विराट, मिताली पहिल्या स्थानी

0
120

>> आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची एकदिवसीय क्रमवारी जाहीर

भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहली व महिला संघाची कप्तान मिताली राज हिने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान मिळविले आहे. कोहलीने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक गुणसंख्या प्राप्त करताना याबाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलादेखील पछाडले. मितालीने एका क्रमांकाची उडी घेत अव्वल स्थानाचा मान मिळविला.

१० दिवसांपूर्वीच कोहलीला आपला पहिला क्रमांक गमवावा लागला होता. परंतु, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २६३ धावा चोपून त्याने ८८९ गुणांसह पहिल्या स्थानावर हक्क सांगितला. मितालीने ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंगला मागे टाकत ७५३ गुण मिळवून आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला.

आयसीसी क्रमवारीत भारताकडून सर्वाधिक गुण मिळविण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. १९९८ साली सचिनने ८८७ गुणांची कमाई केली होती. हा विक्रम विराटने मोडीत काढला. न्यूझीलंडविरुद्ध १७४ धावा जमवून टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक ७९९ गुण मिळविले आहेत. त्याच्या सातव्या स्थानात मात्र कोणताही बदल झालेला नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ११वा क्रमांक आपल्या नावे केला आहे. यापूर्वी तो १२व्या क्रमांकावर होता. गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा हसन अली पहिले स्थान टिकवून आहे. तीन सामन्यांत ६ बळी घेत भारताचा जसप्रीत बुमराह तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. न्यूझीलंडचा डावखुरा संथगती गोलंदाज मिचेल सेंटनर (+ २, १४वे स्थान), पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज इमाद वासिम (+ १४, २७वे स्थान) व न्यूझीलंडचा द्रुतगती गोलंदाज ऍडम मिल्ने (+ ११, ४२वे स्थान) यांनी क्रमवारीत इतरांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले आहे.
न्यूझीलंडवर २-१ अशा विजयानंतरही सांघिक क्रमवारीत भारताचे दुसरे स्थान कायम आहे. ११९ गुणांसह भारत दुसर्‍या तर १२१ गुण घेत द. आफ्रिका पहिल्या स्थानी आहे.

झुलन गोस्वामी ‘जैसे थे’
महिला क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत मितालीने पहिले, ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीने दुसरे तर न्यूझीलंडच्या ऍमी सेतरवेटने तिसरे स्थान मिळविले आहे. मेग लेनिंगची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. लेनिंगला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. याचा फटका तिला बसला आहे. पेरी व सेतरवेट यांचे अनुक्रमे ७२५ व ७२० गुण आहेत. गोलंदाजांमध्ये भारताची झुलन गोस्वामी ६५२ गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे. द. आफ्रिकेचे जलदगती गोलंदाज मारिझान काप हिचे गोस्वामीपेक्षा चार गुण जास्त आहेत. आयसीसी महिला अजिंक्यपद मालिकेत इंग्लंडवर २-१ असा विजय प्राप्त करत कांगारूंनी ४ मौल्यवान गुणांची कमाई करतानाच महिलांच्या सांघिक क्रमवारीत १२९ गुणांसह पुन्हा पहिले स्थान मिळविले. या महिन्याच्या सुरुवातीला वार्षिक क्रमवारी नव्याने तयार करण्यात आल्यानंतर इंग्लंडने कांगारूंना मागे टाकले होते.

आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या नियमानुसार विजयासाठी २, बरोबरी किंवा निकाल न लागल्यास १ व पराभवाला शून्य गुण मिळतात. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे २०२१ साली न्यूझीलंडमध्ये होणार्‍या विश्‍वचषक स्पर्धेसाठी तीन संघ पात्र ठरणार आहे. न्यूझीलंड यजमान असल्याने त्यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. थेट पात्र न ठरणार्‍या देशांना उर्वरित चार जागांसाठी पात्रता स्पर्धेत खेळावे लागणार आहे.