विरोधकांकडे मुद्दा नसल्यानेच स्मार्ट सिटीबाबत अपप्रचार ः कुंकळ्येकर

0
113

स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणार्‍या विकास कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या निकषांनुसार विकास कामांवर निधी खर्च केला जात आहे. विरोधकांकडे निवडणूक प्रचारासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने स्मार्ट सिटीमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचा अपप्रचार केला जात आहे, असा दावा भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना काल केला.

स्मार्ट सिटी ही एक पारदर्शक प्रक्रिया आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या निकषांनुसार विकास कामे करून घेतली जात आहेत. मात्र, भ्रष्टाचारात गुंतलेल्या व्यक्तींना सर्वत्र भ्रष्टाचार दिसतो. पणजी मतदारसंघात विरोधकांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने मतदारांचे लक्ष वळविण्यासाठी स्मार्ट सिटीवरून दिशाभूल करणारे आरोप केले जात आहेत, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीमध्ये कॅमेरा व इतर अत्याधुनिक साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी १८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यात कॅमेरा बसविण्याच्या कामावर केवळ ४.५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विरोधकांकडून याबाबत करण्यात येणार्‍या आरोपात कोणतेही तथ्य नाही. साधारण एका कॅमेरा खरेदीसाठी ९४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. झेब्रा क्रॉसिंगसंबंधीचा आरोप सुध्दा दिशाभूल करणारा आहे. झेब्रा क्रॉसिंगसंबंधी पीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निविदा जारी करण्यात आलेली आहे. त्यात केवळ रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्याचा कामाचा समावेश नाही. तर, पादचार्‍यांच्या सोयीसाठी रस्त्याची आखणी, रस्त्याच्या बाजूला पट्टे मारण्याच्या कामाचा समावेश आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.

उत्पलबरोबर चांगले संबंध
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्याशी चांगले संबंध आहे. उत्पल पर्रीकर प्रचार कार्यात सहभागी होत आहे. विरोधक आमच्यामध्ये दुही निर्माण करण्यासाठी खोटे आरोप करीत आहेत, असा दावा कुंकळ्येकर यांनी केला.

कॉंग्रेसकडून लोकांची दिशाभूल
भाजप विकासाला प्राधान्य देत आहे. कॉंग्रेस पक्षाचा विकास पाहू शकत नाही. मागील काही वर्षांत पणजीतील मूलभूत साधन सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा झालेली आहे. आम्ही जाहीरनाम्यात विविध प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. विकासाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कॉंग्रेस पक्ष ताळगावात मोठ्या प्रमाणात मोठा विकास करण्यात आल्याची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल करीत आहे. ताळगावात पाण्याचा योग्य प्रमाणात पुरवठा होऊ शकत नाही. इतर समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे. केवळ एक रस्ता तयार करून इमारती बांधण्यासाठी परवाने दिले म्हणजे विकास होत नाही. ताळगाव मतदारसंघ विकास कामांमध्ये मागे पडलेला आहे, असा दावा कुंकळ्येकर यांनी केला.

स्वयंरोजगाराला प्रोत्साहन
पणजीमध्ये स्मार्ट सिटी व इतर माध्यमातून विविध साधनसुविधा निर्माण करताना युवा वर्गाला रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वांना नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे युवा वर्गाला स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.