विरोधकांना कधीच देशद्रोही मानले नाही

0
154

>> अडवाणींचा नरेंद्र मोदी व अमित शहांना टोला

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर मौन सोडले असून भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, असे स्पष्ट मत आपल्या ब्लॉगमधून मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना जोरदार टोला लगावला आहे. देशातील लोकशाही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिला आहे, असे भाष्य भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी केले आहे. त्यांनी भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ब्लॉग लिहिला आहे. त्यात त्यांनी हे भाष्य केले आहे.

अडवाणी या ब्लॉगमध्ये लिहितात, माझ्या जीवनाचे एकच तत्त्व आहे ते म्हणजे ‘देश प्रथम, मग पक्ष आणि नंतर मी.’ प्रत्येक परिस्थितीमध्ये मी या तत्त्वांचे पालन केले आहे आणि पुढेही करत राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे. मी माझ्या जीवनाचे ध्येय ठरविले आहे. यात नेहमी देश प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः आपण, असेच राहिले आहे. आज याच सिद्धांतावर आजपर्यंत वाटचाल केली आहे आणि यापुढेही हाच नियम कायम राहील. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानत नाही. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिला आहे, असे अडवाणी यांनी ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

भाजपचा संस्थापक सदस्याच्या रूपामध्ये मी देशातील लोकांसोबत माझा अनुभव मांडणे माझे कर्तव्य समजतो. विशेषत: भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांसोबत. दोन्हीकडून मला स्नेह आणि सन्मान मिळाला आहे. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अडवाणी यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, त्यांनी गांधीनगरमधील लोकांचे आभार मानले आहे. १९९२ नंतर येथील मतदारांनी मला सहावेळी निवडून दिले. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

निवडणुका या लोकशाहीचा उत्सव आहेत. त्या योग्य पद्धतीने आणि निष्पक्षपातीपणाने झाल्या पाहिजेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो असेही मत त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये मांडले आहे.