विरोधकांची एकजूट

0
157

महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि गोव्यातील विरोधकांच्या सत्ताकांक्षेला नवे अंकुर फुटू लागल्याचे दिसू लागले आहे. विशेषतः कॉंग्रेसपेक्षाही गोवा फॉरवर्ड यात आघाडीवर आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तेमधून अलगद हकालपट्टी केल्यापासून दुखावलेले विजय सरदेसाई राजकीय सूड उगवण्याच्या संधीच्या शोधात आहेत. गोवा फॉरवर्डचे तिन्ही आमदार विजय सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला जातीने उपस्थित राहिले, एवढेच नव्हे, तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यामध्येही विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्यासंदर्भात त्यांनी काल खलबते केली. महाराष्ट्रात मिळालेल्या यशाने सध्या जोशात असलेल्या संजय राऊतांनी त्वरित मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याशीही संपर्क साधला आणि महाराष्ट्रानंतर गोव्यामध्ये सर्व विरोधकांची आघाडी बनवण्याचे सूतोवाच केले आहे. या आघाडीद्वारे गोव्यामध्ये ‘राजकीय भूकंप’ घडवू अशी राणा भीमदेवी गर्जना जरी संजय राऊत यांनी काल केलेली असली, तरी शिवसेनेची गोव्यातील संघटनात्मक व राजकीय दुःस्थिती आणि सध्याची गोव्यातील विरोधी पक्षांची गलितगात्र स्थिती पाहता या तथाकथित बंडाला ते धुगधुगी कशाची देणार आहेत हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. आज गोव्यामध्ये शिवसेनेचे काडीमात्र राजकीय अस्तित्व नाही. गेली किमान तीस वर्षे शिवसेना गोव्यामध्ये रुजवण्याचा जोरदार प्रयत्न चालला, परंतु तरीही ती येथे रुजू शकलेली नाही. याउलट भारतीय जनता पक्ष रुजला, फोफावला आणि त्याने मगोसारख्या समविचारी पक्षालाही संपवले. गोवा फॉरवर्ड हा खरे तर कॉंग्रेसी सेक्युलर विचारांतून निर्माण झालेला पक्ष. मग शिवसेनेसारख्या संघटनेशी त्यांचे नाते कसे? त्यावर गोवा फॉरवर्डचे उत्तर असे की, जशी शिवसेना महाराष्ट्रात तेथील मराठी अस्मितेची पुरस्कर्ती आहे, तसे आम्ही ‘गोंय, गोंयकार, गोंयकारपणा’चे पुरस्कर्ते आहोत. प्रादेशिक पक्षाच्या या नात्याने शिवसेनेशी सख्य जोडण्याचा गोवा फॉरवर्डचा प्रयत्न आहे आणि तो काल दिसून आला. गोव्यामध्ये सध्या विरोधकांची स्थिती अतिशय दुबळी आहे. कॉंग्रेसपाशी केवळ पाच आमदार उरले आहेत. गोवा फॉरवर्डचे तीन, आजवर गोवा फॉरवर्डची साथ देत आलेले रोहन खंवटे व मगोपाशी उरलेले एकमेव आमदार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चर्चिल आलेमांव, व अपक्ष प्रसाद गावकर यांची साथ मिळाली तरी ही संख्या १२ होते. भाजपपाशी स्वतःचे २७ आणि मंत्रिपदावर असलेले अपक्ष गोविंद गावडे मिळून २८ आमदार आहेत. सरकारविरोधात बारा आमदारांची एकजूट राऊत आणि सरदेसाई बांधू शकले असे मानले तरी गोव्यातील कॉंग्रेस आणि मगोवर भाजपने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजपची राजकीय ताकद येथे प्रचंड वाढलेली आहे. राज्यामध्ये म्हादई प्रश्न, खाण प्रश्न असे प्रश्न सरकारपुढे सध्या आहेत. राज्यातील मतदारसंघांच्या विकासाच्या प्रश्नावरून अनेक सत्ताधारी आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन गोव्यामध्ये राजकीय भूकंप घडविण्याचे स्वप्न विजय सरदेसाई पाहात आहेत असे दिसते आणि त्यासाठी त्यांनी संजय राऊतांचा आधार घेतलेला आहे. पण राऊतांना गोव्यामध्ये जो राजकीय भूकंप अपेक्षित आहे, तो घडवायचा झाला तर त्यासाठी केवळ विरोधकांची ही एकजूट पुरेशी नसेल, तर त्यांना सत्ताधारी भाजपमध्ये सुरूंग पेरावे लागतील. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर त्यांच्या मालमत्तांवरून सरदेसाई यांनी सातत्याने चालवलेले वैयक्तिक शरसंधान डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाप्रती त्यांच्या सहकार्‍यांमध्ये अप्रियता व असंतोष निर्माण करण्याच्या इराद्याने चाललेले आहे. संजय राऊतांची त्यांनी आवर्जून घेतलेली भेट आणि महाराष्ट्र प्रयोगाचा अवलंब गोव्यामध्ये करण्याची त्यांना घातलेली गळ हा या प्रयत्नांचा पुढचा अध्याय आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भक्कम पाठिंब्यानिशी सुरळीतपणे चाललेल्या सरकारखाली फुटीचे जे सुरुंग हे विरोधक पेरू पाहात आहेत, त्यांना सत्ताधारी भाजपमध्ये शिरकाव केलेले असंतुष्ट आत्मे खरोखर साथ देणार आहेत का? देण्याच्या परिस्थितीत आहेत का? सध्या तरी याचे उत्तर नकारार्थीच मिळते, परंतु एकंदरीत देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा टक्का घसरणीला लागल्याचे जे संकेत मिळत आहेत, ते लक्षात घेता कालच आम्ही म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील सध्याच्या अभिनव प्रयोगाला अनुसरून असे विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न देशभरात घडू शकतात आणि त्याची सुरूवात गोव्यातून होईल एवढाच राऊत यांच्या कालच्या इशार्‍याचा अर्थ आहे. विरोधकांच्या या आघाडीचे गोव्यात राजकीय परिणाम काय होतील, किती होतील हे अलाहिदा, परंतु मतभेद विसरून सर्व विरोधक एकत्र येण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झालेली आहे आणि भाजपच्या एकाधिकारशाहीला त्यातून आव्हान निर्माण झालेले आहे एवढाच या सार्‍याचा अर्थ आहे!