विरोधी युतीसाठी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा : मोन्सेर्रात

0
102

>> युगोडेपा-कॉंग्रेस चर्चा असल्याची माहिती

सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन त्यांच्याबरोबर निवडणूकपूर्व आघाडी करावी. ती करताना कॉंग्रेस पक्षाने मोठ्या सहकार्‍याची भूमिका बजावावी, असे आपणाला वाटते असे युगोडेपाचे नेते व असंलग्न आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपला पक्ष कॉंग्रेसबरोबर युती करणार असल्याचे सांगून कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड व अन्य समविचारी विरोधी पक्षांबरोबर युती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. विरोधकांच्या मतांची विभागणी न होण्यासाठी ते आवश्यक असल्याचे मोन्सेर्रात म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाने समविचारी विरोधी पक्षांबरोबर आघाडी करावी अशी गोव्यातील जनतेची इच्छा असल्याचेही मोन्सेर्रात म्हणाले. लोकांची ही इच्छा कॉंग्रेस पक्षाने समजून घेण्याची गरज आहे.
सध्या कित्येक पक्ष सत्ताधारी भाजप विरोधात उभे ठाकण्याच्या तयारीत आहेत. त्यात काही समविचारी पक्षांचाही समावेश असून अशा पक्षांबरोबर युती करणे कॉंग्रेसला सहज शक्य आहे असे मत त्यांनी मांडले.
कॉंग्रेसबरोबर चर्चा आपल्या पक्षाची कॉंग्रेसबरोबर युतीसाठी बोलणी चालू आहेत. निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतरच आपण आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार असून किती जागा लढवणार तेही तेव्हाच जाहीर करणार असल्याचे मोन्सेरात म्हणाले.