विरोधी नेत्यांना जम्मू – काश्मीरात जाऊ देण्याची कॉंग्रेसची मागणी

0
105

जम्मू – काश्मीरमध्ये ३७० कलम रद्दच्या घटनेनंतर तेथील विद्यमान स्थितीवर सर्व विरोधी पक्षांशी सुसंवाद साधण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. ज्यामुळे जम्मू – काश्मीरमधील सध्याची वस्तुस्थिती कशी आहे हे सर्वांना कळेल. तसेच तेथील अटक केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांसह सर्व राजकीय नेत्यांची सुटका करावी, अशी मागणी काल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केली. जम्मू – काश्मीरमधील सध्याच्या स्थितीमुळे कोणालाही चिंता वाटणे साहजिक आहे. तेथे प्रशासकीय पातळीवरून सर्वच बाबतीत सार्वजनिक जीवनाला अडथळे निर्माण झाले आहेत. तेथील जनतेला दैनंदिन घटनांची माहिती किंवा निकटवर्तीयांशी संपर्काची कोणतीही सोय नाही. त्यामुळे अनेक प्रश्‍न विचारले जात आहेत.

काश्मीरात मोकळेपणे फिरण्याची
परवानगी द्या, विमान नको ः राहुल

जम्मू – काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या कडव्या शाब्दीक हल्ल्याला काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मिडियावरून प्रत्त्युत्तर दिले. राहुल यांनी दिलेले उत्तर असे आहे, ‘प्रिय राज्यपाल मलिक विरोधी नेत्यांचे एक शिष्टमंडळ आणि मी जम्मू – काश्मीर व लडाख भेटीचे तुमचे निमंत्रण आदरपूर्वक स्वीकारतो. मात्र विरोधी नेत्यांना विमानाची गरज नाही, तर जम्मू – काश्मीरात मोकळेपणाने फिरून तेथील वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी परवानगीची गरज आहे.