विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

0
117

महाराष्ट्राने विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून प्रकल्पस्थळी मोठ्या प्रमाणात मशिनरी व ट्रक आणलेले आहेत. सध्या धरण परिसरात जाणारा रस्ताही दुरुस्त करून कामाला चालना दिली जात असून यामुळे गोव्यावर पुन्हा नवे संकट कोसळण्याची भीती आहे.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने विर्डी धरणाच्या उभारणीसाठी निधीची तरतूद केली होती व जोड कालवे उभारण्यासाठी निधीचा वापर करण्याचे स्पष्ट केले होते. आता पावसाला दोन महिने असताना महाराष्ट्राने २०१५ साली बंद केलेले धरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. धरण परिसराला भेट दिली असता व्ही. आय. शेट्टी आणि कंपनीच्या कंत्राटदाराने धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आल्याचे सांगितले.

गोव्याच्या पथकाकडून पाहणी
विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली असल्याची माहिती मिळताच जलसंसाधन खात्याचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या सूचनेवरून काल अभियंते आर. वाय. बांदेकर, अभियंता मारियो, अभियंता मॅनियल यांनी विर्डी धरण परिसराला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला व अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले.

धरण परिसरात सध्या तरी काम चालू नाही. मात्र धरणाकडील रस्त्याचे काम चालू असून काम सुरू करण्यासाठीच ही तयारी असावी अशी शक्यता बांदेकर यांनी व्यक्त केली. म्हादई जललवादासमोर म्हादईप्रश्‍नी सुनावणी पूर्ण होऊन निकाल अपेक्षित असताना महाराष्ट्राने २०१५ सालापासून बंद ठेवलेले काम सुरू करण्याच्या हालचाली केल्या आहेत. महाराष्ट्राने काम सुरू केले तर ते पूर्णपणे बेकायदेशीर ठरणार असल्याचे अधिकारी संदीप नाडकर्णी यांनी सांगितले.