके दिवस गावाकडची अडगळीत पडल्यासारखी असलेली घरे चवथीची चाहुल लागताच अगदी नव्या आवेशात गजबजून उठतात. देशाच्या विविध भागांत नोकरी, उद्योग – धंद्यानिमित्त वर्षभर कार्यमग्न असलेली कुटुंबे किंवा चाकरमानी असो, चवथीला गावाकडच्या घरी येणे हा केवळ प्रघात म्हणूनच नव्हे तर मित्रमंडळी, नातेवाईक बर्‍याच काळानंतर भेटणार, त्यांच्याशी बातचित करणार म्हणूनदेखील गणपतीच्या नावाखाली येतात आणि उत्सवाच्या रंगगंधात समरस होतात. चवथीसंदर्भात काणकोण ते पेडणेपर्यंत प्रचलित असलेल्या नाना विधी, परंपरा यांच्याकडे लक्ष दिले तर त्यांच्यातले वैविध्य पाहून आपले नेत्र दीपून जातात. मन अक्षरश: अचंबित होऊन जाते. गणपती हा धरित्रीरूपी पार्वतीच्या मळापासून म्हणजे तिच्या मातीपासून जन्माला आलेला पुत्र असल्याकारणाने, भाद्रपदात पावसाचे थेंब प्राशून तृप्त झालेली धरित्री रानफुलांच्या रंगीबेरंगी पुष्पवैभवाने नटलेली असते आणि त्यामुळे भाद्रपदात निसर्गाच्या कणाकणात लपलेले लावण्य शोधून आणून त्याला गणपतीच्या माटोळीत पुजास्थानी अलंकृत करण्याची परंपरा निर्माण झालेली आहे. गोव्यात सगळ्यात कमी महसूली खेडी काणकोणात असली तरी या सह्याद्री आणि सागर यांच्या कुशीत वसलेल्या तालुक्यात जे वैविध्य आहे ते अन्यत्र अभावानेच अनुभवायला मिळते. नाना जाती, जमाती, धर्म आणि संस्कृतीच्या वैविध्यपूर्ण पैलुंचे इथे मनोज्ञ दर्शन घडते आणि त्यामुळे एका चवथीच्या इथे प्रचलित असलेल्या परंपरांचा अभ्यास केला तर त्यातली विविधता आपल्या मनाला थक्क करून टाकते. पाटणे, किंदळे, फणसुली येथील देसाई कुटुंबात घरोघरी साजरा होणारा चवथीचा उत्सव नाही. त्यांच्याकडे चवथ कोणत्या कारणासाठी घरोघरी साजरी केली जात नाही याबाबत शास्त्रीयरित्या कारणे नसली तरी बदलत्या काळात पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला तोडण्यासाठी सहसा कोणी तयार नाहीत. त्यामुळे आपल्या सग्या-सोयर्‍यांकडे चवथीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी देसाई कुटुंबिय जातात. काही देसाई मंडळी नगर्सेकरांकडे चवथीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी जातात. कधीकाळी या कुटुंबात उद्भवलेली दुर्घटना ही उत्सवाची परंपरा खंडित होण्यासाठी कारणीभूत आहे की अन्य वेगळी कारणे आहेत हे सांगणे निश्‍चितपणे शक्य नाही. गावडोंगरीतील तुडल येथे फळदेसाई कुटुंबांचे वास्तव्य आहे. गोव्यात गणपती विसर्जनाची ठराविक दिवसांची परंपरा सर्वत्र काटेकोरपणे पाळत असली तरी फक्त इथे मात्र शेकडो वर्षांपासून रूढ असलेल्या कारणांमुळे श्रींचे विसर्जन तिसर्‍या दिवशी केले जाते. दुसर्‍या दिवशी या कुटुंबातील लहानपणापासून थोरापर्यंत पुरुष मंडळी गावातल्या नदी किनारी जातात आणि तेथे मातीच्या भांड्यात आणि दगडाच्या चुलीवरती अन्न शिजवतात. ते अन्न भांड्यांसकट तेथेच ठेवून मागे न पाहता मौनव्रत धारण करून घरी परतात. त्यानंतर तिसर्‍या दिवशी मूर्तीचे विसर्जन करतात. गावातील फळदेसाई कुटुंबातले वयोवृद्ध हा विधी पवित्र आत्म्यांच्या शांतीसाठी केला जातो असे जरी सांगत असले तरी त्याला शोकांतिकेची गडद अशी किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैंगीणीतल्या महालवाड्यावरती प्रभुगावकरांच्या तेरा कुटुंबियांत २१ वेगवेगळ्या प्रकारची पत्री एकत्रित करून ती मोठ्या पानात व्यवस्थितरित्या बांधून त्याची प्रतिकात्मक गणपती म्हणून पूजा करतात. वाड्यावरती अन्य जातीजमातीत मृण्मयी गणेशमूर्ती पुजण्याची परंपरा असली तरी महालवाड्यावरच्या प्रभूगावकरांकडे मात्र पत्रीचाच गणपती पुजला जातो. तुळस, चाफा, वड, पिंपळ, मोगरा, केतकी, शमी अशा विविध वनस्पतींची पाने एकत्रित करून ती अर्जुन वृक्षाच्या पानात व्यवस्थित दोरीने बांधतात तर गणपतीची माता पार्वतीची पुजादेखील पत्री कासाळ्याच्या माडीच्या पानात बांधून करतात. पत्रीसाठी वापरल्या जाणार्‍या झाडांची प्रामुख्याने वनौषधी म्हणून उपयोग करण्याची परंपरा असल्याने अशा पत्री रूपातील श्रींच्या विसर्जनामुळे विहीरीच्या पाण्यात प्रदूषण होण्याऐवजी त्याला गुणकारी तत्त्वांची प्राप्ती होते. काही वर्षांपूर्वी चवथीला पत्री गणपतीचे पूजन सामूहिकरितीने महालवाड्यावरच्या नृसिंह – परशुरामाच्या मंदिरात केले जायचे. सध्या पत्री गणपतीची ही परंपरा प्रभुगावकरांच्या तेरा कुटुंबात पहायला मिळते. काणकोणातील गावडोंगरी, खोतीगाव ही जंगल निवासी आणि शिवोपासक आदिवासी वेळीप जमातीची भूमी. त्यामुळे चवथीची परंपरा त्यांच्याकडे आहे तशीच शिवपुत्र कार्तिकेयाला वारुळाच्या मातीच्या गोळ्याला पुष्पमंडित करून पुजण्याची परंपरा धिल्ल्याच्या कुमारिकांच्या उत्सवात पहायला मिळते. चवथीला गणपती घरोघरी पुजण्याऐवजी ते बुदवंताच्या किंवा कुटुंबाच्या मुळ घरी पुजला जातो. सामूहिकरितीने साजरा केल्या जाणार्‍या या उत्सवाच्या प्रसंगी रानातील नाना विविध वनस्पतींची पौष्टिक भाजी आणि गोडधोडाची चव न्यारीच असते. पूर्वी केवळ भाजीपालाच नव्हे तर गणपतीच्या डोक्यावरच्या माटोळीला सजविण्यासाठी जी फळे, फुले आणि पाने वापरली जायची ती भाद्रपदाच्या आणि श्रावणातल्या पर्जन्य वृष्टीमुळे त्यांच्या परिसरातल्या जंगलात अथवा रानोमाळ आढळायची. आज नानाविविध रोगांच्या उपचारासाठी ऍलोपथी, होमियोपथी औषध आणि उपचार प्रणालीचा प्रामुख्याने उपयोग केला जात असला तरी पूर्वी मानवी जीवन निरोगी आणि आनंददायी करण्यात वनौषधींचे महत्त्वाचे योगदान असायचे. आज ही परंपरा वेळीप जमातीत अनुभवायला मिळते. डोंगरमाथ्यावर किंवा डोंगर उतारावरती निसर्ग आणि पर्यावरणाशी स्नेहबंध राखून जीवन जगणार्‍या वेळीपांच्या लोकधर्मात येणारा गणपती साध्या, सुंदर रूपात यायचा. काणकोणात फणसखिंडी येथे शेकडो वर्षांच्या इतिहासाचा वारसा मिरवणारी तळपण नदीच्या किनारी प्रभुदेसाई कुटुंबियांची वास्तु आहे. ही वास्तु चवथीच्या कालखंडात तीनशेच्या आसपास मंडळीच्या एकत्र येण्याने गजबजून उठते. प्रभुदेसाई कुटुंबियांचे हे वडिलोपार्जित घर म्हणजे कित्येक पिढ्यांच्या इतिहास आणि संस्कृतीला जतन करून ऊभी असलेली ऐतिहासिक वास्तु आहे. चवथीच्या कालखंडात गणपतीची पुजा होत असली तरी उत्सवाची परंपरा मात्र जातीजमातीप्रमाणे भौगोलिक परिस्थितीनुसारही बदलत गेलेली पहायला मिळते. एका बाजूला सह्याद्रीची आकाशाला भिडू पहाणारी इथली पर्वत शिखरे आणि दुसर्‍या बाजूला बारामाही या भूमीचे चरणकमल धुण्यासाठी उत्सुक असलेल्या अरबी सागराचे पाणी यामुळे चवथीच्या उत्सवातील वैविध्याची इथे आपणाला मोहिनी पडल्याशिवाय रहात नाही. बार्देशातल्या नादोडा गावात चारही बाजूनी कोलवाळ नदीच्या पाण्याने वेढलेले राण्याचे जुवे आहे. इथे राणे – सरदेसाई कुटुंबियांचे ऐतिहासिक घर आहे. पोर्तुगिजांविरुद्ध बर्‍याचदा संघर्ष केलेल्या राणे कुटुंबियांचे हे वडिलोपार्जित घर डिचोली, वडावल, म्हापसा आदी ठिकाणी स्थायिक झालेल्यांनी गजबजते. बार्देशात म्हणजे जुन्या काबिजादीत असलेले जुवे राणे कुटुंबियांसाठी केवळ आश्रयस्थान नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी आधार ठरले होते. त्यामुळे नोकरी, उद्योगधंदे यानिमित्त विखुरलेली कुटुंबे चवथीला हमखास जुव्यावरती परततात आणि चवथीच्या उत्सवात सामूहिकरित्या सहभागी होतात. पेडणे – इब्रामपूर येथील गावस, कुडणे (डिचोली) येथील मळीक कुटुंबिय, पिळगाव (डिचोली) येथील परब गावकर कुटुंबिय चवथीला आपल्या जुन्या घराकडे वळतात आणि हेवेदावे, रागरुसवे बाजूला ठेवून चवथीच्या जसे पूर्वतयारीला लागतात तसेच परंपरेनुसार कार्यान्वित असलेल्या रितीरिवाजांचे पालन करतात. माटोळीला फळफळावळ, पानेफुले कोणी बांधावी, माटोळीस खास असा लक्षवेधक नारळ कुठे बांधावा, केवणीच्या दोर्‍याऐवजी कुंभ्याचे दोर का बांधू नये? हे सारे ठरलेले असते. कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही चौकट कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करीत नाही. आज पेडणे – आरोबा येथे असलेली मुस्लिम कुटुंबिय पूर्वी इब्रामपूर येथे रहात होती. धर्माने वेगळी असलेली ही कुटुंबे चवथीला पूर्वी इब्रामपूरला यायची आणि गावातील घरात खास पारंपरिक वाद्यांच्या वादनातून नौबत सादर करायचे. धार्मिक एकोप्याची ही परंपरा आज इतिहासात गडप झालेली आहे. गोव्यात एकेकाळी गोसावी गायनाची समृद्ध परंपरा होती. भगवद्भक्तीचा प्रचार करणार्‍या संतांच्या जीवन कार्याची कथा अगदी सहज आणि सोप्या भाषेत कासाळे, एकतारी, डमरू आदी वाद्यांवरती सादर करायचे. आज ही लोकगीत गायनाची परंपरा लोप पावलेली असली तरी पर्येहून परिसरातल्या काही गावात चवथीनिमित्त गोसावी मंडळी पारंपरिक वेशभूषेत डोक्याला पगडी बांधून आणि हाती त्रिशूळ घेऊन, शंख ध्वनी करत ‘पाव रे सिद्धा’ असे म्हणून प्रत्येक घरी येतात. त्यांच्या हातातला शंख, मुखात घालून पवित्र ध्वनी निर्माण झाला की घरातली सौभाग्यवती त्यांची तळी सुपुर्द करायची. गावोगावी आजही चवथीच्या काळात एकमेकांच्या घरी भजन, फुगडी सादरीकरणासाठी जातात आणि त्यामुळे गावपणातल्या अनोख्या अनुबंधांना पुन्हा उजाळा लाभतो. एका छोट्या प्रदेशात चवथीच्या सणाचे प्रचलित असलेले वैविध्य सर्वसामान्य आणि श्रद्धावंतांनाच नव्हे तर सर्वांनाच कवेत घेऊन वेगळ्या विश्‍वात घेऊन जाते. ………….