विरोधकांची चाचपणी

0
107

ईशान्य भारतातील तीन राज्ये सर केलेल्या आणि दिवसेंदिवस देश पादाक्रांत करीत निघालेल्या भारतीय जनता पक्षाचा वारू रोखायचा कसा या चिंतेने सध्या विरोधी पक्षांना घेरलेले दिसते. गुजरातमधील सुधारलेली कामगिरी, राजस्थान, मध्य प्रदेश पोटनिवडणुकांतील चमकदार विजय यामुळे कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे चित्र निर्माण होत होते, परंतु ईशान्येतील तीन राज्यांपैकी मेघालय वगळता त्रिपुरा व नागालँडमध्ये पक्षाचे झालेले पानीपत आणि मेघालयमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनूनही सरकार बनवण्यात आलेले घोर अपयश यामुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वक्षमतेबाबत पुन्हा एकवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्रिशंकू स्थितीचे अनुमान करून कॉंग्रेसने खरे तर मेघालयमध्ये आधीच इतर पक्षांशी बोलणी, वाटाघाटी सुरू करायला हव्या होत्या, परंतु गोव्यापासून त्यांनी काही धडा घेतलेला दिसला नाही. परिणामी हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. ज्यांनी या परिस्थितीत पक्षाचे गळणारे अवसान सावरायचे ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी स्वतः आपल्या आजीला भेटायला निघून गेले होते. आता म्हणे ते दर महिन्याला एकेका विदेशात जाऊन विदेशस्थ भारतीयांच्या भेटी घेणार आहेत. देशात कर्नाटकसारख्या राज्याची महत्त्वाची निवडणूक तोंडावर असताना परदेशस्थ भारतीयांना भेटी देण्याचा हा प्रकार अजबच म्हणायला हवा. या परिस्थितीत बिगर भाजपा – बिगर कॉंग्रेस तिसर्‍या आघाडीचा विषय पुढे आला तर नवल नाही. खरे तर भाजप विरोधकांची आघाडी बांधण्याचे काम कॉंग्रेसने हाती घ्यायला हवे होते आणि त्याचे नेतृत्व करायला हवे होते, परंतु त्या दिशेने कोणतेही प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू असलेले दिसत नाहीत. परिणामी आता बिगर भाजप – बिगर कॉंग्रेस आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी अनेकांचे हात शिवशिवताना दिसतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी मध्यंतरी जोरदार प्रयत्न करून पाहिला, परंतु पवारांच्या नेतृत्वाला इतर पक्षांकडून मान्यता मिळालेली दिसली नाही, परिणामी त्यांचा उत्साह आटत चालला आहे. या पार्श्वभूमीवर थेट दक्षिणेतून तिसर्‍या आघाडीचा आवाज बुलंद करणारा एक स्वर सध्या निनादतो आहे तो आहे के चंद्रशेखर राव यांचा. तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव स्वतः तिसर्‍या आघाडीचे नेते बनायला पुढे सरसावले आहेत. खरे तर हा आश्चर्याचा धक्का आहे, कारण आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राव यांचे संबंध गहिर्‍या मैत्रीचे असल्याचे मानले जात होते. मग एकाएकी राव यांना ही हुक्की का यावी? त्यांच्या राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याच्या महत्त्वाकांक्षा जागृत झाल्या आहेत की ही भाजपाचीच खेळी आहे याबाबत खुद्द विरोधकांमध्ये संभ्रम दिसतो. राव यांचा तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व करण्यासाठीचा पुढाकार ही काहींना भाजपाचीच विरोधकांमध्ये पाचर मारण्याची खेळी वाटते आहे. त्यामुळे सध्या राव यांना छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या छत्तीसगढ जनता कॉंग्रेसचे नेते असलेले अजित जोगी आणि तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी वगळता फारशा कोणी पाठिंबा दिलेला दिसत नाही. भाजप विरोधकांची तोंडे सध्या दहा दिशांना दिसतात, त्यामुळे ही तथाकथित तिसरी आघाडी कशी बनणार हाच मुळात मोठा प्रश्न आहे. ज्या कोणाला अशी तिसरी आघाडी बनवायची असेल त्याला ठिकठिकाणी परस्परांच्या प्रतिस्पर्ध्यांना एकत्र आणावे लागणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये नुकतेच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले. गोरखपूर आणि फूलपूर पोटनिवडणुकीमुळे हे परस्परांचे विरोधक सध्या एकत्र आलेले आहेत, परंतु अशा प्रकारच्या तडजोडी राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटल्यावर कितपत टिकणार याबाबत मोठी साशंकता आहे. विरोधकांनी एकत्र येण्याच्या कितीही वल्गना केल्या तरी आजवर ते घडले नाही, याचे मुख्य कारण आहे अशा आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे याबाबतची मतमतांतरे. एकत्र यायचे म्हणजे थोडा फार त्याग करणे आले, जो करण्याची कोणत्याही राजकीय पक्षाची तयारी दिसत नाही. शिवाय विरोधकांपैकी अनेक पक्षांना कॉंग्रेसचे नेतृत्व मान्य नाही. एकीकडे भाजपाच्या स्वबळावरील सुसाट घोडदौडीमुळे धास्तावलेले शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल यासारखे मित्रपक्षही स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जपणूक करण्यासाठी चाचपडू लागलेले आहेत आणि दुसरीकडे विरोधक मात्र आपले अस्तित्व संपुष्टात येण्याची स्थिती स्वच्छ दिसत असूनही एकत्र यायला मागेपुढे होत आहेत. या परिस्थितीचा फायदा भाजपासारख्या दूरदृष्टीच्या पक्षाने अचूक उठवला नाही तरच नवल ठरेल. २०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे आणि सत्ताधारी भाजपाची एकूण रणनीती आणि वाटचाल पाहिली तर देश कॉंग्रेसमुक्तच नव्हे, तर विरोधक मुक्त तर होणार नाही ना अशी दाट भीती निर्माण होत चालली आहे असेच म्हणायला हवे.