विरोधकांचा दुसर्‍या दिवशीही गोंधळ

0
149

>> विधानसभेत खंवटेप्रकरणाचे पडसाद, कामकाज तहकूब

पर्वरीचे आमदार रोहन खंवटे याना अटक करण्यास सभापती राजेश पाटणेकर यांनी कसलीही चौकशी न करताच परवानगी दिल्याच्या प्रश्‍नावरून काल शुक्रवारी विरोधकांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला गोंधळ घातला. त्यामुळे सभापती पाटणेकर यांनी काल दुपारी १२.३० वाजेपर्यंत विधानसभेचे कामकाज तहकूब केले. त्यामुळे प्रश्‍नोत्तराच्या तासाला कोणतेही कामकाज झाले नाही.

काल सकाळी ११.३० वा. सभापती पाटणेकर यांनी सभागृहाचे कामकाजद सुरू करण्याचा प्रयत्न केला असता विरोधी आमदारांनी खंवटे प्रकरणावरून गोंधळ घातला व सभापतींनी प्रथम हा प्रश्‍न मिटवावा अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व विजय सरदेसाई यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली.
यावेळी बाजू मांडताना खंवटे यांनी आपणावर मारहाणीची जी तक्रार झाली त्या दिवसाची विधानसभा प्रांगणातील सीसीटीव्ही फूटेज सभापतींनी मिळवावी व ती आपणाला द्यावी. ती फूटेज मिळाल्यानंतर खरे काय व खोटे काय ते स्पष्ट होणार असल्याचे ते म्हणाले. मध्यरात्री १ या दरम्यान आपल्याला अटक केल्याचे सांगून खंवटे यांनी, यापुढे सूड उगवण्यासाठी सरकार अन्य आमदार, तसेच जि. पं. सदस्य यांनाही अटक करू शकते अशी भीती व्यक्त केली. गंभीर गुन्हे असणारे तसेच खून पाडणारे आरोपी मात्र मोकळे फिरत असल्याचा आरोपही यावेळी खंवटे यांनी केला. यावेळी सभापती मागणी मान्य करत नसल्याचे पाहून विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणा दिल्या. त्यानंतर सभापतींनी १२.३० पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

अभिनंदनाचा ठराव
नंतर फर्नांडिस यांनी, आमदार प्रवीण झांट्ये यांनी, संजय शेट्ये निर्मित व अक्षय बांदेकर दिग्दर्शित स्थलपुराण या चित्रपटाची बर्लिन येथील प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याबद्दल आणलेलेला अभिनंदनाचा ठराव चर्चेला घेतला.

तद्नंतर अपक्ष आमदार गावकर यांनी सांगेतील नुने, नेत्रावळी, कुमारी व भाटी येथील शेतीचे गवे, रानडुक्कर व माकड यांनी नुकसान केले असून त्यांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना चर्चेसाठी घेतली.

लेखानुदानाला मंजुरी
विधानसभेत काल २०२०-२१ च्या लेखानुदानाला सभागृहाने परवानगी दिली. त्याचबरोबर २०२० च्या गोवा विनियोग विधेयकालाही मंजुरी देण्यात आली. गोवा विधानसभेत काल गोवा खाजगी विद्यापीठ विधेयक २०२०२ मंजूर करण्यात आले.

कामत, सरदेसाईंना मार्शलनी बाहेर काढले
दुपारी १२.३० वा. उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी सभापतींच्या आसनाचा ताबा घेत दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्याचे कामकाज हाती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालत ‘शेम शेम’ अशा घोषणा दिल्या. यावेळी इजिदोर फर्नांडिस यांनी, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, सरदेसाई यांना ताकीद देऊन गोंधळ न घालण्याचा इशारा दिला. मात्र ते ऐकत नसल्याचे पाहून त्या दोघांना नंतर मार्शलद्वारे सभागृहातून बाहेर काढण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चर्चिल आलेमाव व अपक्ष आमदार प्रसाद गावकर हे वगळता इतर सर्व विरोधी आमदारांनी सभात्याग केला.