विरोधकांच्या मतदारसंघांतील १८ कोटींची कामे मार्गी लागणार

0
109

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची काल बैठक घेऊन कॉंग्रेस आमदारांच्या मतदारसंघांत १८ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना संबधितांना केली. आमदारांचे विकास प्रकल्पाच्या प्रस्तावाचे आराखडे तयार करून २५ मे २०१८ पर्यंत सादर करण्याचा आदेश बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री ढवळीकर यांनी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या विनंतीवरून कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांबाबत चर्चेसाठी पर्वरी येथील विधानसभा संकुलाच्या आवारात सोमवारी बैठक घेतली.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता व संबंधित विभागातील अभियंत्यांची उपस्थिती होती. तसेच लेखा खात्यातील अधिकार्‍यांची उपस्थिती होती. रस्ता, पाणीपुरवठा, इमारत या विभागातील विकास कामांबाबत चर्चा झाली. आमदारांच्या शिफारशीनुसार मतदारसंघात १५ कोटी रुपयांची नियोजित आणि ३ कोटी रुपयांची प्रस्तावित कामे मंजूर केली जाणार आहेत.
विरोधी पक्षनेते कवळेकर, आमदार प्रतापसिंह राणे, लुईझीन फालेरो, दिगंबर कामत, रवी नाईक, दयानंद सोपटे, क्लाफासियो डायस, फिलीप नेरी रॉड्रिग्स, विल्फेड डिसा, नीळकंठ हर्ळणकर, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस यांनी मतदारसंघातील विकासकामांची माहिती बैठकीत सादर केली.
या बैठकीत पाणीपुरवठा, जायका, मलनिस्सारण, रस्ता कामांवर चर्चा करण्यात आली. खास बैठक आयोजित करून विकास कामांबाबत चर्चा केल्याबद्दल मंत्री ढवळीकर यांचे कवळेकर यांनी आभार मानले आहेत.